Next
सुधीर फडके, जिम कॉर्बेट
BOI
Wednesday, July 25 | 03:45 AM
15 0 0
Share this story

महान गायक, संगीतकार, सुधीर फडके आणि ब्रिटिश असूनही मनापासून भारतात रमलेले धाडसी शिकारी जिम कॉर्बेट यांचा २५ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणीमध्ये त्यांच्याविषयी...
..... 
सुधीर फडके 

२५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूरमध्ये जन्मलेले रामचंद्र विनायक ऊर्फ सुधीर फडके ऊर्फ बाबूजी म्हणजे मराठी संगीतसृष्टीचा इतिहास ज्यांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे, गीतरामायणाचा अनमोल चिरंतन ठेवा ज्यांनी रसिकांना दिला असे महान गायक, संगीतकार! सुमधुर आवाजाची देणगी मिळालेल्या सुधीर फडके यांनी संगीतकार म्हणूनही अमूल्य कामगिरी केली आहे. मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले. आजही ‘भाभी की चूडियाँ’ चित्रपटातील ‘ज्योती कलश छलके’ हे गाणे किंवा ‘खूश है जमाना, आज पहिली तारीख है,’ ही गाणी रसिकांना मोहून टाकतात. बाबूजींनी तब्बल मराठी ११० चित्रपटांना आणि २० हिंदी चित्रपटांना संगीत दिलं. याशिवाय अनेक भावगीतं, भक्तिगीतं आणि मराठी लावण्यांना त्यांनी संगीत साज चढवला. कवी न. ना. देशपांडे यांनी रामचंद्र हे नाव बदलून ‘सुधीर’ असं त्यांचं नामकरण केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातलं वाडा -फणसे हे त्यांचं मूळ गाव. त्यांचे आजोबा कोल्हापूरला स्थायिक झाले. बाबूजींनी गायन आणि वादनाचं सुरुवातीचं शिक्षण कोल्हापुरात पं. वामनराव पाध्ये यांच्याकडून घेतलं. वडिलांच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांना संगीताचं शिक्षण मध्येच सोडून पोटापाण्याच्या व्यवसायात लक्ष घालावं लागलं; पण संगीत शिकण्याची त्यांची इतकी तीव्र इच्छा होती, की त्यांनी अनवाणी चालत, उपाशीपोटी राहून गाण्याचं शिक्षण घेतलं. मुंबई, उत्तर भारतातही फिरून गुरूंकडे राहून त्यांनी गानसाधना  केली. त्यांच्या ‘जगाच्या पाठीवर’ या आत्मचरित्रात त्यांच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी वाचायला मिळते. ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातली गीते त्या काळात खूपच गाजल्यानं त्यांना प्रसिद्धी मिळाली. प्रभात चित्रपट संस्थेमधून १९४६मध्ये ते संगीतकार म्हणून प्रसिद्धी झोतात आले. तत्त्वनिष्ठ, ध्येयवादी अशा सुधीर फडके यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात आपले श्रद्धेय विनायक दामोदर सावरकर यांच्यावरचा ‘वीर सावरकर’ चित्रपट बनविण्यासाठी झोकून दिले होते. कूपन्स विकून आणि कार्यक्रम करून त्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पैसा उभा केला होता. या चित्रपटासाठी त्यांनी दिलेलं संगीत आणि म्हटलेली गाणी ही त्यांची शेवटचीच ठरली. ‘दीनानाथ संगीत पुरस्कार’, ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ , ‘सह्याद्री स्वररत्न पुरस्कार’ यांसह स्वामी हरिदास सन्मान, सूरसिंगार सांसद पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते. सुहासिनी, आम्ही जातो आमच्या गावा, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर या काही चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयही केला होता. हा महान गायक, संगीतकार २९ जुलै २००२ रोजी दिगंताच्या प्रवासाला निघून गेला. २५ जुलै २०१८पासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे.
....

