Next
मल्लखांबातील जोडगोळी
BOI
Friday, October 19, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

भारतीय क्रीडा क्षेत्रात मल्लखांब या खेळाला विशेष महत्त्व आहे. या खेळात सध्या नावारूपाला आले आहेत पुण्याचे अद्वैत आणि चैतन्य पेंडसे हे दोन बंधू.... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या मल्लखांब क्षेत्रातील या जोडगोळीबद्दल...
....................
मल्लखांब या खेळाचा शोध बाराव्या शतकात लागला.  त्यानंतर पेशवाईमध्येसुद्धा खुद्द पेशव्यांना बाळंभट्ट दादा देवधर मल्लखांब शिकवायचे. या खेळाचा इतिहास खूप मोठा आहे. केवळ बाजीरावच नव्हे, तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे या धुरंधरांनीही हा खेळ एक विद्या म्हणून आपलासा केला होता. साधारण १९५०च्या काळात ही विद्या एक खेळ म्हणून प्रचलित झाली. राष्ट्रीय जिम्नॅस्टिक संघटनेने याला खेळाचे स्वरूप दिले आणि मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे १९६२मध्ये या खेळाची पहिलीवहिली स्पर्धा झाली. आज उज्जैन शहर या खेळाची राजधानी म्हणून ओळखले जाते. रोज या खेळाकडे वळणारी शेकडो मुले-मुली आज मैदानावर आपले नैपुण्य दाखवताना दिसत आहेत. पुणे आणि मुंबई येथील खेळाडूंनीही गेल्या चार दशकांत या खेळावर आपला दबदबा राखण्यात यश मिळवले आहे.  

मल्लखांबाच्या स्पर्धा आज देशभर होत असल्या, तरी त्यात पुणे, मुंबई, उज्जैन, सातारा, अमरावती आणि तमिळनाडू राज्यातील अनेक संघ आणि अनेक खेळाडू या खेळात तरबेज आहेत.  पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळात या खेळाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि आज पुण्यात विविध ठिकाणी या खेळाची प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. अद्वैत आणि चैतन्य हे याच खेळात आपली गुणवत्ता दाखवून नावारूपाला आले आहेत. अद्वैत पेंडसे गोळवलकर गुरुजी विद्यालयात नववीत शिकत आहे, तर त्याचा भाऊ चैतन्य याच विद्यालयात सहावीत शिकत आहे. दोघेही मल्लखांबात जितेक प्रवीण आहेत, तितकेच शालेय अभ्यासातही हुशार आहेत. त्यांना घरूनच क्रीडा संस्कृतीचा वारसा मिळाला असल्यामुळे त्यांच्या खेळावर अभ्यासातील प्रगतीचे दडपण कधीच घातले जात नाही. त्यांचे वडील हर्षद आणि आई तेजश्री हे स्वतः धावपटू असून, अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिसे मिळवली आहेत. हर्षद यांनी तर स्वतः फिट राहा, असा संदेश देऊन आपल्या वर्तुळातील अनेकांना तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून दिले आहे. इतकेच नव्हे, तर आजही पन्नाशीत डोकावत असताना ते स्वतः अजूनही ट्रायथलॉन, सायकलिंग आणि रनिंग या क्षेत्रात कार्यरत आहेत.  

अद्वैत आणि चैतन्य यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून महाराष्ट्रीय मंडळात नामांकित प्रशिक्षक अभिजित भोसले यांच्याकडे मल्लखांबाचे धडे गिरवायला सुरुवात केली. फेडरेशन चषक स्पर्धेतील शालेय गटातील स्पर्धेपासून या दोघांनीही आपल्या स्पर्धात्मक कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. या दोघांनी आजवर प्रत्येकी जवळपास ४०पेक्षा जास्त पदके मिळवून पुण्यात आपल्या गुणवत्तेचा दबदबा निर्माण केला आहे. अद्वैतने तर उज्जैनला झालेल्या स्पर्धेत दुखापतीवर मात करून कांस्य पदकाची कमाई केली. आजच्या घडीला हे दोघे पुण्यातीलच नव्हे, तर राज्यातील अनेक संघांसमोर एक आव्हान म्हणून उभे राहतात. त्यात तमिळनाडूचे खेळाडूदेखील आता नावारूपाला येत असल्याने या दोघांसमोर येत्या काळात आणखी तगडे आव्हान उभे राहणार आहे.  

दर वर्षी साधारण आठ ते दहा स्पर्धा हे दोघे खेळतात. नुकत्याच पुण्यात पार पडलेल्या स्पर्धेत या दोघांनीही आपापल्या गटात विजेतेपद मिळवले आहे. या खेळाला जसजसा मोठा दर्जा मिळत जाईल, तसतसे त्यातील खेळाडूंनाही मोठे व्यासपीठ मिळत जाईल. आज हा खेळ राष्ट्रीय स्तरापुरता मर्यादित असला, तरी त्याची वाढती लोकप्रियता पाहता अनेक देश या खेळाकडे आकर्षिले जात आहेत. हा एक चांगला संकेत आहे. 

जिम्नॅस्टिकसारखाच शारीरिक चपळता आणि तंदुरुस्ती देणारा आणि टिकवणारा हा खेळ परदेशी खेळाडूंनाही आज भुरळ घालत आहे, यातच या खेळाचे व खेळाडूंचे भवितव्य उज्ज्वल आहे याची साक्ष पटते. हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला, तर अद्वैत आणि चैतन्यसारख्या शेकडो खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू बनण्याची संधी मिळेल आणि देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे त्यांचे स्वप्न साकार होईल; मात्र त्यासाठी आवश्यकता आहे ती या खेळाला लोकाश्रयाबरोबरच राजाश्रय मिळण्याची. 

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(अद्वैत आणि चैतन्य यांच्या मल्लखांबाच्या कौशल्याची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search