Next
‘कुतूहल हरवता कामा नये’
BOI
Sunday, July 22, 2018 | 11:45 AM
15 0 0
Share this story

‘सिंफनी - पाश्चात्य संगीताची सुरेल सफर’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) आशिष पाटकर, दीपा देशमुख, अच्युत गोडबोले, कौशल इनामदार आणि अरविंद पाटकर

पुणे : ‘अनेक विषयांचे मला प्रचंड कुतूहल वाटते. त्यात मी झोकून देतो. तो अभ्यास पुस्तकाच्या रूपाने लोकांसमोर आणतो. साठच्या दशकात मी बंडखोरीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकले. पाश्चात्त्य संस्कृतीविषयी पुस्तके लिहिताना तिथल्या संगीताविषयी लिहायचे ठरवले होते. त्यामुळेच ‘सिंफनी - पाश्चात्य संगीताची सुरेल सफर’ हे पुस्तक लिहिले. आज आपण कुतूहल हरवत चाललो आहोत, हे आपले दुर्भाग्य आहे. विषयांवर प्रेम करायला पाहिजे. विषयातील सौंदर्य शोधायला हवे. विषयातील मूलतत्त्वे आपल्याला कळली पाहिजेत आणि त्याचा सातत्याने ध्यास घेतला पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांनी केले. त्यांनी आणि दीपा देशमुख यांनी लिहिलेल्या ‘सिंफनी’ या पुस्तकाचे प्रकाशन २१ जुलै २०१८ रोजी पुण्यात संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. मनोविकास प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या वेळी मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर उपस्थित होते.

गोडबोले म्हणाले, ‘ज्या विषयातील मला कळत नाही, त्या विषयात मी घुसतो. शाळेत असल्यापासून मला कुतूहल वाटणाऱ्या विषयाचा अभ्यास करायला आवडायचे. ‘आयआयटी’त शिकत असताना बीटल्सचे संगीत ऐकले. त्याने गारूडच केले. नोकरीनिमित्त युरोप, अमेरिकेत फिरत असताना मोझार्ट, बीथोवन अशा महान संगीतकारांचे संगीत ऐकले. आपले शास्त्रीय संगीतही खूप ऐकले. पाश्चात्य संगीत हा त्या संस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. तो लिहायचा राहिला होता. त्यामुळे त्याचा अलौकिक इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी हे पुस्तक लिहिले.’

‘आपण जे गाणे ऐकतो ते आपल्याला कळले पाहिजे असे अनेकांना वाटत असते. मला वाटते गाणे कळणे हाच मुळात वेडेपणा आहे. गाणे अनुभवणे, त्याचा आस्वाद घेणे, त्यातील भाव कळणे हे जास्त महत्त्वाचे आहे,’ असे मतही गोडबोले यांनी मांले.

दीपा देशमुख म्हणाल्या, ‘पाश्चात्य संगीताचा इतिहास पुस्तकात यावा, यासाठी सर्व काळांचा आढावा त्यात घेतला आहे. पाश्चात्य संगीताची ओळख ज्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, अशा चार महान संगीतकारांचे चरित्र लिहिताना खूप काही शिकायला मिळाले. संघर्ष करत असताना काही आधार नसतानादेखील निराश होऊ नये, हे या संगीतकारांनी शिकवले. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात लेख असलेल्या महान संगीतकारांच्या सिंफनींचे क्यूआर कोड देण्यात आले आहेत. त्यामुळे पुस्तक वाचताना क्यूआर कोड स्कॅन केला, तर त्या संगीतकारांची सिंफनी मोबाइलवर ऐकता येऊ शकते. पाश्चात्य संगीतावरून प्रेरित होऊन भारतीय संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या तब्बल १५० गाण्यांची यादीही पुस्तकात दिली आहे.’

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संगीतकार कौशल इनामदार म्हणाले, ‘पाश्चात्य संगीतावर साधे, सहज लिहिलेले हे पुस्तक आहे. एखादा विषय, कविता पूर्ण कळली, असे कधी नसतेच. ती एक अखंड चालत राहणारी प्रक्रिया आहे. तसे हे पुस्तक वाचून संपवण्यासारखे नाही. अत्यंत रंजक माहिती यात आहे. गोष्टीतून इतिहास, संगीत शिकण्यास मदत होते. ते काम हे पुस्तक करते. सूर किंवा संगीताला संस्कृती चिकटलेली असते. पाश्चात्य संगीताचीही संस्कृती यातून वाचायला मिळते. संगीताला कोणतीही भाषा नसते असे म्हणतात; मात्र याच संगीताच्या शब्दांमधून सूर नाही तर संस्कृती झिरपत असते. त्यामुळे ती समजून घेण्यासाठी कुतूहलाने संगीत ऐकावे. गोडबोलेंना वाटणारे कुतुहल इतक्या उच्च दर्जाचे आहे, की त्यातून अनेकांचे आयुष्य बदलू शकते. मराठी माणसेच असे काही नवीन करण्यात उत्साही असतात.’

‘आपल्याकडे संगीतात विनाकारण गोष्टी गुंतागुंतीच्या करण्याची सवय आहे. मराठी संगीतकार एकाच गीतातील चार वेगवेगळ्या कडव्यांना चार वेगवेगळ्या चाली देतो. तो एका चालीवर कधीच समाधानी रहात नाही. याचे कारण म्हणजे त्या संगीतकाराच्या मनात संशोधक दडलेला असतो. ज्येष्ठ नेहमी सांगतात, की कविता समजली तर चाल द्या; पण ती चाल देत असताना तो कविता समजून घेण्याचाच एक मार्ग असतो हेच आपण नेमके विसरतो. त्यामुळे संगीत माहिती नसले, तरी ते कुतूहलाने ऐकण्याची तयारी ठेवा,’ असेही इनामदार यांनी नमूद केले. ‘सिंफनी’ हे पुस्तक पाश्चात्य संगीत सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाईल, असे सांगून त्यांनी अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख यांचे आभार मानले.

आपले आजोबा थोर व्हायोलीनवादक शंकरराव बिनीवाले यांची आठवण सांगून इनामदार यांनी केलेल्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडात दाद दिली. या वेळी आयटी तज्ज्ञ दुष्यंत पाटील, अपूर्व देशमुख, आशिष पाटकर यांचा सत्कार करण्यात आला. 

‘पुस्तक पेठ’चे संचालक संजय जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. माधव वैशंपायन यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link