Next
अनुवाद क्षेत्राचे भवितव्य
BOI
Sunday, April 01, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this story

‘एकेकाळी उपेक्षित असलेला ‘अनुवाद’ हा साहित्यप्रकार आज लोकप्रिय आणि आघाडीला आहे. जग एक ‘ग्लोबल व्हिलेज’ झाल्यानंतर आणि फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप यांसारखी माध्यमे विलक्षण वेगाने वापरात येत असताना ते अपरिहार्य आहे. त्यामुळे ‘अनुवादाचे भवितव्य काय,’ याचे उत्तर ‘अनुवादालाच भवितव्य’ असे द्यावे लागेल....’ ज्येष्ठ अनुवादक, साहित्यिक रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरात या वेळी अनुवाद क्षेत्राबद्दल त्यांचे अनुभवाचे बोल...
........
‘शब्दांगण’ दुकानातील अनुवादित पुस्तकांचे दालनएकेकाळी उपेक्षित असलेला ‘अनुवाद’ हा साहित्यप्रकार आज लोकप्रिय आणि आघाडीला आहे. जग एक ‘ग्लोबल व्हिलेज’ झाल्यानंतर आणि फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप यांसारखी माध्यमे विलक्षण वेगाने वापरात येत असताना ते अपरिहार्य आहे. काही वर्षांतच ‘कॉपीराइट’ ही संकल्पनाच नष्ट झाली, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे ‘अनुवादाचे भवितव्य काय,’ याचे उत्तर ‘अनुवादालाच भवितव्य’ असे द्यावे लागेल. 

१९७५पासून मी गाजलेल्या इंग्रजी पुस्तकांचे (बेस्टसेलर्स) अनुवाद सुरू केले. आजवर अशी सुमारे ३० पुस्तके प्रसिद्ध झाली आणि ती खूपच लोकप्रिय झाली. नवीन अनुवादक पुढे येत राहिले. सर्व वाचनालयांमधून त्यांना प्रचंड मागणी असते. तरुण वाचकांचाही त्यात प्रामुख्याने समावेश असतो, हे विशेष!

ज्या काळात आपल्याकडे कथा-कादंबऱ्या लोकांना आवडत होत्या, त्याच वेळी युरोप आणि अमेरिका जागतिक मंदी, तसेच महायुद्धाला तोंड देत होते. त्यामुळे तिथला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक चेहरामोहरा पार बदलून गेला. त्याचे प्रतिबिंब साहजिकच तिथल्या साहित्यात उमटू लागले. त्यात विषयवैविध्य आणि वैचित्र्य होते. पुढे त्यांचे अनुवाद अन्य भाषांमध्ये होऊ लागले. मराठीतही त्यांचे प्रमाण वाढू लागले. नव्या जाणिवा, नवे अनुभव, नवनवे वाङ्मयप्रकार वाचकांना आकर्षित करू लागले. सुरुवातीला समीक्षकांकडून त्यांना ‘एक साहित्यप्रकार’ म्हणून मान्यता नव्हती. वाचकांचे प्रमाण मात्र वेगाने वाढत होते. अनुवाद जितका एक स्वतंत्र कलाकृती वाटावी इतका अस्सल, तितकी त्याची लोकप्रियता अधिक! आज अशी परिस्थिती आहे, की वाचनालयांमध्ये ५०-६० टक्के सभासद अनुवादित पुस्तकांचीच मागणी करताना दिसतात. अनुवादाला आता एक ‘सर्जनशील साहित्य’ म्हणून मान्यता मिळाली आहे. 

अनुवाद ही आता हौसेची किंवा सहज जाता जाता करण्याची गोष्ट राहिलेली नाही. माहिती, ज्ञान आणि करमणूक या सर्व स्तरांवर अनुवाद मोठ्या प्रमाणात होण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या मराठीतून अन्य प्रादेशिक व परदेशी भाषांमध्ये अनुवाद होण्याचे प्रमाण कमी असले, तरी येत्या काही वर्षांत ते निश्चितच वाढेल - नव्हे, वाढायलाच पाहिजे. 

