Next
संपूर्ण सृष्टीची उभारणी ज्यांच्या द्वारे होते ते पंचीकरण
BOI
Sunday, November 18, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

भारतीय तत्त्वज्ञानात ‘पंचीकरण’ हा फार महत्त्वाचा विषय आहे. पाच प्रकारची विभागणी असा त्याचा सोपा अर्थ आहे. ‘पंचीकरण’ नीट समजावून घेणे मात्र अवघड आहे. ते एकदा समजले, की अध्यात्माचा अर्थात (आत्म) ज्ञानप्राप्तीचा मार्ग सुलभ झालाच म्हणून समजा. आपण त्याची थोडी वाटचाल करू या. ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर ‘किमया’ सदरात आज त्याबद्दल लिहीत आहेत...
...............
सृष्टीची निर्मिती होताना आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी ही पंचमहाभूते सूक्ष्म (अव्यक्त) स्वरूपात होती. पुढे ती व्यक्त होऊन (स्थूल) सत्त्व, रज, तम या त्रिगुणांशी त्यांचा संयोग झाला आणि त्यातून अनंत पदार्थ आणि प्राणिमात्रांची निर्मिती झाली. त्यालाच अष्टधा प्रकृती असे म्हणतात. परब्रह्म हे मूळ तत्त्व. ते जीवाशी अंशरूपाने एकरूप झाले, की प्रत्येक प्राण्यामध्ये जीवात्मा रूपाने वास करते. त्याच्यावर मायेचा (अज्ञानाचा) प्रभाव असल्याने, आपल्या खऱ्या स्वरूपाचा जीवाला वारंवार विसर पडतो. सर्व सृष्टीचा क्रम त्रिगुण आणि पंचमहाभूते या आठ तत्त्वांवरच उभा आहे. साधना आणि गुरुकृपेच्या आधाराने ज्ञानप्राप्ती झाली की जन्म- मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते. यालाच मोक्ष म्हणतात.

त्रिगुण :
गुण म्हणजे स्वभाव-निरनिराळ्या प्रकारच्या कल्पना.
सत्त्वगुण म्हणजे चांगल्या (हितकर) कल्पना; तमोगुण म्हणजे वाईट कल्पना आणि बऱ्या-वाईट मिश्र कल्पना हा रजोगुण. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवता अनुक्रमे सत्त्व, रज आणि तमोगुणी आहेत. प्रकृतीचे व्यापार सुरळीतपणे चालण्यासाठी या तिन्हींची आवश्यकता असते. जीव आणि परमात्मा यांच्यामध्ये अहंकाराचा अडसर असतो. कोणतेही कार्य करताना ‘मी’पणाचा आश्रय घेऊन, अहंकाराचा उपयोग केलेला असतो. तो एकदा गेला (जी गोष्ट अशक्यप्राय असते) की परमात्म-स्वरूपाशी एकरूपता झालीच. सत्त्व, रज किंवा तम हे गुण पूर्ण शुद्ध प्रमाणात कोठे आढळत नाहीत. त्यांचे कमी-जास्त प्रमाणात मिश्रण प्रत्येकात असते. सत्त्वगुणाचे प्राबल्य असल्यास त्या व्यक्तीला साधूपुरुष म्हणतात. तमोगुणाचे आधिक्य म्हणजे ती राक्षसी प्रवृत्तीची व्यक्ती. बहुसंख्य प्राणिमात्र रजोगुणीच असतात.

पंचभूते :
आकाश हे महाभूत सर्वांत विस्तृत, सूक्ष्म आणि विरळ असते. ‘शब्द’ (आवाज) हा त्याचा खास विषय आहे. बाकी चार भूतांच्या मदतीशिवाय एकही आकृती तयार होऊ शकत नाही. अपरंपार आकाशाच्या पोकळीत सर्व वस्तू राहतात.

वायू संपूर्ण ब्रह्मांडाची हालचाल करत राहतो. शब्द आणि स्पर्श हे वायूचे दोन विषय आहेत. त्यात आकाश समाविष्ट असल्यामुळे शब्द हा विषय आला. पंचमहाभूतांपासून आकृती तयार होतात आणि त्यांच्यात स्वभाव भरण्याचे कार्य त्रिगुणांकडून होते.

