Next
कारवाँ गुजर गया...
BOI
Sunday, July 29, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आपल्या आशयसंपन्न कवितांमुळे हिंदी साहित्यात आदराचे स्थान मिळविलेले आणि अनेक हिंदी चित्रपटांसाठी अत्यंत सुंदर, अर्थपूर्ण गीते लिहिणारे कवी गोपालदास सक्सेना (नीरज) यांचे १९ जुलै २०१८ रोजी निधन झाले. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज पाहू या ‘कारवाँ गुज़र गया...’ या त्यांच्या अप्रतिम अशा ‘सुनहऱ्या’ गीताबद्दल...
.......
‘सुनहरे गीत’ सदरामध्ये तुला कवी नीरज यांचे गीत घ्यावेसे, वाटत नाही का,’ असा प्रश्न मीच मला साधारण महिन्याभरापूर्वी विचारला होता. कारण या सदरात लिहिताना साहीर, शैलेंद्र, शकील, मजरूह, प्रेम धवन, इंदिवर या सगळ्यांच्या ‘सुनहऱ्या’ गीतांबद्दल लिहून झाले; पण ‘कारवाँ गुजर गया’ हे माझे आवडते गीत ज्यांनी लिहिले त्या गोपालदास नीरज यांचा मी या सदरात आजपर्यंत उल्लेखही केला नव्हता. त्यामुळेच या गीतावर लिहायचे असे महिन्याभरापूर्वी ठरवले आणि तेवढ्यात १९ जुलै २०१८ रोजी त्यांच्या निधनाची वार्ता आली. त्यामुळे आजच्या दिवसासाठी पूर्वनियोजित असलेला लेख बाजूला ठेवून या लेखाला सुरुवात केली. 

जुलै महिन्यामधील अशुभ वार्तांत आणखी एका वार्तेची भर टाकून १९ जुलैच्या रात्रीचा अंधार चढत जात असताना बाहेरच्या पावसांच्या धारांवर बसून आठवणींचा कारवाँ डोळ्यापुढे आला. १९७९ साल आठवले आणि ‘सपने झरे फूलसे’चा अनुभव देणारा माझ्या जीवनातील प्रसंग व ते दु:ख सुसह्य करणारा रफी, संगीतकार रोशन व कवी नीरज सारेच आठवले. तेव्हा माझ्या ओठांवर, मनात, हृदयात तेच गीत होते. शैलेंद्रचा चाहता असूनही नीरज मला भावला होता, माझा आपला झाला होता.

कवी काव्य लिहून जातो; पण ते कधी, कुणाला, केव्हा, कसे भावेल हे सांगता येत नाही. मी तसे काव्याचे अनुभव घेतले आहेत. नीरज यांच्या निधनाच्या वार्तेमुळे ते सारे आठवले. नीरज यांचे निधन अकाली नव्हते. चार जानेवारी १९२४ ही त्यांची जन्मतारीख. म्हणजे आता ते ९४ वर्षांचे होते. त्यामुळे त्यांचे निधन अकाली नव्हते; पण अकाली आला काय आणि निसर्गक्रमानुसार आला काय? मृत्यू तो मृत्यूच ना! नीरज यांच्याच शब्दांत सांगायचे तर - ‘शो तीन घंटे का... पहला घंटा बचपन है, दुसरा जवानी है और तिसरा बुढापा है!’ हा तिसरा तास कोणाच्या जीवनात दीर्घ काळाचा असतो, तर कोणाच्या जीवनात अल्पकाळाचा असतो.

नीरज एक दीर्घ आयुष्य जगले असले, तरी ते चित्रपटसृष्टीत उशिराच आले. अलीगढमध्ये त्यांचे शिक्षण झाले आणि तेथील विश्वविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागले. कविता करणे, काव्यसंमेलनात कविता सादर करणे अशा पद्धतीने जीवन जगत असतानाच नऊ फेब्रुवारी १९६० रोजी ते मुंबईला आले आणि तेथे त्यांची आर. चंद्रा या त्यांच्या माजी विद्यार्थ्याशी योगायोगाने भेट झाली. आर. चंद्रा चित्रपट निर्माते झाले होते व त्या वेळी ते ‘नई उमर की नई फसल’ या आपल्या नवीन चित्रपटाच्या निर्मितीत व्यग्र होते. त्यांना आपल्या शिक्षकांचा काव्यछंद माहीत होता आणि नीरज यांनीही हिंदी साहित्यात बऱ्यापैकी स्थान मिळवले होते. त्यामुळेच आपल्या या नवीन चित्रपटासाठी गाणी लिहिण्याचे काम त्यांनी नीरज यांच्यावर सोपवले.

