Next
यू-ट्यूबवर हिट झालेल्या ‘मधुराज् रेसिपी’ पुस्तकरूपात उपलब्ध
मधुरा बाचल यांच्या मराठी पाककृतींच्या पुस्तकाचे प्रकाशन
प्राची गावस्कर
Saturday, October 06, 2018 | 01:30 PM
15 0 0
Share this article:

‘मधुराज रेसिपी’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) प्रकाशक मनोज अंबिके, विद्या अंबिके, श्रुती मराठे, सुबोध भावे, लेखिका मधुरा बाचल, राहुल देशपांडे, चिन्मयी सुमीत व मंदार जोगळेकर.

पुणे : यू-ट्यूबवर हिट झालेल्या ‘मधुराज् रेसिपी’ आता मराठी वाचकांना पुस्तकरूपानेही उपलब्ध झाल्या आहेत. मधुरा बाचल यांनी लिहिलेल्या शाकाहारी आणि मांसाहारी पाककृतींच्या मराठी पुस्तकांचे पाच ऑक्टोबर २०१८ रोजी पुण्यात दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन झाले. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री श्रुती मराठे, चिन्मयी सुमित, ‘बुकगंगा डॉट कॉम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, ‘मायमिरर पब्लिशिंग हाउस’चे मनोज अंबिके, विद्या अंबिके यांच्या उपस्थितीत हे प्रकाशन झाले. ‘मायमिरर पब्लिशिंग हाउस’ने ही पुस्तके प्रकाशित केली आहेत.

या वेळी ‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटाचे कलाकार रेवती लिमये, प्रतीक देशमुख, दिग्दर्शक समीर सुर्वे हेदेखील उपस्थित होते. मधुरा यांचा चाहता वर्ग या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता. ‘बुकगंगा डॉट कॉम’वर हे पुस्तक अल्पावधीत लोकप्रिय ठरले असून, ‘अॅमेझॉन’वरही अवघ्या तीन दिवसांत बेस्ट सेलर ठरले आहे. 

मधुरा बाचल २००९पासून यू-ट्यूबवर शाकाहारी-मांसाहारी पाककृतींचे व्हिडिओ सादर करत आहेत. ते प्रचंड लोकप्रिय असून, त्यांचे चॅनेलचे सुमारे १३ लाख सबस्क्रायबर्स आहेत. त्यांच्या या पाककृती सर्वांपर्यंत पोहोचाव्यात, मोबाइल, इंटरनेटविनाही त्या उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने त्यांचे पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले. शाकाहारी आणि मांसाहारी पाककृती एकत्रित आणि फक्त शाकाहारी पाककृती अशी दोन पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. 

मधुरा बाचल म्हणाल्या, ‘माझ्या पाककृतींना यू-ट्यूबवर मिळालेला उदंड प्रतिसाद आणि पुस्तकालाही मिळत असलेला प्रतिसाद हे सगळे भारावून टाकणारे आहे. मी लग्नाआधी कधी स्वयंपाक केला नव्हता. माझी आई सुगरण आहे. त्यामुळे मी स्वतः स्वयंपाक करण्यापेक्षा खाण्याचा आनंद उपभोगला; पण लग्नानंतर मी अमेरिकेला गेले आणि तिथे स्वतः स्वयंपाक करायला लागले. मी जे पदार्थ करत असे ते चांगले होत असत. त्यामुळे मित्र-मैत्रिणींकडून कौतुक व्हायचे. त्यामुळे उत्साह वाढला. मी नवनवीन पदार्थ करून बघू लागले. यू-ट्यूबवर स्वयंपाकाचे व्हिडिओ असले, तरी मराठमोळ्या पदार्थांचे व्हिडिओ नाहीत, हे लक्षात आले. त्यातूनच मग यू-ट्यूबवर आपल्या पाककृतींचे व्हिडिओ टाकायची कल्पना सुचली. २००९च्या सुमारास मी ‘मधुराज् रेसिपी’ नावाने चॅनेल सुरू केले. सुरुवातीला व्हिडिओ इंग्रजीमधून करत असे; पण नंतर मराठीतून व्हिडिओ करण्याचा आग्रह वाढू लागला. त्यामुळे मराठीत व्हिडिओ करायला सुरुवात केली. दीड वर्षात तब्बल दहा लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केला. मराठीत एवढ्या अल्पावधीत हा टप्पा गाठणारे हे कदाचित एकमेव चॅनल असावे. या यशाचे सगळे श्रेय प्रेक्षकांचे आहे. त्यानंतर पुस्तक लिहिण्याचा आग्रह होऊ लागला. एका वर्षापूर्वी हे पुस्तक करण्याचा निर्णय घेतला आणि मायमिरर प्रकाशनचे मनोज अंबिके, विद्या अंबिके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांतून हे पुस्तक तयार झाले. एवढ्या मोठ्या कलाकारांच्या उपस्थितीत आणि चाहत्यांच्या गर्दीत त्याचे प्रकाशन झाले, ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. तुमच्या सर्वांच्या साथीने आणि प्रेमामुळे हे शक्य झाले आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!’

