Next
‘विशेष’ मुलींचं आपलं ‘घरकुल’
कोमल कुळकर्णी-कळंबटे
Friday, October 27 | 04:00 PM
15 0 0
Share this story

मानसिक अपंगत्व घेऊन जन्माला आलेले मूल विशेष असते. समाज त्यांना ‘विशेष’ असं संबोधत असला तरी, त्यांच्या या विशेष असण्याला चारही बाजूने असहायतेची किनार असते. विशेषतः  अशा मुली आणि महिलांच्या बाबतीत हा प्रश्न मोठा असतो. समाजातील या उपेक्षित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी नाशिकमधील ‘घरकुल’ संस्था धडपड करत आहे. ‘लेणे समाजाचे’ सदरात आज ‘घरकुल’बद्दल...
...........

आपल्यामागे आपल्या या ‘विशेष’ पाल्याचा निभाव कसा लागणार याची चिंता मानसिक अपंगत्व आलेल्या व्यक्तींच्या, विशेषतः मुलींच्या बाबतीत त्यांच्या पालकांना नेहमीच भेडसावत असते. मानसिक अपंगत्व घेऊन जन्माला आलेल्या मुलांच्या पुनर्वसनाचा मोठा गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभा आहे. या व्यक्तींकडे उपेक्षेने पाहिले जाते. बऱ्याचदा घरातील व्यक्तींकडूनही अशा व्यक्तींना अंतर दिले जाते. जिथे आपलेच स्वीकारत नाहीत, तिथे समाजाकडून कसली अपेक्षा करणार; मात्र अशा ‘विशेष’ व्यक्तींच्या या प्रश्नाला ‘घरकुल’च्या रूपाने महिलांसाठी काही अंशी उत्तर मिळाले आहे.

विद्या फडके या परिवाराच्या संस्थापक सदस्य आहेत. त्या गेली ४० वर्षे या क्षेत्रात असून, ‘घरकुल’ सुरू करण्याआधी त्या अशाच ‘विशेष’ मुलांसाठी असलेल्या एका संस्थेत व्होकेशनल ट्रेनर म्हणून २८ वर्षे कार्यरत होत्या. तिथून बाहेर पडल्यानंतरही अशा मुलांच्या पालकांशी त्यांचा नेहमीच संवाद होता. त्यातूनच श्रुती वाडकर या एका ‘विशेष’ मुलीच्या पालकांच्या आग्रहाखातर ‘आमच्यानंतर या मुलीचे काय’ हा प्रश्न गंभीर असल्याची जाणीव त्यांना झाली. त्यानंतर बराच विचार करून हे शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय विद्या फडके यांनी घेतला.

शिक्षकांकडून प्रशिक्षण घेताना घरकुल परिवाराच्या विद्यार्थिनीवैदेही देशपांडे, सुमिता आडके आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिरीष सुळे या आपल्या मित्रांसमोर फडके यांनी ही कल्पना मांडली. अपेक्षेप्रमाणे या तिघांनीही या कल्पनेला मूर्त रूप आणण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली; मात्र खरा प्रश्न होता तो या मुलींना सांभाळता येईल का, या मुली नीट राहतील ना, याचा. मग प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्याचा समर कॅम्प घेण्यात आला. त्यात चार मुली होत्या. महिनाभर या मुलींना सांभाळल्यानंतर आपण हे करू शकतो, याची जाणीव त्यांना झाली. एक नोव्हेंबर २००६ रोजी ‘घरकुल परिवारा’ची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

हे घरकुल ‘होम अवे फ्रॉम होम’ या संकल्पेवर आधारित असून, ही सरकारमान्य संस्था आहे; मात्र संस्थेला सरकारी अनुदान मिळत नाही. त्यामुळे ही संस्था पूर्णपणे समाजाच्या सहकार्यावर चालते. सध्या १५ वर्षांपासून ते ६७ वर्षांपर्यंतच्या ४७ मुली, महिला ‘घरकुल’मध्ये आहेत. त्या सगळ्या पुणे, मुंबई, लातूर  जळगाव, धुळे, गडचिरोली अशा विविध ठिकाणांहून आलेल्या आहेत. या महिला आणि मुलींना घराप्रमाणे प्रेम, आत्मीयता, जिव्हाळा देऊन त्यांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. त्यांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक क्षमतेप्रमाणे त्यांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. या मुलींना सतत कार्यमग्न ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. यातील काही मुली भाजणीचे पीठ, कुळीथ पीठ, तसेच वेगवेगळ्या चटण्या बनवण्याचे काम करतात, तर काहीजणी बॉलपेन असेंब्लिंगचे काम करतात. या मुली दिवसाला आठ ते १० हजार बॉलपेन असेंबल करतात. दिवाळीच्या आधी या मुली कंदील, पणत्या, रांगोळ्या बनवितात.

