Next
‘समाजात विषमता असेपर्यंत समाजवाद संपणार नाही’
आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Saturday, June 22, 2019 | 11:44 AM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘जग हे भांडवलशाही आणि उजवीकडे घरंगळत आहे, समाजवाद संपत चालला आहे, असे बोलले जात आहे; मात्र समाजात विषमता आणि असमानता असेपर्यंत समाजवाद संपणार नाही,’ असे प्रतिपादन आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य यांनी केले. 

ज्ञान फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा लोकनेते भाई वैद्य कृतज्ञता पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते अॅड. संतोष म्हस्के यांना डॉ. अभिजित वैद्य आणि ज्येष्ठ पत्रकार मल्हार अरणकल्ले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी डॉ. वैद्य बोलत होते. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि नेते भाई वैद्य यांच्या ९१व्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २१ जून २०१९ रोजी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

डॉ. वैद्य म्हणाले, ‘भाई वैद्य हे एक विद्यापीठ होते. ते कार्यकर्त्यांवर वैचारिक छत्र धरीत आणि लढ्याची तलवार हाती देत असत. अॅड. संतोष म्हस्के यांनी भाईंच्या विचाराचा गाभा पकडून कष्टकऱ्यांसाठी कार्य केले. भाई गेले  पण ‘मरावे परी कार्यकर्त्यांरूपी उरावे’ ही नवी उक्ती सिद्ध झाली आहे.’ 

‘सध्या आपण बिकट कालखंडातून जात आहोत. ‘जागतिकीकरणानंतर आर्थिक विषमता वाढेल आणि ती सामाजिक विषमतेला वाढवेल,’ हा भाईंनी दिलेला इशारा खरा ठरला आहे. जग भांडवलशाही आणि उजवीकडे घरंगळत आहे, समाजवाद संपत चालला आहे, असे बोलले जात आहे; मात्र जोपर्यंत समाजात विषमता आणि असमानता आहे तोपर्यंत समाजवाद संपणार नाही. सामाजिक, आर्थिक आघाडीवरील लढाया समाजवादी कार्यकर्ते लढत आणि जिंकत आले; मात्र राजकीय परिवर्तनाची लढाई जिंकणेही भाईंना अभिप्रेत होते. त्यासाठी भक्कमपणे, निर्धाराने आणि उपेक्षा वाट्याला आली, तर ती सहन करीत पुढे गेले पाहिजे.’

पत्रकार अरणकल्ले म्हणाले, ‘भाईंचा प्रवास हा सत्याच्या आग्रहाचा, ध्यासाचा प्रवास होता. त्यांचे विचार पारदर्शी होते. श्रोत्यांना विषय उलगडून सांगणे ही त्यांची खासियत होती. व्रतस्थ जीवन जगायचे ठरवून भाईंनी निरनिराळ्या क्षेत्रात काम उभे केले. भाई वैद्य हे निर्मळ मनाचे, निर्मळ कामे करणारे निरलस माणूस होते. त्यांनी समाजवादी विचारांचे निर्मळ झरे निर्माण केले. हे झरेच दूषित प्रवाहांना शुद्ध करतील.’

सत्काराला उत्तर देताना अॅड. म्हस्के म्हणाले, ‘भाई वैद्य आणि जयवंत मठकर यांनी जीवनाला दिशा दिली. भाईंच्या विचारांचे अनेक पाईक आहेत, त्यांचा प्रतिनिधी म्हणून हा कृतज्ञता पुरस्कार स्वीकारत आहे. हा पुरस्कार म्हणजे भाईंचे विचार पुढे नेण्याचा कार्यक्रम आहे. भाईंच्या विचाराचा गौरव आहे. सातत्य ठेवले, तर कष्टकऱ्यांच्या लढाईत यश मिळते, हा मंत्र भाईंनी कार्यकर्त्यांना दिला.’ 

या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मनोहर कोलते, अर्चना मुंद्रा, सचिन शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 96 Days ago
Socialism is also about problems which have nothing to do with inequality . When there is an epidemic , it has nothing to do with inequality . Yet , it is a problem for the Society , -- not for any individual .
0
0
BDGramopadhye About 115 Days ago
Inequality based on merit will exist -- always . Equality of opportunity to improve one' s lot , must remain open . That what Hinduism did not provide , but Islam did . One reason why dalits were attracted to Islam , as I see it .
0
0

Select Language
Share Link
 
Search