Next
आयटी इंजिनीअर शेतीत ‘जयवंत’ होतो तेव्हा...
BOI
Thursday, June 21, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

जयवंत पाटील

शेती क्षेत्रात काम करणं दिवसेंदिवस अवघड होत चाललेलं असताना एक तरुण या क्षेत्रात येण्याचा विचार करतो.... तेही शेतीतलं काहीही कळत नसताना नि आयटी क्षेत्रातली चांगल्या पगाराची नोकरी हातात असताना... पण त्याच्या ध्यासाने तो सारं काही शिकतो, चांगल्या प्रकारे शेती करतो, शेतकऱ्यांना एकत्र आणतो, सेंद्रिय उत्पादनं नि देशी गायीच्या दुधाच्या विक्रीसाठी ऑनलाइन व्यासपीठ उभं करतो... ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज पाहू या जयवंत पाटील या तरुण, डिजिटल शेतकऱ्याची प्रेरणादायी गोष्ट...
.........
बिमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेला आणि बलराज सहानी यांची अप्रतिम भूमिका असलेला ‘दो बीघा जमीन’ हा चित्रपट मी काही वर्षांपूर्वी बघितला होता. तेव्हापासून त्या चित्रपटानं माझ्या मनाचा जो ताबा घेतला, तो आजपर्यंत! या चित्रपटाला त्या वेळी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. भारतातल्या १० उत्कृष्ट चित्रपटांत ‘दो बीघा जमीन’ची गणना होते; पण तो गल्लाभरू चित्रपट नसल्यानं त्या वेळी फारसा चालला नाही. या चित्रपटानं भारतीय सिनेमात नवयथार्थवादाची सुरुवात केली. खरं तर त्याला चित्रपट म्हणूच नये. त्यात भारतातल्या शेतकऱ्यांची विदारक सत्यस्थिती दाखवली होती. दुष्काळामुळे हवालदिल झालेला शेतकरी, सावकाराचं कर्ज आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्याची आणि त्याच्या कुटुंबाची झालेली फरफट आणि अखेर डोळ्यांदेखत हातातून गेलेली जमीन... हे भारतीय शेतकऱ्याच्या भीषण अवस्थेचं चित्र बिमल रॉय यांनी आपल्या चित्रपटात १९५४ साली दाखवलं होतं. रोजच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं गावाकडून शहराकडे धावणाऱ्या मनुष्याचं जगणं यात बघायला मिळतं; पण त्याचबरोबर शहरात जाऊनही त्याच्या हाती काहीच लागत नाही. वाट्याला येतं ते फक्त बकाल जीवन! त्याचं सुख संपल्यातच जमा होतं. सुखाची स्वप्नंही तो बघू शकत नाही कारण ती स्वप्नं बघायलाही त्याच्याकडे वेळ शिल्लक राहत नाही, इतका तो घाण्याच्या बैलासारखा जुंपला जातो. डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारं हे वास्तव भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर आज ७० वर्षांनंतरही तसंच बघायला मिळतं आहे. त्या वेळी बिमल रॉय यांनी उपस्थित केलेले प्रश्न आजही उत्तराच्या शोधात उभे आहेत हेच खरं! दर वर्षी प्रसिद्ध होणारी शेतकरी आत्महत्त्यांची आकडेवारी पोटात खड्डा निर्माण करणारी आहे. सरासरी दर २८ ते २९ मिनिटांनी एक शेतकरी आत्महत्या करतो. आजपर्यंत भारतात ३० लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. भारतीय हरितक्रांतीचे जनक म्हटले जाणारे डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी आपल्या एका लेखात शेतीमधल्या अरिष्टाविषयी आपलं म्हणणं मांडलं आहे. ‘आपल्या देशाचं भवितव्य बंदुकीवर अवलंबून नसून धान्यावर अवलंबून आहे आणि शेतीत पुरेशी गुंतवणूक करून नीट लक्ष दिलं नाही, तर देशावर नक्कीच मोठं संकट कोसळेल,’ असं भाकीतही त्यांनी केलं आहे. शेतीमध्ये घातक रसायनांचा जो मारा केला गेला, त्याचे परिणामही आज भोगावे लागत आहेत. कीटकनाशके आणि खतांच्या अतिरेकी माऱ्यामुळे पंजाबमधल्या जमिनींचं वाळवंटीकरण वेगानं होत आहे. ही सगळी आपल्या शेतीची आजची अवस्था आहे. त्यातच ‘शेती करणं म्हणजे कर्जबाजारी होऊन मृत्यूला आमंत्रण देणं’ हा विचार रुजल्यामुळे असलेला जमिनीचा तुकडाही विकून बहुसंख्य शेतकरी शहराकडे धावताना दिसतात. अशा वेळी ‘दो बीघा जमीन’ या चित्रपटातलं मन्ना डेंच्या आवाजातलं गाणं मनात आशावाद निर्माण करतं -
मौसम बीता जाए, मौसम बीता जाए
अपनी कहानी छोड जा, कुछ तो निशानी छोड जा
कौन कहे इस ओर तू फिर आए ना आए
मौसम बीता जाए, मौसम बीता जाए 

