Next
‘१९८४’ आणि जुळ्या सिंग बहिणींची अन्य चित्रे
BOI
Thursday, June 28, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

इंग्रजी सत्ता आल्यावर भारतात चित्रे भिंतीवर लावण्याची, कॅनव्हासवर तैलचित्रे करण्याची युरोपातील पद्धत राजप्रिय नि लोकप्रिय झाली. लघुचित्रे काढण्या-पाहण्याचा सरावच कालौघात गेला होता. काही ठिकाणी, काही चित्रकारांनी या परंपरांचे आपापल्या पद्धतीने पुनरुज्जीवन केले. काहींनी आधुनिक व आधुनिकोत्तर कलाप्रकारात लघुचित्र प्रकारात मिश्र चित्रे केली. लंडनच्या ‘सिंग सिस्टर्स’ या चित्रकार त्यापैकीच एक. रवींद्र आणि अम्रित सिंग या जुळ्या बहिणी लघुचित्रे करतात. मुंबई आणि दिल्लीत भरलेल्या प्रदर्शनातील त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रांबद्दल जाणून घेऊ या ‘स्मरणचित्रे’ सदराच्या आजच्या भागात....
.........
‘लघुचित्रे’ म्हणजे लहान आकारातील चित्रे. कागदावर अशी लहान आकारातील चित्रे काढण्याची परंपरा साधारणत: मध्ययुगापासून आपल्याकडे दिसते. अशी चित्रे जैनधर्मीय पोथ्यांवर काढण्याची परंपरा होती. त्याप्रमाणेच मुघल राज्यकर्ते आपल्या दरबारात अशा चित्रांना आश्रय देत. ही परंपरा इराणी होय. पुढे राजस्थानातील उदयपूर, मेवाड, बुंदी व किशनगड अशा प्रदेशांत राजपूत राजवंश जसजसा स्थिर झाला, तसतसा लहान आकारातील चित्रांचा म्हणजेच ‘लघुचित्रांचा’ हा पोशिंदा वर्ग उदयास आला. हे राजपूत राजे हिमालयाच्या कुशीतील पहाडी प्रांतातही वसले. लहान राज्यांच्या आश्रयाने गुल्लोर, कांग्रा इत्यादी प्रांतातदेखील लहान आकारात चित्रे काढण्याची परंपरा विकसित झाली. ती कलेच्या परमोच्च रूपात पोहोचल्याची उदाहरणे दाखवणाऱ्या अनेक कलाकृती भारतातील व जगभरातील अनेक संग्रहालयांत आज उपलब्ध आहेत. ही लघुचित्रे पाहण्याची मजा घेता येते ती सवयीने. ज्येष्ठ लघुपट निर्माते-दिग्दर्शक अमित दत्ता यांच्यासारखे जाणकार एखादे लघुचित्र तासभर पाहतात. त्यातील बारकावे, वर्ण्यविषय, कलात्मक बाजू, रूपके हे सारे या पाहण्याच्या साधनेनंतर उलगडत जाते. एखादे चांगले चित्र पाहताना ते खूप गांभीर्याने घ्यावे लागते. लघुचित्रे जवळून पाहण्याच्या दृष्टीनेच तयार केलेली असतात. त्यात बराच तपशील अत्यंत कौशल्याने बसवलेला असतो. तो पाहणे हा एक अनुभव असतो; मात्र साधारणतः एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर लघुचित्रे तयार करण्याची ही परंपरा कमी होत जाऊन जवळजवळ नामशेष झाली. तसेच दरबारात लघुचित्रे हातात घेऊन त्यांचा आस्वाद घेण्याची पद्धतही बंद झाली.इंग्रजी सत्ता भारतात पसरून लहानसहान संस्थाने मांडलिक होत गेली आणि चित्रे भिंतीवर लावण्याची, कॅनव्हासवर तैलचित्रे करण्याची युरोपातील पद्धत राजप्रिय झाली. ती कमी काळात लोकप्रियही झाली. इतकी, की चित्र हे भिंतीवर टांगावयाचे, इतकेच स्वरूप राहिले. सार्वजनिक स्मरणशक्ती कमी असल्याने लघुचित्रे काढण्या-पाहण्याचा सरावच कालौघात गेला होता. काही ठिकाणी, काही चित्रकारांनी या परंपरांचे आपापल्या पद्धतीने पुनरुज्जीवन केले. काहींनी आधुनिक व आधुनिकोत्तर कलाप्रकारात लघुचित्रांची एका प्रकारे ‘स्मूदी’ म्हणू या, अशी मिश्र चित्रे केली. लंडनच्या ‘सिंग सिस्टर्स’ या चित्रकार त्यापैकीच एक. या जुळ्या बहिणी लघुचित्रे करतात.