‘पुस्तके दुकानातून विकत घ्या. मुलांनाही पुस्तकांच्या दुकानात न्या,’ असे आवाहन प्रकाशक मनोज अंबिके यांनी केले. 

‘बुकगंगाच्या कॉल सेंटरवर या पुस्तकासाठी सातत्याने फोन येत आहेत. अगदी छोट्या गावांतूनही पुस्तकाबद्दल विचारणा होत आहे. या पुस्तकाने अक्षरशः इतिहास घडवला आहे,’ असे ‘बुकगंगा डॉट कॉम’चे सीईओ मंदार जोगळेकर यांनी सांगितले. ‘एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला इतकी प्रचंड गर्दी होते, यातच त्याच्या यशाचे गमक आहे. अगदी कोणालाही सहज करता येतील, अशा पाककृती यात आहेत. पाककृती करताना अगदी बारीकसारीक गोष्टींचा विचार करून त्या सांगण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वांसाठीच हे पुस्तक उपयुक्त आहे. त्याबद्दल मधुरा बाचल यांचे  खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. मराठी साहित्यात या प्रकारात या पुस्तकाने आगळा विक्रम केला आहे. फार कमी पुस्तकांना असा प्रतिसाद मिळाला आहे. स्वतःसाठी, तसेच भेट देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. दुकानांमध्येही याची मागणी वाढत आहे. विक्रेत्यांमध्येही हे पुस्तक आपल्याकडे उपलब्ध करून देण्यसाठी चढाओढ लागली आहे. दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत याचे प्रकाशन होत आहे, हे देखील खूप अभिमानास्पद आहे,’ असे ते म्हणाले. 

या पुस्तकांची इंग्रजी आवृत्ती, तसेच ई-बुक निघावे, अशी अपेक्षा जोगळेकर यांनी व्यक्त केली. ‘उत्तम पुस्तके खरेदी करताना वाचक सवलतीची मागणी करतात; पण दोनशे, अडीचशे रुपये किमतीची पुस्तके खरेदी करताना त्यातही सवलतीची अपेक्षा रसिकांनी करू नये. आपण सिनेमा, हॉटेलिंग करताना सवलतीची मागणी करत नाही, मग पुस्तकांसारखी मौल्यवान गोष्ट खरेदी करताना सवलतीची अपेक्षा का केली जाते? पुस्तकांच्या किमती खूप कमी असतात. तेव्हा रसिकांनी उत्तमोत्तम पुस्तके आवर्जून खरेदी करावीत,’ असे आवाहन त्यांनी केले.

अभिनेत्री चिन्मयी सुमित म्हणाल्या, ‘वाचकांची भूक चाळविणाऱ्या आणि भूक भागविणाऱ्या अशा या पुस्तकाच्या प्रकाशनाला मला बोलावले याचा मला खूप आनंद आहे. मी पूर्णवेळ स्वयंपाकीण आणि अर्धवेळ अभिनेत्री आहे. मी मधुराच्या पाककृती खूप आधीपासून बघत आले आहे. खूप बारकाव्यांनिशी ती पाककृती सांगते. त्यामुळे पदार्थ अगदी अचूक आणि स्वादिष्ट होतात. मी गेल्या वर्षी दिवाळीत तिची पाककृती बघून रव्याचे लाडू बनवले होते. आजकाल मोबाइल, इंटरनेट यांचे प्रस्थ वाढत असताना वाचन संस्कृती नष्ट होतेय, अशी भीती व्यक्त केली जाते; पण या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला झालेली ही गर्दी आणि त्याला होत असलेली मागणी यावरून वाचनाची भूक किती मोठी आहे, हे स्पष्ट होते. मधुराच्या पाककृती अशाच लोकप्रिय होवोत, अनेक पुस्तके निघोत या शुभेच्छा!’