‘तू काहीतरी असं कर आणि आपलं नाव इथं कोरून जा,’ या कवीच्या म्हणण्यावरचा विश्वास दृढ होईल, अशी एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. बीई इलेक्ट्रॉनिक्स झालेला आणि मॅनेजमेंटचीही पदवी प्राप्त केलेला एखादा उच्चशिक्षित तरुण जेव्हा शेती करण्यासाठी शहरातून खेड्याची वाट धरतो, तेव्हा जगात चांगलं घडवणारी माणसं आहेत आणि ती बदल घडवून आणू शकतात, हे नक्की पटतं! त्याचं नाव जयवंत पाटील. खरं तर जयवंत हा आयटी क्षेत्रात एका चांगल्या कंपनीत उच्च पदावर आणि मोठ्या पगारावर काम करत होता. शेती कशाशी खातात, हेही त्याला ठाऊक नव्हतं. असं असतानाही त्याला शेती का बोलावत होती?

जयवंतची आयटी क्षेत्रातली नोकरी व्यवस्थित सुरू होती; मात्र आपलं मन इथं रमत नाहीये आणि आपल्याला इथं आनंदही मिळत नाहीये, ही गोष्ट त्याच्या काहीच दिवसांत लक्षात आली. काय करायला हवं हे मात्र त्याला काही केल्या कळत नव्हतं. कधी कधी लहानपणी सुट्टीत मामाच्या गावी शेतावर गेल्याच्या आठवणी जयवंतला येत असत. त्यातूनच एके दिवशी वीज चमकावी तसा शेती करण्याचा विचार त्याच्या मनात चमकून गेला. त्यानं लगेचच शेतीत काम करणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या आपल्या मित्रांशी चर्चा करायला सुरुवात केली. 

या क्षेत्रातल्या अडचणी, अडथळे आणि अपयश ठाऊक असतानाही जयवंतचं अस्वस्थ मन त्याला माघार घेऊ देत नव्हतं. जयवंतनं आपल्या आई-वडिलांजवळ मनातली गोष्ट बोलून दाखवली. त्याच दरम्यान जयवंतचं लग्नही ठरलं होतं. त्यानं आपल्या भावी पत्नीजवळही मनातली खदखद व्यक्त केली. ती, तिच्या घरातले आणि जयवंतचे आई-वडील या सगळ्यांनाच जयवंतच्या मनातली ही अस्वस्थता समजत होती; पण त्यावरचा उपाय म्हणजे शेती, ही गोष्ट त्यांना काही केल्या सुखावणारी नव्हती. कारण शेतीमधलं भीषण वास्तव त्यांना समोर दिसत होतं. तसंच वर्षानुवर्षं शेती करणाऱ्यांना त्यातले प्रश्न सोडवता येत नसताना, ज्याला शेतीमधलं शून्य ज्ञान आहे तो केवळ मनात आलं म्हणून नोकरी सोडून शेती करायचं म्हणतोय, हे त्यांच्या गळी उतरत नव्हतं; पण जयवंतच्या हट्टापुढे त्यांनी माघार घेतली आणि त्याला पाठिंबा दिला. 