त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतल्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात (एनजीएमए) डॉ. शरयू दोशी चेअरमन असताना संग्रहालय व ब्रिटिश वकिलातीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शन मोठे मजेशीर होते. त्यात लहान आकारातील चित्रे होती. त्यातील प्रतिमांची अदलाबदल लक्षात राहणारी व मनोवेधक होती. 

ऐतिहासिक चित्रे घेऊन त्यामध्ये स्वतःच्या कल्पनांना अनुरूप विचारांनी विचारांनी व्यक्तींमध्ये, चित्रातील प्रमुख पात्रांत बदल करणे आणि मूळ रचना, रंगसंगती वगैरे तशीच ठेवणे, असे बदल त्या चित्रकर्त्या मूळ चित्रात करतात. चित्रात मुद्दाम लपवलेले काही अन्वयार्थ, संकल्पना असतात. काही राजकीय मतमतांतरे असतात. पाश्चात्य जगातील ख्रिश्चन पोथीचित्रे व लघुचित्र शैलीच्या मिश्रणातून त्या काही चित्रे बंदिशीप्रमाणे मांडतात. समकालीन संगीतात असे देशी-विदेशी घटकांच्या मिश्रणाचे प्रयोग होतात. तसेच हे काही प्रयोग होत. असे प्रयोग ‘एनजीएमए’तील प्रदर्शनात पाहायला मिळाले होते. 

रवींद्र आणि अम्रित सिंग या जुळ्या बहिणी एकच चित्रावर दोघी एकत्रितरीत्या काम करतात. त्या भारतीय वंशाच्या असल्या, तरी ब्रिटिश चित्रकार म्हणूनच ओळखाल्या जातात. आपले मूळ ब्रिटिश नसल्याच्या स्मृतींना त्या चित्रात प्रतिबिंबित करतात. गॅलरी, संग्रहालये, पुस्तके यांमधून त्या मूळ ऐतिहासिक चित्राचे फोटोग्राफ घेतात, गरजेप्रमाणे लहान-मोठे करतात. आजचे सांस्कृतिक, राजकीय आणि जागतिकीकरणाचे संदर्भ त्यांच्या चित्रात दिसतात. उदाहरणार्थ, रागमाला चित्रे ही लघुचित्रातील महत्त्वाची चित्रे. त्यातील रचना घेऊन या सिंग भगिनी आजच्या दैनंदिन जीवनातील विषयांची मांडणी करतात. 

1984

‘१९८४’ हे त्यांचे या प्रदर्शनातील महत्त्वाचे चित्र होय. त्या चित्राला काही ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय आणि भावनिक बाजूही आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जनरल वैद्य यांच्या सहकार्याने शीख धर्मीयांचे पवित्र स्थळ असलेले सुवर्णमंदिर म्हणजे अमृतसरसाहिब येथील प्रमुख गुरुद्वारावर, खलिस्तानवादी अतिरेक्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी भारतीय लष्कर तैनात केले होते. त्याबद्दल आजही शीख समाजात आकस आहे. तसेच अमृतसरच्या गुरुद्वाराची एक भिंत, ज्यावर तोफेच्या गोळीबाराच्या खुणा आहेत, त्या तेथे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. बहुधा शीख समाजाच्या मनातील जखमेचे चित्र असावे का भारतीय लोकशाही भक्कम करण्यासाठी केलेल्या कारवाईचे हे चित्रण असावे, असा प्रश्न तेव्हा मला पडला होता.

