Next
अविनाश, विश्वजितच्या गाण्याला आठ नामांकने
प्रेस रिलीज
Wednesday, March 14, 2018 | 03:04 PM
15 0 0
Share this story

पुणे : संगीतकार अविनाश-विश्वजित यांचे ‘ह्रदयात वाजे समथिंग’ हे गाणे खूप गाजले. ‘ती सध्या काय करते?’ चित्रपटातील हे गाणे, खुद्द विश्वजित जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले आहे. त्यांना या गाण्यासाठी संगीतकार आणि गीतकार अशी दुहेरी नामांकने मिळाली आहेत. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण, झी गौरव, मटा सन्मान, रेडीओ सिटी आदी विविध पुरस्कारांसाठी ही नामांकने मिळाली असून, यंदाच्या ‘मिर्ची म्युझिक अॅवॉर्ड’साठी त्यांना तब्बल आठ नामांकने मिळाली आहेत. 

लवकरच ‘मंत्र’ हा सिनेमा घेऊन ते चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे या सिनेमाची निर्मिती, संकल्पना विश्वजित जोशी यांची आहे आणि ‘वेदार्थ क्रिएशन्स’च्या सहयोगाने ‘ड्रीमबुक प्रॉडक्शन्स’ने ‘मंत्र’ची निर्मिती केली आहे.

विविध नामांकने आणि ‘मंत्र’ विषयी बोलताना विश्वजित जोशी म्हणाले, ‘मागील १२ – १५ वर्षांपासून आम्ही मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये विविध सांगितीक प्रयोग करत आहोत. त्याला रसिक प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनही पसंती मिळाली आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो. विविध पुरस्कार हे त्यांच्यामुळेच मिळालेले आहेत. २०१७मध्ये आम्ही संगीत दिलेले दोन सिनेमे प्रदर्शित झाले होते, ‘ती सध्या काय करते’ आणि ‘कंडीशन्स अप्लाय’. या दोन्ही सिनेमांच्या संगीताला श्रोते आणि समीक्षकांची पसंती मिळाली. याशिवाय मी लिहीलेल्या गीतालाही नामांकन मिळालं आहे, याचा निश्चितच आनंद वाटतोय. आपण केलेल्या कामाला मिळालेली पुरस्काररुपी कौतुकाची थाप प्रेरणादायी ठरते.’   

‘मंत्र या आगामी सिनेमात आमची चार गाणी आहेत. यातील तीन गाणी मी लिहिली आहेत,’ असे सांगताना विश्वजित म्हणाले, ‘मंत्रची कथा ऐकल्यानंतर या कथेवर सिनेमा निर्माण व्हावा, असे मला वाटले. मी लेखक – दिग्दर्शक हर्षवर्धन यांच्याशी चर्चा करून, निर्मितीची संकल्पना मांडली. यामुळे हा माझ्या अत्यंत जवळचा सिनेमा आहे. मंत्रची कथा हेच त्याचं बलस्थान आहे. त्यातल्या व्यक्तिरेखा वेगवेगळ्या विचारसरणीच्या वर्गाचं प्रतिनिधीत्व करतात. चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला त्यातलं एकतरी पात्र त्यांच्या विचाराशी साधर्म्य असलेलं आढळेल. यामुळे वैविध्यपूर्ण प्रेक्षकांना आवडतील अशी गाणी असावीत, असं दिग्दर्शक हर्षवर्धन यांचे मत होतं. त्याप्रमाणे एक वेस्टर्न बाजाचं दोस्तीचं गाणं, एक चक्क ढोलावरचं गाणं आणि एक विरहगीत मी बांधलं. पाहिलं गाण तरुणाई, त्यांच्या स्वप्नांबद्दल आणि मैत्रीवर भाष्य करतं. त्यासाठी मी, रोहित आणि धवलचा आवाज वापरायचा ठरवला. ढोलाच्या गाण्यासाठी मला अवधूत गुप्तेचा आवाज हवा होता. दुसऱ्या एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या दिवशी मी अवधूतला हे ही गाणं गाशील का? म्हणून विचारलं, तो लगेच हो म्हणाला. ढोल वाजवणाऱ्या मुलीवरचं हे गाणं, हमखास ठेका धरून नाचवणारं आहे. तिसरं विरह गीत हे खूप भावपूर्ण आहे. त्यासाठी मी अजय गोगावले यांना विचारणा केली, त्यांनी तत्काळ होकार दिला. या गाण्याच्या निमित्तानं आम्ही १९९९नंतर एकत्र काम केलं. अजयनं गाण्याला त्याचा जो टच दिलाय, त्याला तोड नाही. मंत्रच्या टायटल साँगसाठी विनया क्षीरसागर यांनी खूप छान संस्कृत काव्य, मला हव्या त्या मीटरमध्ये लिहून दिलं. ते करतानाच आपण काहीतरी छान करतोय याचं समाधान वाटत होतं. आजपर्यंत रसिकांनी आमच्या कामावर प्रेम केलं आहे. ‘मंत्र’च्या गीतांच्या प्रेमात रसिक पडतील, असा मला आणि अविनाशला विश्वास आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link