Next
‘रत्नागिरी जिल्ह्यातील जेटींच्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा’
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या सूचना
प्रेस रिलीज
Thursday, February 14, 2019 | 05:17 PM
15 0 0
Share this article:मुंबई : ‘दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांतील विविध जेटींची आणि रस्त्यांची कामे, तसेच धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करा,’ अशा सूचना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिल्या आहेत.

कदम यांनी १३ फेब्रुवारी २०१९ रोजी मंत्रालयात रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजनांची कामे, सागरमाला अंतर्गत कामे, तसेच मेरी टाइम बोर्डाच्या कामांचा आढावा घेतला. या वेळी पशुसंवर्धन व मत्स्योद्योग मंत्री महादेव जानकर उपस्थित होते.

दापोली, खेड आणि मंडणगड या तीन तालुक्यांतील १५ जेटींची कामे लवकरच सुरू होत असून, जिल्हा वार्षिक योजनेची ३१ कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. दाभोळ, बाणकोट आणि हर्णे बंदराची कामे, तसेच किनारपट्टी भागातील रस्त्यांच्या कामांचा आढावा या वेळी घेण्यात आला.

याच बैठकीत रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड समुद्रकिनारी असलेल्या अनधिकृत बंगल्यांचा आढावा कदम यांनी घेतला. पंजाब नॅशनल बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी परदेशात असलेला उद्योगपती नीरव मोदी यांचा बंगला तातडीने पाडण्याच्या सूचना कदम यांनी दिल्या. मोदी यांचा बंगला पाडण्याचे काम सुरू असून, पुढील आठवड्यात त्यासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. आतापर्यंत २४ बंगले पाडण्यात आल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी या वेळी दिली.

कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेने शहरातील पंचगंगा नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन प्रदूषणमुक्त पंचगंगा नदी करण्याचे निर्देशही कदम यांनी या आढावा बैठकीत दिले.

ते म्हणाले, ‘कोल्हापूर व इचलकरंजी परिसरातील जे कारखाने प्रदूषित, रासायनिक पाणी पंचगंगेत सोडतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. त्यांची नावे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवा. एकूण १२ नाल्यांचे पाणी नदीत सोडल्याने प्रदूषण वाढले आहे. पुढील सहा महिन्यांत पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे.’

या वेळी झालेल्या चर्चेत शिरोळचे आमदार उल्हास पाटील, कोल्हापूरचे आमदार अमल महाडिक यांनी पंचगंगा नदी स्वच्छ करण्याबाबत काही सूचना केल्या. या आढावा बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन, पदुम विभाग आणि पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search