अहमदनगर जिल्ह्यात पारनेरजवळ वाडेगव्हाण नावाच्या एका गावात जयवंतनं आपल्या दोघा मित्रांना बरोबर घेऊन ११ एकर जमीन खरेदी केली. नोकरीतले काही पैसे साठवले होते, त्या बचतीचा या वेळी उपयोग झाला. दरम्यान, जयवंत अनेक शेतीतज्ज्ञांना आणि शेती अभ्यासकांना भेटला. आपल्या मनातल्या शंकाकुशंकांचं निरसन त्यानं करून घेतलं. इतकंच नाही, तर अनेक शेतकऱ्यांना भेटून त्यानं त्यांचं शेतीतलं पारंपरिक ज्ञान आणि त्यांचा अनुभव याविषयी चर्चा केली आणि त्यावरही सखोल अभ्यास केला. आता उंटावरून शेळ्या हाकून चालणार नव्हतं. जयवंतला प्रत्यक्ष मातीत हात घालून काम करायचं होतं. तोच या शेतीचा मालक असणार होता आणि तोच शेतमजूर! कंपनीनंही जयवंतला शुक्रवारची सुट्टी मान्य केली. जयवंत पुण्याहून दर शुक्रवारी वाडेगव्हाणला पोहोचायचा. सोमवारी परत आपल्या कंपनीत दाखल व्हायचा. 

या जमिनीत पाण्याची सोय नव्हती. ती त्यानं सर्वप्रथम केली. शेतावर एका जोडप्याला कामासाठी नेमलं. आजूबाजूच्या परिसरातल्या शेतकऱ्यांशी जयवंतनं मैत्री केली. सुरुवातीला शेतीचा अनुभव नसल्यानं अनेक गोष्टींत अपयश येत गेलं. सगळ्यात सुरुवातीला जयवंतनं शेतीतून झेंडूच्या फुलांचं उत्पादन काढलं; मात्र वितरणाचा अनुभव नसल्यानं आणि कधी काय पिकवावं याचा अनुभव गाठीशी नसल्यानं त्यात त्याला तोटा सहन करावा लागला. 

शेतीतला अनुभव जेवढा महत्त्वाचा, तेवढंच त्यानंतरचं मालाचं वितरणही महत्त्वाचं, ही गोष्ट जयवंतच्या लक्षात आली. यातूनच बाजारपेठेचा अभ्यास झाला. अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये कसं उपयोगात आणता येईल, यावरही जयवंतनं अभ्यास केला. शेती करताना आधुनिक यंत्रणा वापरायचं ठरवलं आणि ते अंमलात आणलं. आजूबाजूच्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांना सामूहिक शेतीचं महत्त्व पटवून देऊन त्यानं त्यांनाही बरोबर घेतलं. रसायनांचे दुष्परिणाम ठाऊक असल्यानं जयवंतनं सेंद्रिय शेतीवरच आपला भर ठेवला. सेंद्रिय शेती करायची म्हटल्यावर त्याला जैविक खतं, कीटकनाशकं कशी तयार करायची याचाही अभ्यास करावा लागला. स्वतः या गोष्टी करून त्यांचा वापर त्यानं यशस्वीपणे करून बघितला. सुरुवातीला जयवंतनं तागाचं पीक घेतलं, तेव्हा त्यानं राख, शेण, गोमूत्र, निंबोळी यांचं मिश्रण करून त्याची फवारणी केली. राखेमध्ये पोटॅशियम जास्त असल्यानं पाण्याचा ताण सहन करण्याची तागाची क्षमता वाढली आणि परिणामी कमी पाण्यातही तागाचं पीक भरभरून आलं. जयवंतनं ठिबक सिंचन पद्धतीचाही शेतीत वापर केला. 