ललित वाङ्मयाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, वैचारिक, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, खाद्यसंस्कृती, कला, चित्रपट इत्यादी असंख्य विषयांत आज अनुवाद होताना दिसतात. कथा-कादंबऱ्या मागे पडत आहेत. सर्वच क्षेत्रांना अनुवादांनी व्यापलेले आहे. ‘Nothing is original’ असा एक इंग्रजी वाक्प्रचार आहे. कोणत्याही प्रकारच्या साहित्याला काही ना काही आधार, पूर्वस्मृती, संस्कार कारणीभूत असतात. म्हणजे ते ‘अनुवादच’ असतात, असे म्हटले तर वावगे होणार नाही. 

फ्रँकफुर्ट जागतिक पुस्तक प्रदर्शनजर्मनीतील फ्रँकफुर्ट आणि भारतामध्ये दिल्लीत दर वर्षी ‘बुक फेअर’ आयोजित केले जाते. तेथे भारतीय आणि परदेशी प्रकाशकांमध्ये विविध विषयांवरील अनुवादांसाठी शेकडो करार होत असतात. त्यावरून अनुवादाचे महत्त्व लक्षात येते. खरोखर, शेकडो प्रकाशकांनी हजारो अनुवाद प्रसिद्ध केले, तरी एकमेकांत स्पर्धा होण्याची वेळ येणार नाही. तशी गरजच आहे आणि तितकेच विषयही आहेत. अर्थात, त्यासाठी चांगल्या अनुवादकांची गरज आहे. 

आपल्याला व्यावसायिक अनुवादक व्हायचे आहे? मग, त्यात यशस्वी ठरण्यासाठी खूप परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. भाषांचे ज्ञान सर्वांत महत्त्वाचे. त्यानंतर आपले शुद्धलेखन, व्याकरण, शब्दसंपत्ती, लेखनाचे तंत्र, योग्य शब्दकोशांचा वापर या गोष्टी येतात. सरावाने लेखनात/अनुवादात सफाई येते. आपल्या साहित्यकृतीचे आपणच पहिले वाचक असतो. लिहिताना घाईगडबडीत झालेल्या चुका, अधिक चांगले प्रतिशब्द, काही भाग गाळणे किंवा वाढवणे, हे सहज लक्षात येते. दुसऱ्याकडून संपादन करून घेण्याची गरज वाटल्यास, त्यात कमीपणा वाटून घेऊ नये. पुस्तक निर्दोष स्वरूपात बाजारात गेले पाहिजे. त्यावर व्यवसाय अवलंबून असतो. 

एकदा हे क्षेत्र निवडले, की कोणताही विषय समोर आल्यास, त्याला नकार देता कामा नये. उदाहरणार्थ, अध्यात्मातील, ‘एकोऽहं बहुस्याम्’पासून ते आत्मज्ञान अर्थात ‘जन्ममरणापासून मुक्ती’ या प्रदीर्घ प्रवासातील कोणताही विषय आला आणि विज्ञानातील ‘बिग बँग थिअरी’ ते ‘क्वांटम फिजिक्स व्हाया रिलेटिव्हिटी’ यातील कोणताही विषय हाताळता आला पाहिजे. अडचण आल्यास मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ मिळू शकतात. मदतीला हल्ली ‘गुगल महर्षी’ आहेतच! ललित वाङ्मय मागे पडले, तरी अनुवादांसाठी अगणित विषय आहेत. प्रकाशकही चांगल्या अनुवादकांच्या शोधात असतात. तेव्हा लेखणी परजून सज्ज व्हा आणि त्या आव्हानाला सामोरे जा. स्वतःला त्यात पारंगत बनवा. 

रवींद्र गुर्जर
या क्षेत्रात मी जे काही थोडेफार काम केले आहे, त्या अनुभवाच्या आधारे किमान ५०० जणांना ‘अनुवादाचे तंत्र आणि मंत्र’ शिकवण्याचा संकल्प मी सोडला आहे. आगामी वर्षात तो पूर्ण होईल, असा विश्वास वाटतो. 

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link