Next
‘चांगल्या कामातून मिळणारा आनंद लाखमोलाचा’
प्रेस रिलीज
Tuesday, January 30, 2018 | 06:27 PM
15 0 0
Share this story

डावीकडून शैला टिळक, विलास चाफेकर, चंद्रशेखर शेठ, बाळकृष्ण भागवत व विजयकुमार मर्लेचा.

पुणे : ‘सामाजिक कार्याला पैशाची कुठेही कमतरता नसते. त्या कार्याची आवड आणि झोकून देऊन काम करण्याची तयारी असेल, तर पैसा उभा राहतो. एखादे चांगले काम केले, तरी त्यातून मिळणारा आनंद हा लाखमोलाचा असतो. या आनंदाची अनुभूती प्रत्येक नागरिकाने घ्यावी,’ असे मत सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर शेठ यांनी व्यक्त केले.

वंचित विकास संस्थेतर्फे अरूणा मोहन गाडगीळ या दांपत्याच्या स्मृतीनिमित्त सामाजिक कार्यासाठी निरपेक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘अरूणा-मोहन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार शैला टिळक आणि बाळकृष्ण भागवत यांना सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर शेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी वंचित विकासचे संस्थापक डॉ. विलास चाफेकर, संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, उपाध्यक्ष व संचालिका सुनीता जोगळेकर, कार्यवाह मीना कुर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल,पुष्प असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

चंद्रशेखर शेठ म्हणाले, ‘सामाजिक कार्य म्हणजे खूप अवघड काम असते असे नाही. प्रत्येक व्यक्ती हे काम करू शकते. इतरांसाठी लहान लहान काम करूनही सामाजिक कार्यात सहभागी होता येते. त्यामुळे प्रत्येकाने चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा.’

बाळकृष्ण भागवत म्हणाले, ‘समाजामध्ये विश्वास संपादित केला, तर मदत करणाऱ्या हातांची कमतरता जाणवत नाही. यातून मिळणारे समाधान लाखमोलाचे असते. यामुळेच आयुष्याचा शंभरीपर्यंत वंचित बांधवांसाठी काम करेल, याचा विश्वास वाटतो.’

‘वंचित विकास संस्थेसाठी काम करणे ही नेहमीच आनंददायी बाब असते. यापुढेही जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत संस्थेसाठी काम करत राहणार. संस्थेमुळे ज्यांचा विकास झाला त्यांनी पुढे येऊन संस्थेच्या कार्यामध्ये सहभाग घ्यावा,’ असे आवाहन टिळक यांनी केले.

या वेळी संस्थेतर्फे अभया महिला गटातील महिलांना देण्यात आलेल्या उद्योजकता प्रशिक्षणातील सहभागी मृणाल शुक्ला, अंकिता गोंगले, धनश्री डोके, जेनी लामा, प्रमिला राव, वैशाली पुरकर, माधवी कुंभार, अनघा खिस्ती, अलका गुंजनाळ, अनुजा पाटील, लीनता साने, रिताराणी शितोळे, पल्लवी वाघ यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीना कुर्लेकर यांनी केले. देवयानी गोंगले यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link