शेती करत असताना सगळ्यात महत्त्वाची समस्या होती ती शेतमजुरांची! त्यावर त्यानं एक वेगळाच उपाय काढला. आपल्याकडे ज्या शेतमजूर स्त्रिया काम करतात, त्यांच्यासाठी दर आठवड्याला (लकी ड्रॉप्रमाणे) एक चिठ्ठी काढायला त्यानं सुरुवात केली. जिचं नाव चिठ्ठीत निघेल, तिला एक गृहोपयोगी वस्तू भेट द्यायला सुरुवात केली. या भेटवस्तूंचं अप्रूप असल्यानं मजूर स्त्रियांची संख्या घटण्यावर निर्बंध आले. आजची भेटवस्तू काय असेल आणि ती कोणाला मिळेल, याची उत्सुकता आणि चर्चा प्रत्येक आठवड्याला स्त्रियांमध्ये सुरू झाली. 

शेती करताना जयवंत अनेक गोष्टी शिकला. एका वेळी एकच पीक घेतलं आणि कुठली नैसर्गिक आपत्ती आली, तर सगळं पीक जमीनदोस्त होतं आणि शेतकरी कोसळून पडतो. त्यामुळे एका पिकाबरोबर दुसरं (दुय्यम) पीक कुठलं घेतलं पाहिजे, नुकसान होण्याचा दर कमी कसा केला पाहिजे, हेही जयवंत शिकला. आसपासच्या शेतकऱ्यांनाही जयवंतनं सेंद्रिय शेतीचं महत्त्व पटवून दिलं आहे. रासायनिक शेती करण्यानं विनाकारण खर्च वाढतो, असं त्याचं म्हणणं आहे आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम वेगळेच. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची होणारी धूप थांबते आणि जमिनीची क्षमताही वाढते. डोंगराळ भागावर शेती फुलवणाऱ्या आणि भरपूर पीक घेणाऱ्या जयवंतला लोक बघताहेत. त्यामुळे त्यांचा त्याच्यावरचा आणि त्याच्या सेंद्रिय शेतीवरचा विश्वास वाढलाय. आता तेच जयवंतकडे सल्ला आणि मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात. सेंद्रिय शेतीमालाच्या विक्रीसाठी जयवंतनं ‘ओभाजीवाले डॉट कॉम’ नावाची वेबसाइटही सुरू केली. या सगळ्यांमधून जयवंतनं एप्रिल २०१६मध्ये ‘दी ऑरगॅनिक कार्बन प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची कंपनी स्थापन केली. आज जयवंतला त्याच्या कामात मालविका गायकवाड ही त्याची सहकारी बरोबरीनं मदत करतेय. ‘हम्पी ए-टू’ असं ब्रँडनेम ठेवून जयवंतनं देशी गाईचं दूध ऑनलाइन बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध केलं. शेतकऱ्यांकडून गोळा केलेल्या देशी गाईच्या दुधावर प्रक्रिया करण्यासाठी पुण्याजवळ भूगाव इथे जयवंतनं पाश्चयरायझेशन प्रक्रियेसाठीचा प्रकल्प उभारला आहे.  आपण बाजारात उपलब्ध असलेलं कुठलंही दूध घेतलं, तरी ते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये मिळतं. हेच प्लास्टिक कर्करोगाला हाक देणारं आहे. त्यामुळे आपण दूध न पिता प्रत्यक्ष रोगाला आमंत्रण देतो. म्हणूनच जयवंतनं दूध काचेच्या बाटल्यांमध्ये उपलब्ध करून दिलं आहे. गीर, साहिवाल यांसारख्या देशी प्रजातींच्या गायींचं दूध आरोग्याला कसं उपकारक आहे, याबद्दल जयवंत आणि मालविका जनजागृती करताहेत. तसंच शेतकऱ्यांना दुधाचा योग्य तो भाव मिळावा, म्हणून ते शेतकऱ्यांकडून ४० ते ४५ रुपये प्रति लिटर दराने दूधखरेदी करतात. ग्राहकांसाठी दर थोडा जास्त असला, तरी त्यांना खात्रीशीर, भेसळमुक्त, दर्जेदार दूध मिळतं. ए-वन दूध म्हणजे जर्सी, होलस्टीन यांसारख्या परदेशी प्रजातींच्या गायींचं दूध होय. ए-टू म्हणजे देशी प्रजातींच्या गायींचं दूध! जयवंत आणि मालविका यांच्या प्रयत्नांमधून फक्त पुणे शहरात ७०० लोक ए-टू दूध खरेदी करत आहेत. आता रोज नवनवीन शेतकरी आपल्या देशी गाईचं दूध विक्रीसाठी जयवंतकडे देण्यासाठी संपर्क साधताहेत. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाच्या आरोग्याविषयी जागरूक असलेले नागरिक जयवंतशी संपर्क साधून ए-टू दुधाची मागणी ऑनलाइन नोंदवताहेत. दुधाबरोबरच तुपासारखे दुग्धजन्य पदार्थ आणि देशी कोंबड्यांची अंडी आदींचीही उपलब्धता करण्यात आली आहे. शेतीविषयी काहीही माहिती नसताना जयवंतनं २००९ साली झपाटलेल्या अवस्थेत या क्षेत्रात उडी घेतली; मात्र त्यानं त्यातला सगळा कारभार जाणतेपणानं केला. शेती करणं किंवा दुधाचा व्यवसाय करणं म्हणजे एक कंपनी चालवण्यासारखंच आहे, असं जयवंत म्हणतो. इथल्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार करून शेतकरी ते ग्राहक यातले मध्यस्थ जयवंतनं काढून टाकले आहेत. ऑनलाइन विक्री उपलब्ध करून दिल्यामुळे वितरणाचा नवा मार्गही शेतकऱ्यांना उपलब्ध झाला आहे. तसंच सेंद्रिय भाज्या आणि फळं आणि ए-टू दूध यांच्यामुळे लोकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली गेली आहे. जयवंतचे आई-वडील आणि त्याची डॉक्टर पत्नीही त्याला या उद्योगात प्रोत्साहन देताहेत. 