काव्याचे एक भांडार कवी नीरज यांच्याजवळ होते व त्यातीलच एक अनमोल रत्न म्हणजे ‘कारवाँ गुजर गया...’ हे काव्य! ‘नई उमर की नई फसल’ चित्रपटासाठी अन्य तीन गीतेही नीरजनी दिली! ती सारीच लोकप्रिय ठरली. नंतर ‘चा चा चा’ या चित्रपटातील ‘सुबह न आयी...’ आणि ‘वो हम न थे...’ ही दोन गीतेही लोकांना खूप भावली आणि नीरज यांचे नाव चित्रपटसृष्टीत दुमदुमू लागले. शंकर-जयकिशन यांच्या संगीतातील नीरज यांची गीते जवळजवळ १६ चित्रपटांतून रसिकांपर्यंत पोहोचली. त्यामध्ये दुनिया, कन्यादान, चंदा और बिजली, मेरा नाम जोकर इत्यादी चित्रपट होते. तसेच संगीतकार एस. डी. बर्मन व नीरज या जोडीनेही प्रेमपुजारी, गॅम्बलर, शर्मिली, तेरे मेरे सपने इत्यादी चित्रपटातून उत्तम गीतांची मेजवानी चित्रपटप्रेमींना दिली. १९६४ ते १९९६ या कालावधीत नीरज चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. १९७१ हे वर्ष तर त्यांच्यासाठी खूप वेगळे ठरले. कारण त्या वर्षात प्रदर्शित झालेल्या दहा चित्रपटांत त्यांनी लिहिलेली गीते होती व त्यातील बहुतांश गीते लोकांना आवडली. 

१९७० नंतर हिंदी चित्रपटगीतांत जो काही टवटवीतपणा व आशयसंपन्नता दिसून येते, त्यामध्ये नीरज यांचा महत्त्वाचा वाटा आहे. अशा या प्रतिभासंपन्न गीतकाराला तीन वेळा फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाला. तसेच सरकारनेही त्यांना पद्मभूषण सन्मान देऊन गौरविले. नीरज यांच्या कारकिर्दीबद्दलचा धावता आढावा घेतल्यानंतर आता आपण त्यांच्या गीताकडे वळू या. आयुष्य कळत-नकळत सरून जाते. वयाच्या एखाद्या टप्प्यावर, जीवनाच्या एखाद्या वळणावर आयुष्यातील सुख दु:ख, यश-अपयश, चढ-उतार, मिलन-विरह सारे सारे आठवून मन विचारांच्या खोल गर्तेत जाते. त्या क्षणी आठवते ते नीरज यांचे ‘कारवाँ गुजर गया’ हे काव्य. अशीच एका आयुष्याची शोकांतिका शब्दांत उतरवताना नीरज लिहितात...
लूट गए सिंगार सभी बाग के बबूल से, 
और हम खड़े खड़े बहार देखते रहे 
कारवाँ गुज़र गया, गुबार देखते रहे

(बघा माझ्या आयुष्यात काय घडले) फुलासारखी नाजूक, सुंदर स्वप्ने (एकामागून एक) विरत गेली. (ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम केले, ती आपली माणसे माझ्या मनाला क्लेश देऊन गेली. त्या) सुहृद समजलेल्यांचे वागणे एखाद्या सुळाप्रमाणे (टोकदार काट्याप्रमाणे) टोचत राहील. बागेत आलेल्या वावटळीने माझ्या स्वप्नीचे साजशृंगार उद्ध्वस्त झाले आणि मी (असहायपणे) उभा राहून तो उद्ध्वस्त वसंत बहार बघत राहिलो. एक सौख्याचा तांडा जसा (मला सौख्य न देता) निघून गेला आहे आणि मी त्याची उडालेली धूळ बघत आहे.

यानंतर पहिल्या कडव्यात कवी नीरज लिहितात...