जगाचे जीवन, अन्नाचा परिपाक आणि जाळणे ही तेजाची कामगिरी होय. रूप हा तेजाचा विषय. जोडीला शब्द व स्पर्श हे विषय असतातच.

आपतत्त्व म्हणजे नद्या, महासागर... ज्यात जल भरलेले आहे, अशा सर्व गोष्टी. आपाचा विषय आहे रस. आधीचे तीन म्हणजे शब्द, स्पर्श आणि रूप हे विषय त्यात असतातच.

सर्वांत जड गोष्ट म्हणजे पृथ्वीतत्त्व. त्याशिवाय कोणतीही वस्तू साकार होत नाही. सर्व प्राण्यांच्या उत्पत्तीस पृथ्वीच कारणीभूत असते. गंध हा पृथ्वीचा विषय. आधीचे चार त्यात समाविष्ट आहेतच.

मृत्यूनंतर ‘माती असशी, मातीत मिळसी,’ किंवा ‘त्याचा देह पंचत्वात विलीन झाला,’ असे म्हणतात. जिथून जसा आला, तसा परत मूळ ठिकाणी गेला. याचा अर्थ जन्म-मरणाचे चक्र थांबले, असे नव्हे. नव्या वस्त्राप्रमाणे नवा देह मिळतच राहतो. आत्मज्ञान झाल्यावर पुन्हा जन्म नाही. ‘वैकुंठ’लोकी कायमचे वास्तव्य!

पृथ्वीतत्त्व :
पृथ्वी ही जडत्वामुळे ठसठशीतपणे दृष्य झालेली असते. त्यापुढील तत्त्वे अधिकाधिक विरळ होत गेली आहेत. पृथ्वी देहामध्ये पुढील पाच ठिकाणी भरलेली आहे.
१) अस्थी, २) मांस, ३) स्नायू, ४) त्वचा, ५) केस.

यातील अस्थी सगळ्यात कठीण असतात. त्यापुढील चारी भाग दृढतेच्या बाबतीत कमी-कमी होत गेले आहेत. अस्थी म्हणजे पृथ्वीगुणदर्शक पृथ्वी; मांस-आपगुणदर्शक पृथ्वी; स्नायू-तेजदर्शक पृथ्वी; त्वचा-वायुगुणदर्शक आणि केस-आकाशगुणदर्शक पृथ्वी.

आपतत्त्व :
देहात आपतत्त्व पुढीलप्रमाणे :
१) मूत्र, २) रक्त, ३) वीर्य, ४) लाळ, ५) घाम.
ही सुद्धा एकाहून एक विरळ होत गेली आहेत.

तेजतत्त्व :
देहातील तेजतत्त्वाची पाच रूपे :
१) आळस, २) मैथुन, ३) क्षुधा, ४) तृष्णा, ५) निद्रा. ही पाण्याच्या रूपाहूनही खूपच विरळ आहेत.
आळस आला, की अंग जड होते (पृथ्वीगुण). तेजगुणामुळे भूक लागली, की पोटात आग पडते. कडक उन्हामुळे देहातील आपतत्त्व कमी झाल्याने तहान लागते; आणि आकाश जसे शून्यवत असते, त्याचप्रमाणे निद्राकाली प्राण्यांना सर्व काही आकाशाप्रमाणे शून्यवत असते.

वायुतत्त्व :
देहामधील वायूची पाच रूपे :
१) आकुंचन २) प्रसरण, ३) धावन, ४) चलनवलन, ५) निरोधन
देह आकुंचित केला, की तो घट्ट गोळाच असतो (पृथ्वीगुण); प्रसरण हा पाण्याचा धर्म म्हणून ते आपगुणदर्शक; तेजयुक्त वायूचे रूप म्हणजे धावन; चलनवलन वायुगुणदर्शक आणि निरोधनसमयी पोटाची पोकळी ताणली जाते (आकाशगुण).

