Next
अंध, अपंगांचा ‘स्वाधार’
BOI
Friday, November 03, 2017 | 03:43 PM
15 0 0
Share this article:

अंध, अपंग व्यक्तींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांचे अंधारलेले आयुष्य रोजगाराच्या दिव्याने उजळवण्याचे कार्य ‘स्वाधार’ या अंध अपंग पुनर्वसन केंद्रामार्फत गेली ३६ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. अंधांना स्वतःच्या पायावर उभे राहता येण्यासाठी हातमाग विणकाम आणि अॅक्युप्रेशर मसाजचे प्रशिक्षण येथे दिले जाते. ‘लेणे समाजाचे’मध्ये आज पाहू या त्या संस्थेच्या कार्याबद्दल...
..........
अंध, अपंग व्यक्तींकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो. ‘डोळस’ लोकांच्या समाजात वावरताना या लोकांची कुचंबणा होते. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. केवळ व्यवहाराची भाषा जाणणाऱ्या आजच्या जगात माणसामधली संवेदनशीलता हरवत चालली आहे, असे नेहमीच म्हटले जाते; मात्र वंचितांसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या माणसांना पाहिले की माणुसकी अजूनही जिवंत  असल्याची प्रचिती येते. हरिश्चंद्र सुरेश हे अशांपैकीच एक आहेत. हरिश्चंद्र हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून, ते स्वतः अंध आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. या लोकांसाठी काही तरी काम करावे या हेतूने पुणे येथून या संस्थेच्या कामाला सुरुवात झाली. अपंग आणि विशेषतः अंध व्यक्तींसाठी ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानद्वारे ‘स्वाधार’ या अंध, अपंग व्यक्तींच्या पुनर्वसन केंद्राची स्थापना केली गेली.

संस्थेतील अपंग व्यक्तींनी हातमाग यंत्रावर बनवलेल्या वस्तू१९८१पासून म्हणजेच गेली ३६ वर्षे या संस्थेचे काम सुरू आहे. सध्या या संस्थेचे कामकाज बुधोडा (ता. औसा, जि. लातूर) येथून चालते आहे. या केंद्रात १८ वर्षांपासून पुढील वयोगटातील महिला, पुरुष आहेत. या व्यक्तींनाही समाजात सन्मानाने जगता यायला हवे, ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असायला हवेत या हेतूने संस्थेमार्फत त्यांना हातमाग विणकाम आणि अॅक्युप्रेशर मसाज या विषयांचे विशेष प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया एक वर्ष सुरू असते. प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर या व्यक्तींना थेट रोजगार मिळावा यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असते.

अॅक्युप्रेशर मसाजचे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले अंध, अपंग प्रशिक्षणार्थी लातूरहून थेट मुंबई, पुणे आदी ठिकाणी स्वतः येऊन लोकांना मसाज सेवा पुरवतात. बुधोडा येथेच विणकामासाठी शेड उभारण्यात आली असून, तेथे सुमारे ३५ जण विणकाम करतात. जुन्या, टाकाऊ साड्या, ओढण्या, बेडशीट, फेटे, धोतर यांसारखे कपडे संस्थेत देऊन लोकांना त्यापासून अत्यंत आकर्षक आणि दर्जेदार सतरंज्या, पायपुसणी, आसनपट्ट्या तयार करून दिल्या जातात. त्यातून या व्यक्ती अर्थार्जन करतात.   

संस्थेमार्फत लग्न लावून देण्यात आलेली जोडपीकेवळ प्रशिक्षण देणे हा संस्थेचा मूळ हेतू नसून, प्रशिक्षणाबरोबरच त्यांना रोजगार मिळवून देणे आणि मुख्य म्हणजे या व्यक्तींचे सामाजिक पुनर्वसन करणे यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. या व्यक्ती अंध आणि अपंग असल्या, तरीही माणूस म्हणून जगण्याचा त्यांनाही हक्क आहे. या व्यक्तींचे सामाजिक पुनर्वसन करताना त्यांचे लग्न लावून देणे, त्यांना घर देणे हाही एक महत्त्वाचा भाग आहे. दानशूरांच्या मदतीने संस्थेमार्फत आतापर्यंत अशा ३६ जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले आहेत. त्यांचे संसार सुरळीतपणे सुरू आहेत.

ही संस्था विनाअनुदानित असल्याने संस्थेचा सर्व खर्च देणगीदारांच्या सहकार्याने भागविला जातो. या उपक्रमात आता ‘मानव वेदनामुक्ती केंद्र’ या नवीन निसर्गोपचार केंद्र प्रकल्पाची भर पडत आहे. त्यासाठी सव्वा कोटी रुपयांची आवश्यकता असून, २५ लाखांचा निधी उभा राहिला आहे; मात्र उर्वरित एक कोटीच्या निधीसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी हात पुढे करण्याची गरज आहे, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.
या संस्थेच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा!

संपर्क : स्वाधार केंद्र, बुधोडा, ता. औसा, जि. लातूर
फोन : (०२३८३) २३६६११, २३६६१३
ई-मेल : gsp.rural@gmail.com


(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)

(संस्थेची माहिती देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search