या मुलींना आठवड्यातून दोन दिवस डान्स थेरपी दिली जाते. आठवड्यातून दोन दिवस संगीत शिक्षक येऊन त्यांना शिकवतात; तसेच आठवड्यातील तीन दिवस योगासनांचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. या मुलींना छंद जोपासण्यासाठी ‘घरकुल परfवारा’कडून प्रोत्साहन दिले जाते. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून समाजाचा उपयुक्त घटक म्हणून त्यांना तयार करणे हेच या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

संस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे काम करणाऱ्या व्यवस्थापकांपासून ते सुरक्षारक्षकांपर्यंत सर्वच कर्मचारी महिला आहेत; मात्र ४७ मुली/महिलांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या केवळ २५ इतकीच आहे.

‘घरकुल’मध्ये अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा आहेत. रोज ताजा, पौष्टिक, सकस शाकाहारी नाष्टा आणि जेवण या मुलींना दिले जाते. विविध व्यवसायांचे, कौशल्यांचे, कलांचे प्रशिक्षण दिले जाते; एवढ्यावरच न थांबता या मुलींना वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी दिली जाते. मनोरंजनासाठी टीव्ही, सीडी प्लेयर, रेडिओ यांसारखी साधने आहेत. या मुलींची दर महिन्याला वैद्यकीय तपासणी केली जाते आणि त्याला अनुसरून उपचार केले जातात. या व्यतिरिक्त पालकांना मार्गदर्शन, पालक सभांचे आयोजन केले जाते. समाज प्रबोधनासाठीही या संस्थेमार्फत विशेष प्रयत्न केले जातात.

सध्या संस्थेची नाशिक येथे असलेली इमारत एका विद्यार्थिनीच्या पालकाने बांधून वापरायला दिली आहे; मात्र आताच्या इमारतीसमोरच संस्थेने स्वतःची जागा घेऊन अजून ५० मुलींसाठी इमारत बांधण्यास सुरुवात केली आहे. या इमारतीचे काम प्रगतिपथावर असून, लवकरच ते पूर्णत्वाकडे जाईल. 

‘माझ्या या मुली अतिशय प्रेमळ, कष्टाळू, हुशार आहेत. त्यांनाही समाजात सन्मानाची वागणूक मिळावी आणि समाजाने त्यांना आपल्या प्रवाहात सहभागी करून घ्यावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ असे विद्या फडके यांनी सांगितले. एकीकडे महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर असताना निसर्गाने वंचित केल्याने विशेषत्व लाभलेल्या मुलींना, महिलांना त्यांच्या पालकांनंतर, स्वतःच्या घरानंतर दुसरे सुरक्षित घर उपलब्ध करून देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेले ‘घरकुल’ म्हणजे धाडसच म्हणावे लागेल. समाजाचे सहकार्य मिळाले, तरच त्याचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल.

विद्यार्थिनींनी तयार केलेल्या आकर्षक वस्तूमदतीचे आवाहन
देणगी देऊन, कुटुंबीयांचे वाढदिवस साजरे करून, वडीलधाऱ्यांचे स्मृतिदिन साजरे करून, आवश्यक वस्तूंची भेट देऊन, धान्याचे दान करून, तसेच ‘घरकुल’मधील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या वस्तू विकत घेऊन वा त्याची विक्री करून नागरिक संस्थेला मदत करू शकतात. दरमहा सहा हजार रुपये भरून एका विद्यार्थिनीचे पालकत्व घेता येऊ शकते. तसेच अडीच ते पाच हजार रुपयांपर्यंतची देणगी देऊन संस्थेतील मुली/महिलांचे एका वेळचे भोजन, नाश्ता आदींची सोय करता येऊ शकते, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.

संपर्क : घरकुल परिवार संस्था, आनंदनगर, त्र्यंबक रोड, पिंपळगाव बहुला, नाशिक.
फोन : विद्या फडके ९८६०५ ५२३२४
ई-मेल : gharkulparivar@gmail.com
वेबसाइट : http://gharkulparivar.com

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)

(संस्थेची माहिती देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link