आकाशतत्त्व :
देहातील आकाशतत्त्वाची पाच रूपे :
१) काम, २) क्रोध, ३) लोभ, ४) मोह, ५) भय
यातही पाच प्रकारे सूक्ष्म फरक आहे.

ही पंचमहाभूतांची एकूण २५ स्थूल तत्त्वे झाली. त्यांच्यापासून जड देह बनला. म्हणून या देहास ‘स्थूल देह’ म्हणतात. त्यात ‘मी’ कुणीही नाही.

कोष्टक १ :


सूक्ष्म पंचमहाभूते :
याच देहात पंचमहाभूते सूक्ष्म रूपानेही आहेत. 

‘पृथ्वी’ची जी पाच सूक्ष्म रूपे आहेत, त्यांना पंचविषय म्हणतात. ते पुढीलप्रमाणे -
१) गंध, २) रस, ३) रूप, ४) स्पर्श, ५) शब्द.
त्यात अनुक्रमे सूक्ष्मत्व होत गेले आहे.

‘आप’ महाभूताची जी पंचतत्त्वे देहात असतात, त्यांना पंचकर्मेंद्रिये म्हणतात. 
१) गुद, २) मूत्रेंद्रिय, ३) पाद, ४) हस्त, ५) मुख.
मलोत्सर्ग, मूत्रोत्सर्ग, गमनागमन, क्रियाकर्तृत्व आणि शब्दोच्चारण ही पाच कर्मे आहेत.

‘तेज’ तत्त्वाची पाच रूपे म्हणजे ज्ञानेंद्रिये. त्यांच्यापासून पंचविषयांचे ज्ञान होते.
१) घ्राणेंद्रिय, २) जीभ, ३) नेत्र, ४) त्वचा, ५) कर्ण.

प्राणाच्या योगे गंध समजतो, जिभेमुळे रस, नेत्राद्वारे रूप, त्वचेद्वारे स्पर्श आणि कानाच्या योगे शब्द समजतो.
प्रत्यक्ष विषयज्ञान करून घेण्याची शक्ती इंद्रियांमध्ये नाही. विषय भोगणारा तो ‘मी’च असतो.

‘वायू’तत्त्वाची पंचरूपे अशी :
१) प्राण, २) अपान, ३) उदान, ४) समान, ५) व्यान. त्यांना प्राणपंचक म्हणतात. 

१) प्राणाच्या योगे श्वासोच्छवास होतो (स्थान हृदय); २) अपानाच्या योगे मलमूत्रोत्सर्ग (गुद); ३) उदानाच्या योगे गिळता येते (कंठ); ४) समानाच्या योगे अन्नरस सर्व शरीरात समानतेने नेता येतो (नाभिस्थान); ५) व्यानाच्या योगे शरीरचालन (सर्व देह).

आकाश’तत्त्वाची पंचरूपे अशी :
१) अहंकार, २) चित्त, ३) बुद्धी, ४) मन, ५) अंत:करण. यांना अंत:करणपंचक असे म्हणतात.
अहंकार म्हणजे ‘मी’पणा, मनाची गर्विष्ठ वृत्ती. एखाद्या गोष्टीबद्दल सदासर्वकाळ तेच ध्यान लागते; त्या वृत्तीचे नाव चित्त. एखाद्या कठीण विषयात प्रवेश करण्याची जी प्रवृत्ती, तिचे नाव बुद्धी. इकडून तिकडे भराऱ्या मारण्याची जी वृत्ती तेच मन. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली म्हणजे त्यापासून होणारे समाधान ज्या वृत्तीला होते, तेच अंत:करण. ही वृत्ती सर्वांत अत्यंत सूक्ष्म आहे. ही झाली पंचमहाभूतांची पंचवीस सूक्ष्म रूपे. स्थूल रूपे पंचवीसच आहेत. या सूक्ष्म तत्त्वांतही ‘मी’ कोणी नाही. ही तत्त्वेही सूक्ष्म दृष्टीने दृष्यच आहेत. द्रष्टा (बघणारा, अनुभव घेणारा) त्याहून वेगळाच असतो.
या पंचवीस सूक्ष्म तत्त्वांच्या समुदायास सूक्ष्म देह, असे म्हणतात.