‘आयटी ते शेतकरी’ हा जयवंत पाटील याच्या प्रवासावरचा एक धडा अकरावीच्या मराठीच्या पुस्तकात सामील करण्यात आला आहे. डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनीही जयवंतला पत्र पाठवून त्याच्या कामाची प्रशंसा केली आहे. शेतीमध्ये अनिश्चितता आहे, अनेक समस्या आहेत. असं असतानाही जयवंतचा मूळ स्वभाव अडचणींचा बाऊ करण्याचा नसल्यामुळे तो हताश होत नाही. उलट समोर आलेल्या आव्हानांना तोंड देऊन त्यावर उपाय शोधून पुढे जातोय. ‘कुठल्याही कामातला निर्मितीचा आनंद खूप मोठा असतो आणि तो मला मिळतोय,’ असं जयवंत म्हणतो. त्याला खूप शुभेच्छा!!!

(जयवंतच्या प्रवासाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)

संपर्क : जयवंत पाटील - ७६२०९ ९८१११

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 103 Days ago
His methods would help others , if only they know them .
0
0
Pandurang Chaudhari About 334 Days ago
Really inspirational story those who have from farming...old traditional farming is the base of our farming ..now day new innovative idea come in our farming and develop new market..
0
0
Shirin Kulkarni About
खूप सुंदर लेख दिपा ताई. जयवंत यांचं अभिनंदन!
0
0

Select Language
Share Link
 
Search