जिम कॉर्बेट 

२५ जुलै १८७५ रोजी नैनितालमध्ये जन्मलेले एडवर्ड जेम्स अर्थात जिम कॉर्बेट हे ब्रिटिश असूनही मनापासून भारतात रमलेले शिकारी. नैनिताल, गढवाल आणि कुमाऊँ परिसरातील (आताचे उत्तराखंड) नरभक्षक वाघांची शिकार करून, आदिवासींचे जगणे सुरक्षित करणारे धाडसी शिकारी, पर्यावरणरक्षक, उत्तम छायाचित्रकार आणि लेखक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे कॉर्बेट. सुरुवातीला रेल्वे खात्यात नोकरीला असलेल्या कॉर्बेट यांनी रेल्वेची कामं करणारे कंत्राटदार म्हणूनही व्यवसाय केला. अनेक आदिवासींना त्यांनी काम दिलं. जन्मापासून नैनितालमध्ये वाढलेल्या जिम कॉर्बेट यांची नाळ नैनितालच्या जंगलाशी, तिथल्या अदिवासींशी अगदी घट्ट जोडली गेली होती. त्यांचं ‘माय इंडिया’ हे पुस्तकही त्यांनी आदिवासींनाच समर्पित केलं आहे. या परिसरातल्या जंगलातल्या अनेक हिंस्र नरभक्षक वाघांना ठार करणारे शूर शिकारी म्हणून जिम कॉर्बेट यांची इतिहासात नोंद आहे. एखादा वाघ किंवा बिबट्या नरभक्षक आहे, याची खात्री पटल्याशिवाय ते त्याला ठार करत नसत. ४३६ लोकांचा बळी घेणारा या भागातला पहिला नरभक्षक वाघ ‘चंपावत’ याला कॉर्बेट यांनी ठार केले. तिथून नरभक्षक वाघांना ठार करण्याची त्यांची मोहीम सुरू झाली. दोन नरभक्षी बिबट्यांचीही त्यांनी शिकार केली. या नरभक्षक वाघांच्या शिकारी ते एकटेच करत. फक्त रॉबिन हा त्यांचा कुत्रा त्यांच्या सोबत असे. नैनितालचे आणि आजूबाजूचे जंगल त्यांना अतिशय प्रिय होते. तिथले त्यांचे वास्तव्य, नरभक्षक वाघांच्या शिकारी, आदिवासींचं जीवन, जंगलातली निरीक्षणं, अनुभव यांचं वर्णन करणारी विविध पुस्तकं त्यांनी लिहिली. ती चांगलीच गाजली. आजही त्यांची पुस्तकं आवर्जून वाचली जातात. या भागातल्या जनजीवनाचे संदर्भ देणारा तो मूल्यवान दस्तऐवज आहे. मॅनइटर्स ऑफ कुमाऊँ, जंगल स्टोरीज,  मॅनइटर लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग, जंगल लोर, दी टेम्पल टायगर अँड मोअर मॅनइटर्स ऑफ कुमाऊँ ही त्यांची पुस्तकं खूप गाजली. या पहाडी प्रदेशात ‘लॉर्ड माल्कम हॅले’ हे पहिले राष्ट्रीय अभयारण्य उभारण्याच्या कामात त्यांचा सिंहाचा वाटा होता. जिम कॉर्बेट यांच्या स्मरणार्थ १९५७मध्ये या अभयारण्याचं ‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान’ असं नामकरण करण्यात आलं. बालपणापासून नैनितालच्या जंगलात वाढलेल्या या माणसानं आयुष्याच्या शेवटी भारत स्वतंत्र झाल्यानंतर केनियाला स्थलांतर केलं. नोव्हेंबर १९४७मध्ये त्यांनी नैनितालजवळ कालाधुंगीमध्ये असलेलं घर विकून ते केनियाला गेले. तिथे १९ एप्रिल १९५५ रोजी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या नैनितालमधील घरात आता संग्रहालय उभारण्यात आले आहे. त्यांच्या आयुष्यावर ‘बीबीसी’ने १९८६मध्ये ‘मॅन इटर्स ऑफ इंडिया’ हा माहितीपट बनवला. ‘इंडिया : किंग्डम ऑफ दी टायगर’ हा चित्रपट २००२मध्ये आला, तर २००५मध्ये ‘मॅनइटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग’ हा तिसरा चित्रपट प्रदर्शित झाला. ब्रिटिश असूनही मनाने भारतीय झालेल्या जिम कॉर्बेट यांचे भारतीयांच्या मनात अढळ स्थान आहे.
.....

यांचाही आज जन्मदिन :
कविवर्य वसंत बापट (जन्म : २५ जुलै १९२२, मृत्यू : १७ सप्टेंबर २००२)
समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी (जन्म : २५ जुलै १९३४, मृत्यू : २७ जानेवारी २०१६)
(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link