मूळच्या राजस्थानी शैलीतील चित्रावरून त्याचा आकृतिबंध सिंग सिस्टर्सनी घेतला आहे. वरून पाहिलेला हा एक देखावा आहे... जणू एखाद्या पक्ष्याने आकाशातून सारे पाहावे, तसा देखावा. त्यामध्ये रणगाडे गुरुद्वारात घुसवलेले दिसत आहेत. डाव्या कोपऱ्यात रणगाड्यावर इंदिरा गांधी यांची प्रतिमा (एका बाजूने पाहत असलेली) चितारण्यात आली आहे. त्यांचा पोशाख, चेहऱ्याची ठेवण सारे काही वास्तव वाटण्याजोगे. त्या हाताचा पंजा दाखवीत आहेत. रणगाड्यावर काही परिचितांची शिरे आहेत. भयभीत होऊन कुटुंबे पळत आहेत. तळहातावर शीर घेऊन शीखधर्मीय रक्षणकर्ते तलवारीने लढत आहेत. अमृतसरच्या पवित्र सुवर्णमंदिर गुरुद्वाराच्या चहूबाजूंनी असलेला पवित्र जलाशय रक्तमय झाला आहे. चित्राच्या उजव्या बाजूला भारतीय सैन्य व डाव्या बाजूने गुरुद्वारात घुसवलेला रणगाडा दाखवला आहे. बाहेरील बाजूस देखील सैन्याच्या तुकड्या केलेल्या दर्शवल्या आहेत. गुरुद्वाराच्या छतावर काही सामान्य भक्तांनी आश्रय घेतला आहे. पार्श्वभूमीच्या इमारती आणि आकाशाचे, ढगांचे चित्रण थेट लघुचित्र शैलीतील. या एकूणच चित्रात आतील माणसांची वाताहत दर्शवली आहे. यामध्ये संकल्पना महत्त्वाची हे लक्षात घेतले, की चित्र पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.असेच नानाविध तपशील त्यांच्या इतरही लघुचित्रांमध्ये दिसतात. उदाहरण म्हणून त्यांचे ‘होम’ हे चित्र पाहू. या चित्रात त्यांनी आत्मप्रतिमा रंगवली आहे. एक बहीण टेबलावर बसून जेवत आहे, तर दुसरी फोटो काढत आहे. पार्श्वभूमीला न्यूयॉर्क शहर दिसते आहे, अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेचा प्रसिद्ध पुतळा दिसत आहे. मोठ्या टॉवरवर किंग काँग चिंपाझी चढलेला दाखवला आहे. डाव्या बाजूला मॉलमध्ये असतात तशी स्थानिकांची (रेड इंडियन्सची) दुकाने आहेत. तपशील किती, ते पाहावे. अगदी दुकानदाराच्या टी-शर्टवरील चेहऱ्याचा मुखवटाही दर्शवला आहे. खालील बाजूस रेड इंडियन्स दाखवले आहेत. पार्श्वभूमी फिकट निळसर सपाट आहे. लघुचित्राची दृष्यभाषा येथे सहज नजरेत भरते.आणखी एका लघुचित्रात त्यांनी स्वतःला वडिलांबरोबर चितारले आहे. मध्यभागी वडील... सुटाबुटात, टाय लावलेले, दाढी वाढवलेले रुबाबदार व्यक्तिमत्त्व. दोन्ही बाजूला जुळ्या मुली. म्हणजे आपल्या चित्रकार जुळ्या. छान कपड्यांत, टिपिकल पंजाबी मुलींच्या फॅशनमध्ये... फुग्यांच्या बाह्या... पूर्ण लांबीच्या व मनगटाजवळ चुण्यांच्या फिक्या ड्रेसमध्ये आत्मप्रतिमा रंगल्या आहेत. कपड्यांचे फिटिंग इंग्रजी पद्धतीच्या कॉर्सेटसारखे टाइट आहे. ठळक दागदागिने, अंबाडा अशी केशभूषा... अशा रूपात त्या स्वतः. पार्श्वभूमीला कमान व कमानीच्या आत पृथ्वीचा अर्धगोलाकार नकाशा व महत्त्वाच्या इमारती. पुढे समुद्र, समुद्राच्या आत डॉल्फिन, बोट वगैरे... उजव्या कोपऱ्यात गुरुद्वारा आणि सगळ्या चित्राला नक्षीदार चौकट. लघुचित्रांचे हे अत्याधुनिक (पोस्ट-मॉडर्न) रूप... मूळ इराणी शैलीतील लघुचित्रांवर बेतलेले.लिव्हरपूल येथील आर्ट गॅलरीतील सिंग सिस्टर्सचे चित्र पाहताना प्रिन्स चार्ल्सअशा अनेक चित्रांची निर्मिती या ट्विन सिस्टर्सनी केली आहे. अनेक राजकीय महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी त्यांच्या चित्रात येतात. प्रसिद्ध व्यक्तींनादेखील चित्रांमध्ये स्थान दिसते. हे सगळे असते लघुचित्राच्या रूपात. समकालीन भवताल जुन्या लघुचित्र रचनांमध्ये बसवून पाहण्याच्या प्रयोगामागे काहीसा इतिहास आहे. 

