Next
पत्रकारांएवढेच वृत्तपत्र लेखकांनाही महत्त्व
सुकृत खांडेकर यांचे प्रतिपादन
BOI
Thursday, August 29, 2019 | 06:06 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरीच्या ‘कोकण मीडिया’ला मिळालेला उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार संपादक प्रमोद कोनकर यांना सुकृत खांडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सोबत संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, ज्येष्ठ पत्रकार विकास वाळुंजकर.

मुंबई :
‘पत्रकारांप्रमाणेच समाजातील अनेक समस्यांबाबत वृत्तपत्र लेखक वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या सदरातून आपले विचार मांडतात. विविध उपाय सुचवतात. त्यामुळे त्यांनाही वृत्तपत्रांमध्ये पत्रकारांएवढेच महत्त्व असते. म्हणूनच कोणत्याही वृत्तपत्रांमध्ये संपादकीय पानावरच वृत्तपत्र लेखकांच्या पत्रांना स्थान दिले जाते,’ असे प्रतिपादन ‘नवशक्ति’चे संपादक सुकृत खांडेकर यांनी केले.

मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा ७०वा वृत्तपत्र लेखक दिन आणि ४४वा दिवाळी अंक पुरस्कार सोहळा मुंबईतील ताडदेव व्यायामशाळेतील रुसी मेहता सभागृहात नुकताच पार पडला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सत्तर वर्षांपूर्वी ‘नवशक्ति’चे तत्कालीन संपादक प्रभाकर पाध्ये यांनी गिरगावच्या तांबे उपाहारगृहात २२ ऑगस्ट रोजी पहिला वृत्तपत्र लेखक मेळावा भरविला होता. तेच औचित्य साधून या वर्षी श्री. खांडेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण करण्यात आले होते. 

त्या वेळी बोलताना खांडेकर पुढे म्हणाले, ‘कोणतेही वृत्तपत्र हे कोणत्याही संचालकांचे किंवा संपादकांचे नसते, तर ते वाचकांचेही असते. त्यातील लेखनाची उर्मी असलेले काही जण स्थानिक समस्यांसह ज्वलंत आंतरराष्ट्रीय प्रश्नावर नवे विचार देण्याचे काम अतिशय प्रभावीपणे करीत असतात. ७० वर्षांपूर्वी सुरू झालेले मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे चाललेले काम निर्विवादपणे समाजोपयोगी आणि दखल घेण्यासारखे आहे. लोकमानसाची दिशा अलीकडे प्रिंट माध्यमांसह इलेक्ट्रॉनिक मीडिया व मोठ्या प्रमाणात वापर होत असलेल्या सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. परंतु लोकमानसाची बूज राखत खऱ्या अर्थाने जनमनाचा कानोसा घेणारा आणि संपादकीय पानावर मानाने मिरवणारा वाचकांच्या पत्रव्यवहाराचा स्तंभ निर्विवाद महत्त्वाचा आहे. दादर येथील महापालिकेच्या शिंदेवाडी शाळेत असलेले कार्यालय महापालिकेने सील केले आहे. संस्थेच्या कार्यात अडचणी आणण्याचा अथवा तो आवाज दाबण्याचा सरकार किंवा प्रशासनाकडून प्रयत्न होत असेल तर न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमच्यासोबत सदैव असेन.’

संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी संघाच्या ७० वर्षांच्या कारकिर्दीचा आलेख मांडताना मुंबई महापालिका, राज्य सरकारकडून संस्थेला कसे बेघर करण्याचा प्रयत्न होत आहे आणि न्याय मिळत नसल्याविषयी खंत व्यक्त केली. संघाचे साठावे संमेलन पुण्यात भरविण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन ज्येष्ठ पत्रकार विकास वाळुंजकर यांनी दिले.

ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक आणि पत्रलेखन चळवळीत सक्रिय योगदान असलेले नंदकुमार रोपळेकर आणि दत्ताराम घुगे यांना या वेळी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. संघाने आयोजित केलेल्या ४४व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. 

विजेते दिवाळी अंक असे - का. र. मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक - शब्ददीप (पुणे), पु. ल. देशपांडे स्मृती उत्कृष्ट अंक - पुण्यनगरी (कोल्हापूर), गणेश केळकर स्मृती उत्कृष्ट अंक - रायगड माझा (कर्जत), साने गुरुजी स्मृती उत्कृष्ट अंक - उद्याचा मराठवाडा (नांदेड), प्रतापराव माने स्मृती उत्कृष्ट अंक - मुंबई तरुण भारत (मुंबई), पांडुरंग रा. भाटकर स्मृती उत्कृष्ट अंक - कमलदूत (पुणे), कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट अंक - लोकजागर (सातारा), कोकण मीडिया (रत्नागिरी), तेजोमय (पुणे), मोहनगरी (पुणे), अक्षरभेट (मुंबई), वास्तव (मुंबई), जीवनज्योत (मुंबई), (अमेरिका), बदलते जग (कोल्हापूर), शब्दालय (श्रीरामपूर), वसंत (मुंबई), मुक्तछंद (महाड), क्षत्रिय संजीवनी (मुंबई), संयम (भाईंदर), जीवनज्योत (मुंबई), रानभरारी (शहापूर ठाणे), उत्सवप्रभा - ब्लॅक व्हाइट टू कलर (मुंबई), दीपस्तंभ (मुंबई), पृथा (पुणे).

कार्याध्यक्ष रमेश सांगळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले. कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांनी आभार मानले. समारंभाला नगरसेविका उर्मिला पांचाळ, मराठी विज्ञान परिषदेचे अ. पां. देशपांडे, ताडदेव व्यायामशाळेचे सेक्रेटरी सुरेश सांगळे, मराठी साहित्य अकादमीचे प्रकाश भातंब्रेकर, सुप्रसिद्ध विनोदी लेखक सुधीर सुखटणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search