Next
‘बीडीपीचे संरक्षण, संवर्धन करू’
प्रेस रिलीज
Thursday, September 06 | 11:41 AM
15 0 0
Share this storyपुणे : ‘बीडीपीचे संरक्षण, संवर्धन करू. त्यासाठी नागरिक, तज्ज्ञांच्या प्रयत्नांमध्ये पालिका स्वतःची जबाबदारी पार पाडेल,’ असे आश्वासन पुणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

‘बीडीपी’ आरक्षण टेकड्यांवर कायम झाल्यानंतर आणि ‘टीडीआर’द्वारे भरपाई देण्याचा राज्य सरकारचा निर्णय झाल्यानंतर बीडीपी संरक्षण, संवर्धनाची चर्चा करण्यासाठी खासदार वंदना चव्हाण, स्वयंसेवी संस्था, नागरिक प्रतिनिधींची बैठक पाच सप्टेंबर रोजी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासमवेत झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी डॉ. बाबा आढाव, उद्योजक अरुण फिरोदिया, अनिता बेनिंजर, रवींद्र धारिया, सारंग यादवाडकर, सुजित पटवर्धन, मिहीर थत्ते, कर्नल जटार, कर्नल दळवी, विवेक वेलणकर, विनोद बोधनकर, नरेंद्र चुघ, सुहास पटवर्धन, नंदा लोणकर, स्वाती गोळे, केतकी घाटे, तन्मय कानिटकर, ललित राठी यांसह अधिकारी वर्ग उपस्थित होता.

राव म्हणाले, ‘बीडीपी आरक्षित जमिनीचे संरक्षण करण्यास पालिका कटीबद्ध आहे. आवश्यकता पडल्यास स्वतंत्र निधी उभारला जाईल. महसूल विभागाशी बोलून सातबारावर बीडीपी आरक्षणाची नोंद करण्याचे प्रयत्न करू आणि २००५पासून सॅटेलाइट इमेजेस मिळवून नवीन अतिक्रमण रोखू. या सर्व कामांसाठी टास्क फोर्स करण्यास पालिकेची तयारी आहे. बीडीपी संरक्षणासाठी सिमेंटचे खांब लावले जातील; तसेच राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पुणे प्रथम क्रमांकावर येण्यासाठी सर्वतोपरी प्रत्यत्न केले जातील.’

खासदार चव्हाण म्हणाल्या, ‘शहराच्या आरोग्यासाठी टेकडया, ‘बीडीपी’चे संरक्षण करणे आवश्यक आहे. नव्याने झोपड्या होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे; तसेच ‘बीडीपी’तील शासकीय जागा तातडीने ताब्यात घेतल्या पाहिजेत.’

फिरोदिया यांनी नागरिक, संस्था, नगरसेवक, उद्योगांना ‘बीडीपी’च्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यास सुचवले; तसेच संवर्धनासाठी १० लाख जाहीर केले.

अनिता बेनिंजर यांनी ‘बीडीपी’ची नोंद सातबारा उताऱ्यावर करणे गरजेचे असल्याचे नमूद केले.

धारिया यांनी नव्या बिल्डिंगना परवानग्या देताना वृक्षारोपणाची अट घातली पाहिजे, असे सांगितले.

कर्नल जटार यांनी ‘बीडीपी’ संरक्षित करण्यासाठी सतत पेट्रोलिंग व्यवस्था केली पाहिजे, असे सांगून संवर्धनासाठी १० हजार देणगी जाहीर केली.

‘पुणे हे नदी खोरे म्हणून जपण्यासाठी नदी, नाले, ओढे जपण्याच्या उपाययोजनांकडे सजग दृष्टीने पहावे,’ अशा सूचना सिध्दार्थ बेनिंजर आणि विनोद बोधनकर यांनी केल्या.

डॉ. आढाव यांनी स्थलांतर आणि वाढती वाहन संख्या या विषयी सरकारची धोरणे बदलणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link