Next
भरवशाच्या खजिन्याच्या किल्लीचा मान
BOI
Monday, April 02, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this storyभारताच्या संस्कृती मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांस्कृतिक दृश्य-श्राव्य अभिलेखागार (एनसीएए) या प्रकल्पाला जगातील पहिला विश्वासार्ह डिजिटल संग्रह होण्याचा मान मिळाला आहे. ब्रिटनच्या ‘पीटीएबी’ या संस्थेने नुकतेच ‘एनसीएए’ला ‘आयएसओ १६३६३ : २०१२’ हे प्रमाणपत्र दिले आहे. देशभरातील २५ शहरांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे पुढील पाच वर्षांत या संग्रहात तीन लाख तासांचे ऑडिओ-व्हिज्युअल साहित्य उपलब्ध होणार आहे. त्या निमित्ताने विशेष लेख...
...................
जगातील पहिले अधिकृत ग्रंथालय इजिप्तमधील तेल इल अमारान येथे इ. स. पूर्व १५००मध्ये सुरू झाले, असे म्हणतात. त्यानंतर आठशे वर्षांनी पहिले सार्वजनिक वाचनालय ग्रीसमधील अथेन्स येथे सुरू झाले. या ग्रंथालयाचे नंतर वाचनालय आणि पुस्तकालय असे प्रकारही निर्माण झाले. सुमारे दोन हजार वर्षे या ग्रंथालयांनी माणसांचे ज्ञान वाढवायला हातभार लावला. त्यांची संस्कृती वाढवायला मदत केली. अन् ही दोन सहस्रके उलटल्यावर संगणकाचा आविष्कार झाला.

मग ग्रंथालयाच्या नोंदी ठेवण्याचे शास्त्रही बदलले आणि स्वरूपही. कपाटांच्या रांगांतून हवे ते पुस्तक शोधून काढण्याची कला लुप्त झाली, ते पुस्तक हाती लागण्याचा आनंद दुर्मीळ झाला आणि मिळालेल्या पुस्तकाची निगुतीने जपणूक करण्याचा काळही मागे पडला. त्याजागी अंकीय (डिजिटल) जंजाळातून माहिती शोधून काढण्याचे कौशल्य अधिक महत्त्वाचे ठरू लागले. भविष्यातील अशा संभाव्य ऑनलाइन माहिती सेवांचा उल्लेख ‘अॅटलांटिक मंथली’ या नियतकालिकात १९४५ साली आला असल्याचे संगणकशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. परंतु संपूर्ण मजकुरातून विशिष्ट शब्दांच्या आधारे शोध घेणारी पहिली सेवा सुरू झाली ती १९६० या वर्षी. मेडलार्स (MEDLARS) असे या सेवेचे नाव होते. ही सेवा म्हणजे एक ग्रंथावली होती आणि त्यात वैद्यकीय साहित्याचे संदर्भ होते.

त्याची पुढची आवृत्ती म्हणजे हातात मावणारे ग्रंथालय. जगभरात याची अनेक रूपे आहेत. परंतु आपल्या जवळचे उदाहरण घ्यायचे, तर पश्चिम बंगालमधील ‘आयआयटी खडगपूर’ने ‘नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया’च्या (एनडीएलआय) रूपाने ते साकार केले आहे. एनडीएलआय हा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा प्रकल्प. या महाप्रकल्पासाठी ‘आयआयटी’ने खास अॅप विकसित केले असून, त्यात देशातील सुमारे १०० विविध संस्थांचा समावेश आहे. त्यात विविध भाषांतील सुमारे ६७ लाख पुस्तके, नियतकालिके, थिसिस व लेख पुस्तके मोफत उपलब्ध आहेत. निव्वळ मराठीतील पाच हजारांहून अधिक पुस्तके या अॅपमध्ये डिजिटल स्वरूपात आलेली आहेत.

हे सगळे खरे असले तरी संगणक म्हणजे केवळ मजकूर नव्हे. अल्लाउद्दिनच्या दिव्यातील राक्षसाला लाजवेल असा हा हरकाम्या. लेखी मजकूर, ध्वनी, चित्रे, दृश्यफिती अशा कुठल्याही प्रकारची सामग्री तो लीलया हाताळतो. इतकेच कशाला, पीडीएफ, ईपब अशा विविध स्वरूपाच्या - पूर्वी कल्पनाही करता न येणाऱ्या - फायलींनाही त्याने जन्म दिला. आता या राक्षसाच्या पोतडीतील कप्प्यांमध्ये आपल्याला हवे ते साहित्य मिळविणे, हीच अल्लाउद्दिनची डोकेदुखी ठरू लागली. यालाच सामान्यपणे ‘मीडिया कॉन्व्हर्जन्स’ (माध्यम मिलाफ) असे म्हणतात.

मीडिया कॉन्व्हर्जन्स याचा अर्थ जुन्या आणि नव्या माध्यमांचा संगम असा आहे. उत्पादन, प्रणाली किंवा प्रक्रिया अशा तिन्ही रूपांत त्याकडे पाहिले जाऊ शकते. ‘विविध माध्यमांमध्ये मजकुराचे वहन, बहुविध माध्यम उद्योगातील सहकार्य आणि आपल्या मनोरंजनाच्या अनुभवासाठी वाटेल तिकडे जाऊ शकणाऱ्या माध्यमांच्या श्रोतृवर्गाचे स्थलांतरासारखे वर्तन,’ अशी त्याची व्याख्या जेनकिन्स या तज्ज्ञाने केली आहे. तांत्रिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि जागतिक असे ‘कॉन्व्हर्जन्स’चे पैलू आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व प्रकारच्या प्रक्षेपणाची जागा इंटरनेट झपाट्याने घेत आहे. माध्यमे ब्रँड्स होत आहेत आणि विविध स्वरूपांत आशय पुरवत आहेत. ‘स्टार वॉर्स’ हा चित्रपट पुस्तक, व्हिडिओ गेम, कार्टून आणि अॅक्शन फिगरच्या स्वरूपात उपलब्ध आहे. आपल्याकडे ‘एंदिरन’ हा चित्रपट व्हिडिओ गेमच्या स्वरूपात आला होता. त्यामुळे जगभरातील ग्राहकांना आपल्या मनाप्रमाणे हव्या त्या स्वरूपातील मजकूर मिळविता येत आहे आणि तो अधिक सुलभतेने उपलब्ध आहे.

