Next
धामणसेच्या रत्नेश्वर देवस्थानातर्फे रायवळ आंब्यांच्या २२०० रोपांची लागवड
BOI
Saturday, August 03, 2019 | 03:45 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
रत्नागिरी तालुक्यातील धामणसे येथील स्वयंभू श्री रत्नेश्वर देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीने रायवळ आंब्यांच्या विविध प्रकारच्या २२०० रोपांची लागवड नुकतीच करण्यात आली. या उपक्रमामुळे रायवळ आंब्यांची विविधता जपण्यास मोठा हातभार लागणार आहे. धामणसे हे पर्यटन क्षेत्र आहे. तसेच स्वयंभू श्री रत्नेश्वर हे अनेकांचे कुलदैवत आहे. या उपक्रमांतर्गत एक हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट ट्रस्टने ठेवले होते; पण त्याहून जास्त म्हणजे एकूण २२०० रोपे लावण्यात आली. या उपक्रमात ग्रामस्थ, धाणमसे हायस्कूलचे विद्यार्थी असे ३५० जण सहभागी झाले. यात तरुणांचा सहभाग मोठा होता.श्री रत्नेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सध्या चालू आहे. नव्या मंदिराचे संकल्पचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. या चित्रामध्ये मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस हिरगावार डोंगर आहे. विविध ऋतूंमध्ये निसर्ग आपले रंग बदलत असतो. पावसाळ्याव्यतिरिक्तच्या काळातही नवीन मंदिरामागचा भाग हिरवागार दिसण्यासाठी वर्षभर हिरव्यागार राहणारी रायवळ आंब्याची रोपे लावण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला.

रायवळ आंब्यांमध्ये अनेक प्रकार असून, फळांचे आकार, चव, रंग यांनुसार त्यांना त्या त्या भागात वेगवेगळी नावे दिली जातात. रायवळ आंब्यांच्या स्थानिक प्रजाती हे कोकणातील जैवविविधतेचे मोठे वैभव आहे. रायवळ आंब्यांच्या झाडांवर रोग-किडींचे प्रमाण अगदी नगण्य असते. हे आंबे अत्यंत चविष्ट असतात; त्यात अनेक पौष्टिक घटक असतात; मात्र ते हापूससारखे कापून खाता येत नाहीत. तसेच त्यांची टिकवणक्षमताही हापूसच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे त्याकडे ग्राहक आकर्षित होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच त्यांचे मार्केटिंग फारसे केले जात नाही. हापूस आंब्यांना मोठी मागणी असल्याने त्यांची लागवड केली जाण्याचे प्रमाणही मोठे आहे. रायवळ आंबे बहुगुणी असले, तरी त्यांची मुद्दाम लागवड करण्याचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे देवस्थानाने राबविलेला हा उपक्रम रायवळ आंब्यांमधील विविधता जपण्यास बहुमोल मदत करणार आहे. 

एकसारखी चव आणि रंग हे हापूस आंब्यांचे वैशिष्ट्य, तर चव, आकार आणि रंग यातील विविधता हे रायवळ आंब्यांचे वैशिष्ट्य. कोकण म्हणजे हापूस आंब्यांची भूमी अशी ओळख आहे; मात्र कोकण हे रायवळ आंब्यांच्या शेकडो प्रजातींचेही घर आहे. आताच्या काळात रायवळ आंब्यांच्या झाडांचे प्रमाण कमी होत चालले आहे. कारण त्यांची व्यावसायिक लागवड केलीच जात नाही. या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे महत्त्व मोठे आहे.‘श्री रत्नेश्वर मंदिराचे बांधकाम काळ्या दगडांचा वापर करून केले जात असून, हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाईल,’ असे रत्नेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शेखर देसाई यांनी सांगितले. तसेच मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी देण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Amit About 17 Days ago
Fantastic activity....Congrats. ...Thanks for sharing
0
0

Select Language
Share Link
 
Search