‘मला स्वतःला स्वयंपाक फारसा येत नाही आणि करणे फार आवडतही नाही; पण हे पुस्तक वाचताना वाटले, स्वयंपाक करणे इतके सोपे आहे. त्यामुळे आता हे पुस्तक वापरून मी काही पाककृती करून घरच्यांना खूश करीन. लग्न झाल्यानंतर सुनेने काहीतरी पक्वान्न करावे, अशी अपेक्षा असते. ती आता मला पूर्ण करता येईल,’ असे मनोगत अभिनेत्री श्रुती मराठे यांनी व्यक्त केले. 

अभिनेते सुबोध भावे म्हणाले, ‘हे पुस्तक वाचताना खूप अभिमान वाटला. एकतर यात स्वयंपाकाच्या प्रक्रियेविषयी आपल्या मातृभाषेत माहिती दिली आहे. दुसरे म्हणजे, सर्व महाराष्ट्रीयन पाककृती आहेत. आपल्याकडे असलेल्या पदार्थांची ओळख यामुळे सगळ्यांना होईल. त्याबद्दल मी मधुरा बाचल यांना धन्यवाद देतो. आजकाल अगदी कोकणात गेलो तरी पंजाबी, चायनीज पदार्थ पुढे येतात. त्यामुळे महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीच्या दृष्टीने हे पुस्तक खूपच उत्तम आहे. हृदयापर्यंत जाण्याचा मार्ग पोटातून जातो. त्यामुळे स्वयंपाक चांगला आलाच पाहिजे. त्यासाठी हे पुस्तक हवेच.’

गायक राहुल देशपांडे म्हणाले, ‘गायकाला बंदिश लिखित स्वरूपात मिळते, तेव्हा प्रत्येक गायक त्यातील लपलेल्या जागा शोधायचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे सुगरण स्त्रिया नवनव्या पाककृती, वेगळेपण शोधत असतात. माझी आजी सुगरण होती. आजोबांनाही स्वयंपाकाची खूप आवड होती. अगदी ते गाणे जसे रंगवत, तसे रंगून जाऊन ते स्वयंपाकही करत. मीही लहानपणी उकडीचे मोदक, करंज्या, शंकरपाळे करायला आवडीने शिकलो होतो. अमेरिकेतून केकचे पुस्तक आणले होते, तेव्हा रोज केक करून बघायचो. आता वेळ मिळत नाही. प्रयत्नपूर्वक कोणतीही गोष्ट केली, की नक्की जमते. मधुरा यांनी उत्तम प्रकारे ही कला जोपासली आहे आणि सर्वांपर्यंत आपल्या पाककृती पोहोचवल्या आहेत. आवड असली की कोणतीही गोष्ट अधिक बारकाईने, कौतुकाने केली जाते, तशी त्यांनी प्रत्येक पाककृती केली आहे. त्यामुळे त्याला अमाप यश मिळाले आहे. त्यांचे यश असेच वाढत राहो, या शुभेच्छा!’

यानंतर राहुल देशपांडे यांना गाण्याची फर्माईश झाली. त्यावर मधुरा यांच्या फर्माईशीनुसार त्यांनी ‘घेई छंद मकरंद’ या गीताच्या काही ओळी सादर केल्या. मधुरा यांच्या सहीसह पुस्तक खरेदी करण्यासाठी आणि तिच्यासह सेल्फी काढण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. 

(सुबोध भावे, मधुरा बाचल आणि मंदार जोगळेकर यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. ‘मधुराज् रेसिपी’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविता येईल. व्हेज रेसिपींचे पुस्तक मागविण्यासाठी येथे क्लिक करा आणि व्हेज-नॉनव्हेज रेसिपींचे पुस्तक मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search