Next
जाणून घेऊ या योगासने - भाग पहिला
BOI
Monday, June 17, 2019 | 05:22 PM
15 0 0
Share this article:


पाचवा आंतरराष्ट्रीय योगदिन येत्या २१ जून रोजी साजरा केला जाणार आहे. योगासने हा केवळ एक दिवस करण्याचा विषय नसून, निरोगी आयुष्यासाठी नियमितपणे करायची गोष्ट आहे, हे आपण जाणतोच. अनेक जण योगासने करत असतील; पण जे करत नसतील त्यांना ती सुरू करण्यासाठी योगदिन हे चांगले निमित्त आहे. योगदिनाच्या औचित्याने काही योगासनांची माहिती आणि व्हिडिओ आजपासून प्रसिद्ध करत आहोत. आज, पहिल्या भागात पाहू या पवनमुक्तासन, भुजंगासन, वज्रासन आणि उष्ट्रासन...
.............
पवनमुक्तासन : एखाद्याचा मेंदू आणि पोट निरोगी असेल तर ती व्यक्ती ऐश्वर्यसंपन्न असते, असे म्हणतात. थोडक्यात, एखाद्याचे मन शांत असेल आणि पोट निरोगी असेल, तर ती व्यक्ती तंदुरुस्त आणि समाधानी असते. हे दोन्हींही संलग्न असल्याने पचनसंस्था निरोगी आणि मजबूत असणे गरजेचे आहे. पोटातील वायू सरण्यासाठी आणि पचन ठीक होण्यासाठी पवनमुक्तासन लाभदायी ठरते.

असे करावे हे आसन : 
आधी जमिनीवर शवासनात झोपावे. नंतर दोन्ही पाय गुडघ्यातून आत दुमडून पोटाशी घट्ट धरावेत. गुडघा छातीला लावण्या चा प्रयत्न करावा आणि पोटावर हलकासा दाब आणण्याचा प्रयत्न करावा. आता श्वास हळुवारपणे बाहेर सोडून पुन्हा सावकाशपणे हनुवटीने गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये आपल्या शक्तीनुसार कालावधी निश्चित करावा. हे आसन साधारणतः १० ते ३० सेकंदांपर्यंत करावे. सरावाने कालावधी वाढवता येऊ शकतो. पुन्हा हलकासा श्वास सोडून पुन्हा शवासनाच्या म्हणजेच पूर्वीच्या स्थितीत यावे. हे आसन तीन ते चार वेळा करता येऊ शकेल. 

घ्यावयाची काळजी : 
कमरेचे, पोटाचे अथवा मानेचे विकार असतील, तर हे आसन करण्याचा प्रयत्न करू नये. आसन शांतचित्ताने करावे. आसन करताना कोणत्याही स्वरूपाची घाई टाळावी. 

आसनाचे फायदे : 
या आसनामुळे विशेषतः पोटाचे विकार कमी होण्यास मदत होते. पोटाचे व पाठीचे स्नायू बळकट होतात. हातांचे आणि पायांचे स्नायूही पुष्ट होतात. पार्श्वभागातील साध्यांमध्ये रक्ताभिसरण वाढते. पचनाच्या विकारात हे आसन फायदेशीर आहे. हृदयरोग असो किंवा स्त्रियांचे पोटाचे विकार, या आसनाने ते दूर करता येऊ शकतात. वजन कमी करण्यासाठीही हे आसन फायदेशीर आहे. हे आसन नियमित करण्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते.


भुजंगासन : या आसनात फणा काढलेल्या नागासारखी शरीराची स्थिती बनते (भुजंगासारखी). म्हणूनच या आसनाला भुजंगासन असे म्हटले जाते. पद्मसाधना व सूर्यनमस्कार यांमध्ये केल्या जाणाऱ्या आसनांतील हे एक आसन आहे.