कोष्टक २ :


विषय थोडा अवघड वाटेल. परंतु पुन:पुन्हा वाचून तो समजावून घ्यायचा आहे. १) अंत:करण पंचक हे २) पंचवायू, पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मे यांच्या द्वारे ३) विषय ग्रहण करते.

पंचवृत्ती या आकाशतत्त्वाची रूपे आहेत. आकाशतत्त्व सत्त्वगुणी म्हणून पंचवृत्ती सत्त्वगुणी झाल्या.
वायू, तेज आणि आप ही रजोगुणी महाभूते. म्हणून त्यांची सूक्ष्मपंचके, अर्थात प्राणपंचक, ज्ञानेंद्रियपंचक व कर्मेंद्रियपंचक ही रजोगुणी आहेत - म्हणजे कारभारी!

तमोगुणी पंचक एकच आहे, ते म्हणजे विषयपंचक. विषय ही पृथ्वीतत्त्वाची सूक्ष्म रूपे; पृथ्वी ही तमोगुणी आहे, म्हणून विषयपंचकही तमोगुणी झाले.प्रत्येक क्रिया-कर्तृत्वात त्रिपुटी (तीन गोष्टी) असते; म्हणजे ज्या तीन साधनांच्या द्वारे कार्यपूर्तता होते, त्या तीन साधन-समुदायास त्रिपुटी म्हणतात. उदा. जेवण ही क्रिया पूर्ण होण्यास तीन गोष्टी पाहिजेत. १) जेवणारा, २) अन्न आणि ३) भोजनक्रिया. इथे जेवणारा हा भोक्ता, अन्न हे भोग्य आणि भोजनक्रिया हा भोग. या तिन्हींचा समुदाय म्हणजे त्रिपुटी.

आणखी काही त्रिपुटी पाहा :
१) कर्ता, कार्य, कारण; २) श्रोता, श्राव्य, श्रवण; ३) वक्ता, वाच्य, वाचन; ४) ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान इत्यादी इत्यादी
या त्रिपुटीस अर्थात त्रिगुणांना प्रकाशणारा (अनुभव घेणारा) जो तोच आत्मा, म्हणजेच ‘मी’. सूक्ष्म देहातही ‘मी’ नाही. त्रिगुण हे सृष्टीतील प्रत्येक अणू-रेणू, परमाणूमध्येही भरलेले आहेत.

स्थूल आणि सूक्ष्म देहानंतर ‘कारण’ व ‘महाकारण’ देह येतात. स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहांना महाकारण देह प्रकाशित करतो. आत्मा हा (तम, रज, सत्त्व या तिन्हींसह) स्वप्रकाशमान आहे. मी, आत्मा आणि महाकारण देह ही एकाच ‘वस्तू’ची तीन नावे आहेत.

ही झाली ‘पंचीकरणा’ची स्थूल माहिती. परमात्मा म्हणजे काय, हे सांगताना वेद ‘नेति नेति’ म्हणजे ‘हे नाही, हे नाही’ इतकेच सांगतात. सर्व तत्त्वांच्या पलीकडे असतो तो देहातील आत्मा आणि सृष्टीत भरलेला परमात्मा.
योग्य वेळ आली की तेही आपल्याला उमजेल!

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
ANIL VISHNU MOHARIR About 186 Days ago
Thankful for a clear, lucid and unambiguously interpreted article. However, looking from the point of view of modern science, the so called TRIPUTI is nothing but the Three out of the four primary forces of nature i.e. Electromagnetic, Gravitation, Strong Interaction and Weak Interaction. With weak and strong interactions being basically similar except in the range of their operation, there are essentially three forces that run the show of the universal play of matter and energy together. These three forces have been aptly depicted in the concept of Dattatreya. Still however, what we call a Soul is nothing else except the de facto electric Charge.
0
0

Select Language
Share Link
 
Search