Next
आदिवासी भागांतील मुलांसाठी सायकल स्टँड
शाळेसाठीची पायपीट थांबण्यासाठी आंबेगाव तालुक्यात उपक्रम
डॉ. अमोल वाघमारे
Tuesday, November 13, 2018 | 10:47 AM
15 0 0
Share this storyफलोदे :
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागांत अनेक मुला-मुलींना आजही शिक्षणासाठी तीन ते सात किलोमीटर अंतर चालत जावे लागते. त्यांची शिक्षणासाठीची ही पायपीट थांबण्यासाठी सायकल स्टँड हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मुलांना सायकल घेऊन शाळेत जाता येणार आहे. त्यासाठी ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेने पुढाकार घेतला आणि स्थानिक स्तरावर सर्व नियोजन फलोदे येथील शहीद राजगुरू ग्रंथालयाने अत्यंत चोखपणे पार पडले. 

तालुक्यातील पहिल्या सायकल स्टँडचे उद्घाटन चार नोव्हेंबर २०१८ रोजी फलोदे (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे पार पडले. या उद्घाटनप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. असा आहे उपक्रम...
या उपक्रमांतर्गत या भागातील सात ते आठ आदिवासी गावांत सायकल स्टँड उभारले जाणार आहेत. या गावांमध्ये एका ठिकाणी सायकली सुरक्षित राहतील असा स्टँड ग्रामस्थांच्या सहकार्यातून उभारला जाईल. गावातील मुले सकाळी या ठिकाणाहून सायकल घेतील व शाळेत जातील आणि सायंकाळी परत सायकल स्टँडमध्ये आणून लावतील. या ठिकाणी एक पुस्तक पेटीही असणार आहे. सायकल शाळेत घेऊन जाणाऱ्या मुला-मुलींनी एक तरी पुस्तक वाचावे, अशी नियमावली केली जाणार आहे. या सायकल स्टँडचे व्यवस्थापन शाळकरी मुलेच करणार आहेत. काय म्हणाले मान्यवर?
धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी या उपक्रमाचे स्वागत करून या भागात अशा गरजू मुलांकरिता अधिकाधिक सायकल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले. याबरोबरच मोठ्या खासगी रुग्णालयात गरीब रुग्णांवर जे मोफत उपचार केले जातात, त्या योजनांची माहितीही सांगितली. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी आपल्या भाषणात वाचनसंस्कृती व तिचे समाजविकासाशी असलेले नाते स्पष्ट केले. सायकल स्टँडमध्ये ठेवली जाणारी पुस्तकपेटी हा उपक्रम नक्कीच अनुकरणीय व कौतुकास्पद असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. 

या कार्यक्रमावेळी नयना चोपडे, ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे हेमंत जाधव, डॉ. लक्ष्मण डामसे, डॉ. जावळे, डॉ. मोरे, बाळासाहेब कानडे, राजू घोडे, कृष्णा वडेकर, रोहिदास गभाले, फलोदे गावच्या सरपंच मनीषा मेमाणे, उपसरपंच मनोहर मेमाणे, माजी सरपंच अशोक पेकारी, शहीद राजगुरू ग्रंथालयाचे डॉ. अमोल वाघमारे, अशोक जोशी, ज्ञानेश्वर मेमाणे, दीपक रड्डे, सुनील पेकारी आदी उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रा. हनुमंत भवारी यांनी, तर आभारप्रदर्शन अशोक पेकारी यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link