Next
दक्षिण काशी ‘पैठण’चं वैभव सांगणारं पुस्तक
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Tuesday, March 27, 2018 | 10:27 AM
15 0 0
Share this story

डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांचा पैठणसंबंधीचा दांडगा अभ्यास सर्वश्रुत आहे. ‘प्रतिष्ठान ते पैठण’ या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी पैठणचं पूर्वापार असलेलं महत्त्व, पैठणची ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडण, तिथे नांदलेल्या विविध घराण्यांच्या सत्ता, पैठणची संस्कृती आणि पैठणची विशेष ओळख असणारा वस्त्रोद्योग अशा विविध अंगांनी अत्यंत वस्तुनिष्ठपणे करून दिला आहे... त्या पुस्तकाचा हा परिचय...
..........
१९८७ साली पुण्याच्या रविराज प्रकाशनने डॉ. मोरवंचीकर यांच्या ‘पैठण थ्रू एजेस’ या संशोधनावर आधारित ‘दक्षिण काशी पैठण’ हा ग्रंथ प्रकाशित केला होता. महाराष्ट्र शासनाने त्या ग्रंथाचा गौरव केला होता. चाळीस वर्षांपूर्वीच्या त्या ग्रंथाला अजूनही मागणी आहे हे जाणून ‘विद्या प्रकाशन’ या औरंगाबादच्या पाठ्यपुस्तक प्रकाशनात अग्रगण्य असणाऱ्या संस्थेनं त्या दुर्मीळ ग्रंथाची दुसरी आवृत्ती ‘प्रतिष्ठान ते पैठण’ या नावानं काढली आहे. 

२२८ पृष्ठांचा हा ग्रंथ वाचताना आपल्याला पानोपानी जाणवत राहतो तो डॉ. मोरवंचीकर यांचा जबरदस्त अभ्यास आणि चिकित्सा. केवळ संदर्भग्रंथ नव्हे, तर पुरातत्त्वीय संशोधन, पुरावे, उत्खननांत आढळलेली शिल्पं, नाणी, मातीचे थर आणि इतर ऐतिहासिक आणि साहित्यिक साधनं यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी हा ग्रंथ सिद्ध केला आहे.

पुस्तकाच्या आठ प्रकरणांमधून त्यांनी पैठणची प्रादेशिक विशेषता, ऐतिहासिक महत्त्व, धार्मिक वाटचाल आणि सद्य परिस्थिती, आर्थिक आणि वाणिज्य बाजू, वस्त्रोद्योग आणि लोकजीवन यांवर सविस्तर लेखन केलं आहे. आर्यांनी येऊन आपली बैठक वसवल्यानंतर पुढे अनेक राजवटी होऊन गेल्या. अश्मक आणि मूलक ही महाजनपदं, पुढे पेतनिक, नंद, मौर्य आणि शेवटी सातवाहन अशा प्रमुख राजसत्ता पैठणमध्ये होऊन गेल्या. दक्षिण काशी म्हटलं गेलेल्या पैठणच्या परिसरात शेकडो दंतकथा आणि लोकगीतं प्रचलित आहेत. उदाहरणार्थ -

पैठण वस्ती, अजब दिसती
वस्ती नागांची, कैक वर्षांची
वस्ती होती शालू शंखाची
राजा शालिवाहनाची..

गाहा सत्तसई (गाथा सप्तशती) या ग्रंथामधूनही पैठणची माहिती मिळते. सातवाहन ऊर्फ सालाहण ऊर्फ शालिवाहन हे पैठणवर जवळपास साडेचारशे वर्षं सत्ता गाजवणारं प्रमुख घराणं होतं. क्षत्रपांशी सततच्या लढायांमुळे झालेल्या सातवाहन घराण्याच्या विनाशाबरोबरच पैठणचं वैभव आणि समृद्धी लयाला गेली असं अनुमान काढलं जातं. पैठणवर क्षत्रपांनंतर वाकाटक, त्यानंतर अल्प काळ चालुक्य, पुढे राष्ट्रकूट आणि शेवटी यादव घराण्याची सत्ता होती. पैठणमधल्या काळानुसार बदलत गेलेल्या धार्मिक परिस्थितीचा हिंदू वैदिक धर्म, जैन धर्म, बौध धर्म, वारकरी पंथ, भागवत धर्म, संत परंपरा, नाथ संप्रदाय अशा विविध अंगांनी गोषवारा पुढल्या काही प्रकरणांमधून घेतला आहे.

या पुस्तकातलं एक प्रकरण फारच विलक्षण आहे, ते म्हणजे पैठणमधल्या वस्त्रोद्योगाची इत्थंभूत माहिती! अगदी पैठणी शालू आणि महावस्त्राची निर्मिती प्रक्रिया, रेशीम स्वच्छ करणे, गुंडाळणे, जर काढणे, जर चढवणे, रेशीम रंगवणे, नक्षी विणणे विणीचे प्रकार, उभ्या-आडव्या धाग्यांमधला रंगबदल, गाठ न मारता उभा धागा विणणे, किमखाब/मशरू/हिमरू हे प्रकार, पेशवेकालीन पैठणीपासून ते विणकर समाजाच्या भवितव्यापर्यंत साद्यंत माहिती या प्रकरणातून डॉ. मोरवंचीकर यांनी दिली आहे.
 
शेवटच्या ‘लोकजीवनाचे काही पैलू’ या ५८ पानांच्या लेखातून पूर्वीच्या काळापासून बदलत गेलेलं समाजजीवन, कर्मकांड, स्त्रीजीवन, धर्मसभा, सणसमारंभ, कला, शिल्पवैभव यांच्याविषयी विस्तृत माहिती मिळते. 

इतिहासप्रेमींनी आणि विशेषतः मराठवाडा आणि पैठणविषयी अभिमान बाळगणाऱ्यांनी जरूर वाचावंच, असं हे डॉ. मोरवंचीकर यांचं  ‘प्रतिष्ठान ते पैठण’ हे पुस्तक आहे!

पुस्तक : प्रतिष्ठान ते पैठण
लेखक : डॉ. रा. श्री. मोरवंचीकर
प्रकाशक : शशिकांत पिंपळापुरे, विद्या बुक्स पब्लिशर्स, औरंगाबाद  
संपर्क : (०२४०) २३३७३७१   
पृष्ठे : २२८ 
मूल्य : ३१० ₹ 

(‘प्रतिष्ठान ते पैठण’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link