Next
‘ईपीएफ’च्या मुदतपूर्व लाभासाठी नियम व अटी
BOI
Saturday, September 29, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफ हा कर्मचाऱ्यांचा मोठा आधार असतो. अकस्मात येणाऱ्या अडचणी, मुलांचे विवाह, शिक्षण, घर बांधणे किंवा खरेदी यासाठी यातून कर्ज घेता येते. त्यामुळे ‘ईपीएफ’ ही अत्यंत लाभदायी आणि उपयुक्त गुंतवणूक ठरते. यातील रक्कम कधी, कशी काढता येते, याबाबत अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांना भेडसावत असतात. असे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात .... 
........
प्रश्न : ‘ईपीएफ’मधील शिल्लक रकमेतून मुदतपूर्व रक्कम काढता येते का? कोणत्या कारणांसाठी?
उत्तर : शिक्षणासाठी, लग्नासाठी, आजारपणाच्या खर्चासाठी, घर खरेदी/बांधणे, घर दुरुस्तीसाठी, गृहकर्जाची परतफेड व अपंगांसाठी उपयुक्त साधनांच्या खरेदीसाठी काही अटींवर रक्कम मुदतपूर्व काढता येते.

प्रश्न : शिक्षणासाठी रक्कम किती व कशी मिळू शकते?
उत्तर : स्वत:च्या किंवा मुलांच्या महाविद्यालयीन किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी रक्कम मुदतपूर्व काढता येते; मात्र त्यासाठी कर्मचाऱ्याची किमान सात वर्षे सेवा होणे आवश्यक असते. मिळणारी रक्कम कर्मचाऱ्याचे योगदान व त्यावरील व्याजाने येणाऱ्या एकत्रित रकमेच्या ५० टक्के किंवा शिक्षणासाठीचा येणारा खर्च, यातील कमीत कमी रक्कम असू शकते. ही सुविधा नोकरीच्या कालावधीत फक्त तीनदा मिळू शकते.

प्रश्न : घर बांधणे अथवा खरेदीसाठी रक्कम किती व कशी मिळू शकते?
उत्तर : फेब्रुवारी २०१७च्या सुधारित नियमानुसार किमान तीन वर्षे सेवा झालेल्या व्यक्तीस ईपीएफ खात्यावरील शिल्लक रकमेच्या ९० टक्के किंवा घराची किंमत या दोहोतील कमीतकमी रक्कम वरील कारणासाठी एकदाच काढता येते.

प्रश्न : घर दुरुस्तीसाठी किती व कशी रक्कम मिळू शकते?
उत्तर : कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनाच्या १२ पट किंवा ईपीएफ खात्यावरील व्याजासहितची शिल्लक किंवा दुरुस्तीचा खर्च यातील कमीतकमी रक्कम नोकरीच्या कालावधीत एकदाच काढता येते; मात्र यासाठी किमान पाच वर्षे नोकरी होणे आवश्यक असते.

प्रश्न : गृहकर्जाच्या परतफेडीसाठी किती व कशी रक्कम काढता येते?
उत्तर : कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनाच्या ३६ पट किंवा ईपीएफ खात्यावरील शिल्लक रक्कम किंवा व्याजासहितची कर्ज बाकी यातील कमीतकमी रक्कम गृहकर्जाच्या परतफेडीसाठी काढता येते; मात्र यासाठी किमान दहा वर्षे सेवा होणे आवश्यक असते व ही सुविधा एकदाच वापरता येते.

प्रश्न : वैद्यकीय कारणासाठी किती व कशी रक्कम काढता येते?
उत्तर : स्वत:च्या अथवा कुटुंबीयांच्या वैद्यकीय खर्चासाठी मासिक वेतनाच्या सहा पट किंवा कर्मचाऱ्याचे योगदान व त्यावरील व्याजाने येणारी एकत्रित रक्कम यांपैकी कमीतकमी रक्कम कितीही वेळा काढता येते व यासाठी नोकरीच्या कालावधीची अट नाही.

प्रश्न : विवाहासाठी किती व कशी रक्कम मिळते?
उत्तर : स्वत:च्या, मुलांच्या किवा भावंडांच्या लग्नासाठी रक्कम मुदतपूर्व काढता येते; मात्र यासाठी कर्मचाऱ्याची किमान सात वर्षे नोकरी होणे आवश्यक असते. मिळणारी रक्कम कर्मचाऱ्याचे योगदान व त्यावरील व्याजाने येणाऱ्या एकत्रित रकमेच्या ५० टक्के  इतकी असू शकते. ही सुविधा नोकरीच्या कालावधीत फक्त तीनदा मिळू शकते.

प्रश्न : अपंग कर्मचाऱ्यांसाठी काय सुविधा आहे?
उत्तर : अपंगत्वामुळे असणाऱ्या अडचणी कमी होऊ शकतील, अशी साधने खरेदी करण्यासाठी मासिक वेतनाच्या सहापट किंवा कर्मचाऱ्याचे योगदान व त्यावरील व्याजासह एकत्रित रक्कम यातील कमीतकमी रक्कम काढता येते. - सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link