Next
चांद्रभेटीची पन्नाशी! ‘अपोलो ११’च्या थरारक मोहिमेची गोष्ट पायलट माइक कोलिन्सच्या शब्दांत...
BOI
Friday, July 19, 2019 | 01:43 PM
15 0 0
Share this article:

अपोलो ११ मोहिमेतील अंतराळवीर - (डावीकडून) नील आर्मस्ट्राँग, मायकेल कोलिन्स आणि बझ ऑल्ड्रिन

नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी २१ जुलै १९६९ रोजी चंद्रावर पाऊल ठेवले. त्या ऐतिहासिक घटनेला आता ५० वर्षे झाली आहेत. चंद्रावर उतरलेल्या त्या दोघांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी यानाचा जो भाग चंद्राभोवती ६० मैल उंचीवर फिरत राहिला होता, त्याचे पायलट मायकेल (माइक) कोलिन्स आपल्याला पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या ऐतिहासिक चांद्रभेटीची गोष्ट सांगत आहेत, असा अॅनिमेटेड व्हिडिओ गुगलने या निमित्ताने केला आहे. त्याविषयी... 
.............
पुरातन काळापासून मानवाला असलेले चंद्राचे आकर्षण परिकथा, कविकल्पना, व्रते अशा विविध माध्यमांतून दिसत होते. भारतीयांनी तर त्याला चांदोमामा करून पृथ्वीच्या भावाचे स्थान दिले. मानवाला असलेल्या या आकर्षणातूनच चंद्राचा शास्त्रीय अभ्यास सुरू होत गेला आणि २१ जुलै १९६९ या दिवशी चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल पडले. नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर उतरणारे पहिले मानव ठरले. त्यांच्यानंतर १९ मिनिटांनी बझ ऑल्ड्रिन हेही चंद्रावर उतरले. त्या ऐतिहासिक घटनेला आता ५० वर्षे झाली आहेत. 

चंद्रावर उतरल्यानंतर बझ ऑल्ड्रिनचा नील आर्मस्ट्राँगने काढलेला फोटोया निमित्ताने गुगलने खास डूडल केले आहे. चंद्रावर उतरलेल्या त्या दोघांना पुन्हा पृथ्वीवर आणण्यासाठी यानाचा जो भाग (कोलंबिया) चंद्राभोवती ६० मैल उंचीवर फिरत राहिला होता, त्याचे पायलट मायकेल (माइक) कोलिन्स आपल्याला पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या ऐतिहासिक चांद्रभेटीची गोष्ट सांगत आहेत, असा अॅनिमेटेड व्हिडिओ गुगल डूडलसाठी केला आहे. (माइक कोलिन्स आज ८८ वर्षांचे आहेत.) अवघ्या साडेचार मिनिटांच्या व्हिडिओत संपूर्ण मोहिमेची माहिती या व्हिडिओत देण्यात आली आहे. कोलिन्स यांची कॉमेंटरी सुरू असताना मागे यानाची दृश्ये दिसतात आणि ‘अपोलो ११’ या मोहिमेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार झाल्याचा अनुभव आपल्याला घेता येतो. त्यांच्या कॉमेंटरीतून त्यांचे त्या वेळचे विचार जाणून घेता येतात आणि पृथ्वीवरील संपूर्ण मानवजात एक असल्याचा संदेशही मिळतो.

काउंटडाउन ‘झीरो’वर येते... यानाचे उड्डाण होते आणि अंतराळवीर माइक कोलिन्स यांची कॉमेंटरी सुरू होते.

‘नमस्कार. मी माइक कोलिन्स. अपोलो ११ मोहिमेतील अंतराळवीर आहे. ५० वर्षांपूर्वी मी एका धाडसी मोहिमेवर गेलो होतो, ज्या मोहिमेतून नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवले. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याची इतिहासातील ती पहिलीच घटना होती. यानाच्या कमांड मोड्युल या भागात मी होतो आणि तो भाग चंद्रापासून ६० मैल उंचीवर चंद्राभोवती फिरत होता. आम्हा सर्वांनाच पृथ्वीवर परत आणणे हे कमांड मोड्युलचे काम होते. 

१६ जुलै १९६९ या दिवशी सकाळी आमचे यान पृथ्वीवरून चंद्राकडे झेपावले. सारे जगच (जगभरातल्या नागरिकांच्या महत्त्वाकांक्षा) आम्ही आमच्या खांद्यावरून वाहून नेत असल्याचा विचार आमच्या मनात त्या वेळी होता. 

चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल पडण्यासाठी चार लाख व्यक्तींचा हातभार लागला होता. इंजिनीअर्स, कम्प्युटर प्रोग्रामर्स, स्पेस सूट तयार करणाऱ्या व्यक्ती अशा सगळ्यांचा त्यात समावेश आहे.

आमच्याकडे असलेला कम्प्युटर अत्यंत आधुनिक आहे असे आम्हाला तेव्हा वाटत होते; मात्र आज आपण जे काही खिशात घेऊन फिरतो त्यापेक्षा त्याची क्षमता कमीच होती. स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि कॅलिफोर्निया या तीन ठिकाणी असलेल्या अँटेनाच्या साह्याने नासा काम करीत होती. त्यामुळे पृथ्वी कोणत्याही दिशेला फिरली, तरी ह्यूस्टनला असलेली आमची टीम आम्हाला केव्हाही पाहू शकत होती आणि आमचा पुढचा मार्ग (ट्रॅजेक्टरी) कसा असावा हे सांगत होती. पृथ्वी आणि चंद्र यांच्यादरम्यानच्या प्रवासात आम्ही सातत्याने सूर्यप्रकाशात होतो. अपोलो ११ यानातील तापमान नियंत्रित करण्यासाठी आम्हाला यानाला स्वतःभोवती गोल गिरक्या घ्यायला भाग पाडावे लागले.... बार्बेक्यू रोलसारख्या... म्हणजे काठीला लावून कोंबडी भाजावी ना, तशा... 

पहिल्यांदा आम्ही चंद्र जवळून पाहिला, ते दृश्य अतिशय भव्यदिव्य आणि अत्यंत सुंदर होते. सूर्यामुळे चंद्राच्या भोवती सोनेरी प्रभा तयार झाल्याचे दिसत होते आणि त्या दृश्याने आमची अख्खी खिडकी भरून टाकली होती. जवळून दिसणाऱ्या चंद्राचे हे दृश्य इतके प्रभावी असले, तरी दुरून छोट्या दिसणाऱ्या त्या पृथ्वीच्या दृश्यापुढे ते काहीच नव्हते.

इंधन जवळपास संपत आले असल्याने तणावात असतानाच २० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन चंद्रावर उतरले. ‘वन स्मॉल स्टेप फॉर ए मॅन, वन जायंट लीप फॉर मॅनकाइंड’ (माणसाचे एक छोटे पाऊल, मानवजातीसाठी एक मोठी झेप) असे उद्गार चंद्रावर पहिले पाऊल ठेवताना नीलच्या तोंडून बाहेर पडले. त्याने अमेरिकेचा झेंडा आणि एक बोर्ड चंद्राच्या पृष्ठभागावर लावला. 

‘पृथ्वी ग्रहावरून आलेल्या माणसांनी येथे पहिले पाऊल ठेवले. इ. स. जुलै १९६९. आम्ही साऱ्या मानवजातीच्या शांततेसाठी आलो होतो,’ असे त्या बोर्डावर लिहिलेले होते.

यानाच्या चंद्राभोवती फिरणाऱ्या भागात (कमांड मोड्युल) मी एकटा होतो; पण एकाकी नव्हतो. नेमके सांगायचे झाले, तर तीन अब्ज अधिक दोन माणसे एका बाजूला होती आणि मी दुसऱ्या बाजूला होतो. मला तिथे खूप छान वाटत होते. मी गरम कॉफीचे काही घोटही घेतले. 

नंतर २४ जुलै १९६९ रोजी आम्ही मोहीम संपवून पृथ्वीवर परतलो. आमची पॅराशूट्स पॅसिफिक महासागरात उतरली.

या मोहिमेनंतर आम्हाला जगभरातून बोलावणे आले. ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो, त्या प्रत्येक ठिकाणची माणसं म्हणत होती, ‘वुई, यू अँड मी डिड इट’ (आपण, तुम्ही आणि आम्ही मिळून हे करून दाखवले.) या आश्चर्यकारक आणि सुंदर अशा पृथ्वीवरचे रहिवासी म्हणत होते, ‘वुई डिड इट.’ हा अनुभव खूप अचंबित करणारा होता. माइक कोलिन्ससोबत आज या टूरमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद!’

(व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search