असे करावे हे आसन : 
आधी पोटावर झोपावे. पायाची बोटे व कपाळ यांचा जमिनीला स्पर्श होईल, असे झोपावे. दोन्ही पाय जुळवून घ्यावेत. दोन्ही पावले आणि टाचा एकमेकांना हलका स्पर्श करतील, याची खात्री करावी. कोपरे कमरेला टेकलेली असावीत. आता हळुवारपणे एक दीर्घ श्वास घेऊन डोके, छाती व पोट वर उचलावे. हातांचा आधार घेऊन शरीर मागे टाचांकडे खेचावे. दोन्ही तळहातांवर सारखेच वजन देऊन पाठीतील प्रत्येक मणका एकामागे एक कमानीत येईपर्यंत श्वास घेत राहावा. आपल्या क्षमतेनुसार झेपेल तेवढाच वेळ आसनात राहावे, फार ताणू नये. नंतर हळू श्वास सोडत पोट, छाती व डोके जमिनीला टेकवत पूर्वस्थितीत यावे.

घ्यावयाची काळजी : 
गरोदरपणात, छातीचे अथवा मनगटाचे हाड मोडल्यास, नुकतीच पोटाची एखादी शस्त्रक्रिया झाल्यास हे आसन करू नये. जुन्या आजारात अथवा पाठीच्या कण्याच्या विकारात तज्ज्ञांच्या सल्ल्याने आसन करावे. याशिवाय हे आसन करताना घ्यावयाची महत्त्वाची काळजी म्हणजे मागे झुकण्याचा प्रयत्न मुळीच करू नये. अन्यथा पाठीवर त्याचा ताण निर्माण होऊ शकतो.

आसनाचे फायदे : 
सर्व प्रकारच्या जुन्या आजारांमध्ये या आसनाचा फायदा होतो. या आसनाने गळा, पोट, पाठ, आणि कमरेचा चांगला व्यायाम होतो. यामुळे पित्ताशयाची क्रियाशीलता वाढते. पचनशक्ती वाढते. खांदा व मान मोकळी होते. थकवा व तणाव कमी होतो. रक्ताभिसरण सुधारते. श्वसनविकार अथवा दमा असलेल्यांसाठी हे अतिशय उपयुक्त आसन. फक्त खोकल्याची उबळ आल्यावर करू नये. पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबीही या आसनाने कमी होते. 


वज्रासन : ‘वज्र’ म्हणजे इंद्राचे अस्त्र. या आसनामध्ये पायांची बैठक वज्राप्रमाणे पक्की असते. म्हणूनच याला वज्रासन म्हणतात. वज्र याचाच अर्थ ‘जननेंद्रिय’ असादेखील होतो. या आसनाच्या सरावामुळे विशेषत: जननेंद्रियावर व ओटीपोटावर लाभदायक परिणाम होतो.

असे करावे हे आसन : 
 वज्रासन तीन पद्धतीने केले जाऊ शकते. वज्रासनात कोणी बसू शकत नसेल, तर अर्धवज्रासनात बसता येते. दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवून पाय पसरून बसावे. हात नितंबाच्या दोन्ही बाजूंना जमिनीवर ठेवावेत. डाव्या हातावर व बाजूवर शरीराचा भार घेऊन उजव्या हाताच्या मदतीने उजवा पाय गुडघ्यात दुमडावा. उजव्या पायाचा तळवा आकाशाच्या दिशेने ठेवून पाऊल मागे न्यावे. अशा प्रकारे उजव्या नितंबाखाली उजवे पाऊल व्यवस्थित ठेवावे. आता शरीराचा भार उजव्या हातावर व बाजूवर घ्यावा. डाव्या पायाचे पाऊल डाव्या नितंबाखाली स्थिर करावे. या स्थितीमध्ये दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना लागतील याची काळजी घ्यावी. पार्श्वभाग उलट्या पावलांवर व्यवस्थित पक्का करावा. ओटीपोटाचा भाग थोडा पुढे करावा. पाठीचा कणा ताठ ठेवावा. हातांचे तळवे गुडघ्यांवर किंवा गुडघ्यांजवळ मांडीवर ठेवावेत. पोट व हाताचे स्नायू ढिले सोडावेत. डोळ्यांच्या पापण्या अलगद मिटाव्यात. लक्ष श्वासावर केंद्रित करावे. हीच वज्रासनाची अंतिम स्थिती होय.