नींद भी खुली ना थी के हाय धूप ढल गयी 
पाँव जब तलक उठे, के जिंदगी फिसल गयी 
पात पात झर गये, के शाख शाख जल गयी 
चाह तो निकल सकी ना, पर उमर निकल गयी 
गीत अश्क बन गए, स्वप्न हो दफन गये 
साथ के सभी दिए धुवाँ पहन पहन गये 
और हम झुके-झुके मोड पर रुके-रुके 
उम्र के चढाव का उतार देखते रहे 
कारवाँ गुज़र गया, गुबार देखते रहे

झोपेतून डोळे उघडले होते-नव्हते तोच उन्हे कलली. (जाणीव जागृत होते न होते तोच आयुष्यातील महत्त्वाची वर्षे संपून गेली. एक सुख हातात येताच क्षणात निसटून गेलं.) पावले उचलतो ना उचलतो, तोच पायाखालून आयुष्य सरून गेलं. (जीवनवृक्षाचे) पान अन् पान गळून गेले आणि फांदी अन् फांदी (दुःखाच्या वणव्यात) जळून गेली. एखादी (अधुरी) इच्छा पुरी होते न होते, तोच आयुष्य सरून गेलं. (ओठांवर येणारी सौख्याची) गाणी अश्रू बनून गेली. (मनात योजलेली, पूर्ण होतील अशी आशा असलेली सर्व) स्वप्ने (काळाच्या तडाख्याने) गाडून टाकली गेली आहेत. माझ्या बरोबर असणारे (आशेचे) प्रकाशदीप (निराशेच्या) धुराने काळवंडून गेले आहेत. (आणि हे सारे पाहत थकून भागून) वाकलेला (परिस्थितीने वाकवलेला) मी आयुष्याच्या एका वळणावर थांबून, उभारी घेतलेले आयुष्य उतरणीला लागलेले पाहत आहे. 

एका सौंदर्याचे सौख्य मिळून लगेच गेले, त्याबद्दल कवी लिहितात -

क्या शबाब था के फूल-फूल प्यार कर उठा 
क्या कमाल था के देख आईना सहर उठा 
इस तरफ जमीन और आसमाँ उधर उठा 
थामकर जिगर उठा के जो मिला नजर उठा 
एक दिन मगर यहाँ ऐसी कुछ हवा चली 
लूट गयी कली कली के घुट गयी गली-गली 
और हम लूटे-लूटे, वक्तसे पीटे पीटे 
साँस की शराब का खुमार देखते रहे 
कारवाँ गुज़र गया, गुबार देखते रहे

काय सौंदर्य होते ते (की ज्याच्यावर) फूल अन् फूल (सुद्धा) प्रेम करायचे. (त्या सौंदर्यामुळे) काय कमाल घडायची, की ते सौंदर्य बघून आरसाही कंपित व्हायचा. (त्या सौंदर्यामुळे) एका बाजूने जमीन व दुसऱ्या बाजूने आकाश उभारून जायचे. (मीही एक दिवस) एक जिगर मनात ठेवून (त्या) नजरेला नजर मिळवली. (नंतर) एक दिवस असे घडले, की एक असा झंझावात (विचित्र हवा) आला, की त्याने (सौख्याची) कळी अन् कळी लुटून नेली आणि माझ्या वाटा चालताना माझा श्वास घुसमटला आणि (अशा तऱ्हेने) काळाच्या तडाख्याने अगर नियतीमुळे लुटलेला/ लुटून नेलेला मी (दु:खाने टाकलेल्या) सुस्काऱ्यांच्या मद्याची नशा अनुभवत राहिलो.

जीवनातील एक सौख्य असे निघून गेल्यावर आपल्या मनाची अवस्था त्या पूर्वी व त्या वेळी कशी होती, याचे वर्णन करताना कवी नीरज म्हणतात -

हाथ थे मिले के जुल्फ चाँद की संवार दूँ
होंठ थे खुले के हर बहार को पुकार दूँ 
दर्द था दिया गया के हर दुखी को प्यार दूँ
और सांस यूँ के स्वर्ग भूमीपर उतार दूँ
हो सका ना कुछ मगर श्याम बन गयी सहर 
वो उठी लहर के ढह गए किले बिखर-बिखर 
और हम डरे-डरे नीर नैन में भरे 
ओढ़कर कफ़न पड़े मज़ार देखते रहे 
कारवाँ गुज़र गया, गुबार देखते रहे 