वेब कास्टिंग, व्हिडिओ ऑन डिमांड, केबलद्वारे इंटरनेट ही कॉन्व्हर्जन्सची काही उदाहरणे आहेत. टीव्ही संचामध्ये येणाऱ्या ‘वेब टीव्ही’सारख्या सेवा, सेट टॉप बॉक्स आणि मोबाइल फोनद्वारे देण्यात येणाऱ्या ई-मेल आणि इंटरनेट सुविधा किंवा ‘जिओ’ करते त्याप्रमाणे फोनसाठी इंटरनेटचा वापर ही सर्व कॉन्व्हर्जन्सचीच उदाहरणे होत. नव्या पिढीच्या या माध्यम वागणुकीची दखल घेतल्याशिवाय आता कोणालाही पुढे जाता येणार नाही. अन् जेव्हा भारतासारख्या देशाला या क्रांतीचे अग्रणी होण्याचा मान मिळतो, तेव्हा अभिमान वाटल्यावाचून राहत नाही. कसले अग्रत्व? तर भारताच्या संस्कृती मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांस्कृतिक दृश्य-श्राव्य अभिलेखागार (नॅशनल कल्चरल ऑडियो-व्हिज्युअल अर्काइव्हज् - एनसीएए) या प्रकल्पाला जगातील पहिला विश्वासार्ह डिजिटल संग्रह होण्याचा मान मिळाला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाची निश्चिती करून त्याला डिजिटल माध्यमात संरक्षित करणे, हे ‘एनसीएए’चे (http://ncaa.gov.in) उद्दिष्ट आहे. दुर्मीळ दस्तऐवज आणि पुस्तकांच्या संग्रहणात कार्यरत असलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र (आयजीएनसीए) या संस्थेचा हा प्रकल्प. ब्रिटनच्या प्रायमरी ट्रस्टवर्दी डिजिटल रिपॉजिटरी ऑथोरायझेशन बॉडी लिमिटेड (पीटीएबी) या संस्थेने नुकतेच ‘एनसीएए’ला ‘आयएसओ १६३६३ : २०१२’हे प्रमाणपत्र दिले आहे. देशभरातील २५ शहरांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे पुढील पाच वर्षांत या संग्रहात तीन लाख तासांचे ऑडिओ-व्हिज्युअल साहित्य उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत या संकेतस्थळावर ध्वनी आणि चित्रफितीच्या स्वरूपातील १५ हजार तासांचे साहित्य प्रकाशित करण्यात आले असून, २३ हजारांहून अधिक तासांची सामग्री डिजिटल स्वरूपात आणण्यात आली आहे. तीही लवकरच उपलब्ध होईल.

एकीकडे राष्ट्रीय पातळीवर हा मान मिळत असताना आपल्यासाठी यात आणखी एक अभिमानाची बाब आहे. ‘एनसीएए’चा पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) पुण्यातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिजिटल प्रि‍झर्व्हेशन’ या ‘सी-डॅक’च्या सहयोगी संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. एनसीएए डिजिटल संग्रहाची स्थापनाच मुळी ‘डिजिटालय’च्या सहकार्याने करण्यात आली आहे. डिजिटालय ही इलेक्ट्रॉनिक अभिलेख व्यवस्थापनाची प्रणाली आहे आणि ती ‘सी-डॅक, पुणे’ने विकसित केली आहे..

हा केवळ ऑनलाइन संग्रह नाही. याचे महत्त्व कितीतरी अधिक आहे. आज सगळे जग खोट्या बातम्यांच्या सुळसुळाटाने त्रस्त झाले आहे. अशा वेळी लोकांना योग्य, विश्वासार्ह आणि अस्सल माहिती मिळणे ही अत्यंत दुष्कर गोष्ट झाली आहे. वैयक्तिक माहितीचे मोठ्या प्रमाणावरील संग्रहण आणि अल्गोरिदम नीट न समजणे, यांमुळे चुकीची माहिती फैलावत आहे, असा इशारा अन्य कोणी नव्हे तर वर्ल्ड वाइड वेब म्हणजेच इंटरनेटला जन्म देणारे संशोधक सर टीम बर्नर्स-ली यांनी दिला आहे. आपल्या आविष्काराच्या – इंटरनेटच्या - २८व्या वर्धापनदिनी लिहिलेल्या खुल्या पत्रात सर टीम बर्नर्स-ली यांनी हा इशारा गेल्या वर्षी मार्चमध्येच दिला होता. सध्या गाजत असलेल्या फेसबुक आणि केम्ब्रिज अॅनालिटिकाच्या प्रकरणावरून तर त्याला बळच मिळते. ज्ञान हा खजिना; पण तो खजिना भरवशाचा हवा. अन् त्या खजिन्याची किल्ली आपल्या हाती येत असेल, तर आणखी काय हवे?

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link