घ्यावयाची काळजी : 
गुडघेदुखी असणाऱ्यांनी हे आसन करू नये. आपल्या क्षमतेनुसार शक्य तेवढाच वेळ आसनात बसावे. 

आसनाचे फायदे : 
वज्रासनात बसल्याने शरीर बळकट आणि स्थिर बनते. या आसनाने श्वास शांत, सावकाश व दीर्घ होतो. त्यामुळे आयुष्य वाढते. मन एकाग्र होण्यास मदत होते. हे एकमेव आसन जेवण झाल्यानंतरही करता येते. याने जेवण पचण्यास मदत होते. या आसनाने पायाचे सांधे बळकट होतात. योगाभ्यासासाठी योग्य अशी शांत, एकाग्र मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती वज्रासनामुळे लवकर साध्य होते. म्हणून सुरुवातीस हे आसन केल्यामुळे पुढील योगाभ्यास उत्तम होतो. ओटीपोटातील रक्ताभिसरण सुधारते. जननेंद्रियांचे आरोग्य चांगले राहते. पाठीच्या कण्यातील दोष नष्ट होतात.


उष्ट्रासन : ‘उष्ट्र’ हा संस्कृत भाषेतील शब्द आहे. ‘उष्ट्र’ म्हणजे ‘उंट’. या आसनस्थितीत शरीराची स्थिती उंटासारखी होते. म्हणून त्याला उष्ट्रासन असे म्हणतात. 

असे करावे हे आसन : 
सुरुवातीला वज्रासनात म्हणजे पाय गुडघ्यातून दुमडून बसावे. त्यानंतर गुडघ्यांवर उभे राहावे. साहजिकच पाय मागे रहातील. आता दोन्ही हात समोर न्यावेत. त्यानंतर हात कानावरून मागे घ्यावेत. शरीराचा पुढील भाग हळूहळू मागे झुकविण्याचा प्रयत्न करावा. मग हातही पूर्णपणे मागे न्यावेत. आता हातांनी टाच पकडण्याचा प्रयत्न करावा. मानही मागे वळवावी आणि डोकेही मागे न्यावे. या अवस्थेत शरीर मागच्या बाजूला झुकलेले असेल. ही आसनाची पूर्ण स्थिती आहे. क्षमतेनुसार आसनात राहावे. आसनातून बाहेर येताना दोन्ही हात एकाच वेळी पुन्हा पुढे आणावेत आणि त्यानंतर वज्रासनातून बाहेर यावे.

घ्यावयाची काळजी : 
हर्नियाचा त्रास असणाऱ्यांनी हे आसन करू नये. मानेची दुखापत किंवा उच्च अथवा कमी रक्तदाब असणाऱ्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावे. हे आसन करताना शरीराला जास्त ताण देऊ नये. मागे झुकताना मांड्या सरळ असणे व अंतिम स्थितीत मानेपासून गुडघ्यापर्यंतचा भाग सरळ असणे अपेक्षित आहे. आसनस्थितीतून परतताना सावधगिरी बाळगावी.

आसनाचे फायदे : 
या आसनामुळे गुडघे, मूत्रपिंडे, किडनी, यकृत, लिव्हर, फुफ्फुसे, मानेचा भाग यांना चांगला व्यायाम मिळतो. हे आसन केल्यास शरीरात स्फूर्ती निर्माण होते. याशिवाय पोट, पाय, खांदे, पाठीचा कणा यांना ताण बसून त्यांचा चांगला व्यायाम होतो. या आसनामुळे बद्धकोष्ठता, अपचन, पित्त दूर होण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या तक्रारीतही हे आसन फायदेशीर आहे. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search