हातात हात गुंफले होते अन् वाटत होते, की (त्या चंद्रमुखीचा की माझ्या) चंद्राचा विस्कटलेला केशकलाप नीट करावा! (वाटत होते, की) ओठ विलग करून वसंत ऋतूला साद घालावी. दुःखाची (थोडी का होईना, पण) चव कळली होती. त्यामुळे वाटत होते, की प्रत्येक दु:खी जिवाचे दु:ख दूर करावे, त्याला प्रेम द्यावे आणि असे करत करत या भूमीवर स्वर्ग उभारावा/ स्वर्ग आणावा! (थोडक्यात काय, तर शरीराची व मनाची ताकद असताना बऱ्याच चांगल्या, तसेच अशक्यप्राय असणाऱ्या गोष्टी करावयाचे ठरवले होते.) पण काही घडू शकले नाही. (सुंदर) सायंकाळनंतर फटफटीत सकाळ झाली. (दिवस अन् रात्री निघून गेल्या) (काळाची की नियतीची) एक लाट आली (आणि माझ्या सुंदर स्वप्नांचे, आशा-आकांक्षांचे) किल्ले विखुरलेले, उद्व्कस्त झालेले मी पाहिले. (तेव्हा) घाबरलेल्या अवस्थेत, अश्रुपूर्ण नेत्रांनी प्रेतवस्त्र (कफन) पांघरून मी माझेच थडगे (मजार) पाहत राहिलो. (मी माझ्याच डोळ्यांनी माझी अधोगती, अंत पाहत राहिलो.)

मांग भर चली के एक जब नयी-नयी किरन
ढोलके धुनक उठी, धूमक उठे चरण चरण
शोर मच गया के लो चली दुल्हन, चली दुल्हन 
गाँव सब उमड़ पड़ा, बहक उठे नयन नयन
पर तभी ज़हर भरी, गाज एक वह गिरी 
पूछ गया सिंदूर, तार-तार हुई चुनरी 
और हम अज़ान से दूर के मकान से 
पालकी लिए हुए कहार देखते रहे 
कारवाँ गुज़र गया, गुबार देखते रहे

एक अवखळ नवीन किरणशलाका एखाद्या नववधूप्रमाणे केसात कुंकुमतिलक लावून निघाली होती. मंगल वाद्ये वाजत होती. पावले छुमछुमत होती आणि एकच गलका ऐकू येत होता – ‘निघाली रे निघाली, निघाली नववधू.’ त्या वेळी सर्व गाव एकत्र येऊन अनिमिष नेत्रांनी बघत होता. आणि तोच आकाशातील वीज (गाज) विषारी वाऱ्याप्रमाणे तेथे कोसळली. कुंकू पुसले गेले, पदराच्या चिंध्या चिंध्या झाल्या. आणि आम्ही असहायपणे, काही माहीत नसल्यासारखे दूरच्या एका घरातून पालखी घेतलेले भोई बघत राहिलो.

एका नववधूचे, तिच्या उद्ध्वस्त झालेल्या वरातीचे प्रतीक वापरून नीरज यांनी उभी केलेली व्यथा - एखाद्याने एखादी नवी कल्पना घेऊन स्वप्न फुलवावे, ते सत्यात उतरण्यास सुरुवात व्हावी, अनुकूल घटना घडत राहाव्यात, सत्यात उतरणारे ते स्वप्न बाकीच्यांनीही कौतुकाने, औत्सुक्याने पाहावे आणि तोच नियतीने/काळाने एखादा विचित्र घाला घालून ते सत्यात उतरणारे स्वप्न उद्ध्वस्त करावे व ते स्वप्न पाहणाऱ्याने, फुलवणाऱ्याने असहाय होऊन, त्रयस्थ बनून ते उधळलेले स्वप्न पाहावे. अशा आशयाचे हे अखेरचे कडवे संपल्यावर मोहम्मद रफी पुन्हा एकवार ‘स्वप्न झरे फूल से....’ या सुरुवातीच्या चार ओळी आळवतात आणि हे गीत मनाची एक सुन्न अवस्था करून संपते.

‘कारवाँ गुजर गया....’ ही ओळ मोहम्मद रफींनी प्रत्येक वेळी, खास त्यांच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनोख्या शैलीने गायली आहे. ती श्रवणीय आहे. ‘नई उमर की नई फसल’ हे त्या चित्रपटाचे नाव नीरज यांच्या गाण्यांमुळेच लक्षात आहे. चित्रपटाचे कथानक, नायक राजीव हे विस्मृतीत गेले आहेत; मात्र रोशन यांच्या संगीतासाठी ‘अप्रतिम’ हाच शब्द योग्य आहे.

दु:खी आशय असला, तरीही हे गीत ‘सुनहरे गीत’ आहे, हे ऐकल्यावर लक्षात येते. चित्रपटातील अनेक मधुर गीते आणि अनेक आशयसंपन्न कविता मागे ठेवून कवी नीरज यांचा ‘कारवाँ गुजर गया है!’ परंतु त्यांच्या अर्थपूर्ण काव्याची सुखद हवा मनाला कायम रिझवत राहील!


- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search