१९८०ला त्यांनी भारताला प्रथम भेट दिली, तेव्हापासून त्यांना लघुचित्रांबद्दल आकर्षण वाटायला लागले. हे कुटुंब फाळणीच्या वेळी इंग्लंडला गेले आणि नंतर लिव्हरपूल येथे स्थायिक झाले. आजही रवींद्र व अम्रित या दोघीही लिव्हरपूल येथेच वास्तव्य करून आहेत. त्यांनी शालेय शिक्षण तेथील एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घेतलं आणि तेव्हाच त्यांना रुपकांबद्दल, दंतकथांबद्दल आत्मीयता निर्माण झाली. भारतातील, पश्चिम जगातील तत्त्वे उचलून चाललेली आधुनिक कला त्यांना कुठे तरी खटकली. 

आपल्या प्रवासाबद्दल त्या म्हणतात, ‘आमची कला अनेक जगांमधील पूल आहे. प्राचीन व आधुनिक, पौर्वात्य व पाश्चिमात्य जगतातील सौंदर्यघटक, समकालीन समस्यांचा सामना करताना प्राचीन कलेचा वापर करणे, मोठ्या समूहाला सौंदर्यदर्शन घडवणे हे आमचे ध्येय आहे. आपल्या वारशाची श्रीमंती आणि मूल्ये समकालीन कलेत आणि समाजात रुजवण्याचा प्रयत्न आहे.’

मार्गारेट थॅचरत्यांची प्रदर्शने लंडनची नॅशनल पोर्ट्रेट गॅलरी, लिव्हरपूलची वॉकर आर्ट गॅलरी इत्यादी ठिकाणी यापूर्वी झाली होती. २००२ला मुंबई आणि दिल्लीतील राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात झालेली त्यांची प्रदर्शने म्हणजे माझ्यासाठी तरी चित्रकला समजावून घेण्याचा वेगळाच अध्याय होता...

(जुळ्या सिंग बहिणी आणि त्यांच्या चित्रांबद्दल अधिक माहितीसाठी https://www.singhtwins.co.uk ही वेबसाइट जरूर पाहावी.)

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link