Next
‘पत्रकाराला व्यावसायिक दर्जा आणि माध्यमांना जबाबदारीचे भान हवे’
प्रेस रिलीज
Saturday, July 21, 2018 | 04:09 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘पत्रकारिता हा व्यवसाय आहे; मात्र कायद्यात या व्यवसायाला कुठेही मान्यता नाही. त्यामुळे पत्रकाराला व्यावसायिक दर्जा हवा, तसेच माध्यमांना जबाबदारीचे भान हवे,’ असे प्रतिपादन विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती विष्णू कोकजे यांनी केले.

विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराचे वितरण न्या. कोकजे यांच्या हस्ते २० जुलै रोजी झाले. त्यावेळी ते बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विश्‍व संवाद केंद्राचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी व  संस्थेचे कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर व्यासपीठावर उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकारासाठीच्या पुरस्कारासाठी ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम, युवा नवोदित पत्रकार पुरस्कारासाठी दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’ नाशिकचे प्रवीण बिडवे, छायाचित्रकार पुरस्कारासाठी सांगलीचे उदय देवळेकर आणि सोशल मिडिया पुरस्कारासाठी कोल्हापूरचे विनायक पाचलग यांना नारद पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप अनुक्रमे पंधरा हजार रुपये, अन्य तीन पुरस्कार साडे सात हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ असे आहे. या पुरस्कार उपक्रमाचे हे आठवे वर्ष असून देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने हे पुरस्कार देण्यात येतात. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या चार पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.या प्रसंगी न्या. कोकजे म्हणाले, ‘पत्रकारितेतील अपप्रवृत्तीला जबाबदार व प्रतिष्ठित पत्रकारांना उत्तरे द्यावी लागतात. पत्रकारितेचा सन्मान वाढविण्यासाठी पत्रकाराला व्यावसायिक दर्जा दिला पाहिजे. या व्यवसायातील मंडळींनी कायद्याची मागणी करून स्वयंनियमन करणारी व्यवस्था निर्माण करावी. त्यामुळे विशिष्ट आचारसंहितेचे पालन करता येईल. त्यामुळे पत्रकारांचे स्वातंत्र्य हिरावून न घेता स्वयंनियमनामुळे ते वाढीला लागेल.’

‘इलेक्ट्रानिक्स माध्यमांमुळे मुद्रित माध्यमांसमोरील आव्हाने वाढली आहेत. चोवीस तास बातम्यांमुळे मुद्रित माध्यमांमध्ये बातमी मूल्य राहिलेले नाही. वाचकांची रुची भिन्न असते. गती आणि विश्‍वासार्हता कायम राखायची आहे. जाहिराती आणि बातम्यांचे संतुलन ठेवायचे आहे. आजपर्यंत ही आव्हाने समर्थपणे पेलली आहेत. बातम्यांच्या विश्‍लेषणावर भर दिल्यास मुद्रित माध्यमे स्पर्धेमध्ये टिकू शकतील; तसेच सोशल मीडियावर नियंत्रण आवश्यक आहे. माध्यमांच्या दबावतंत्रांचा न्यायिक आणि सामाजिक व्यवस्थांवर होणार्‍या परिणामांचे पत्रकारांनी भान ठेवले पाहिजे. या दबाव तंत्रामुळे दोषी व्यक्ती सुटला जातो आणि निर्दोष व्यक्ती पकडला जातो. त्यामुळे शिक्षा होण्याचे प्रमाण कमी होते,’ असे न्या. कोकजे यांनी सांगितले.सत्काराला प्रातिनिधिक उत्तर देताना मुकुंद संगोराम म्हणाले, ‘गेल्या चार दशकांत माध्यमांच्या जगात समुद्राएवढा बदल झाला आहे. माध्यमांची व्याप्ती अब्जपटीने वाढली. विचार, चिंतन, मननासाठी वाचन करून आपले मत बनविले जाते, याला तंत्रज्ञानाने छेद दिला. विकास झाल्यावर काही चांगले घडणे अपेक्षित होते; परंतु वातावरण गढूळ झाले आहे. शब्दांवरील विश्‍वास कमी झाला आहे. माध्यमांनीच आपण न्यायाधीश असल्याचे समजायला सुरूवात केली आहे. पत्रकारांनी सदसद्विवेकबुद्धी बाळगणे बंद केले आहे. संपूर्ण समाज माहितीला ज्ञान समजतो आहे. ही अधोगती थांबली पाहिजे. शब्दांवर विश्‍वास वाढावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.’

प्रास्ताविक करताना कुलकर्णी म्हणाले, ‘नारद हे सर्व संचारी होते, तसेच देव आणि दानवांचाही त्यांच्यावर विश्वास होता. नारदाच्या भक्तिसूत्रांमध्ये आजच्या पत्रकारितेसाठीची आचारसंहिता सापडते. नारदाच्या या व्यक्तिमत्त्वाला व्यापक स्वरूप देण्याचे कार्य विश्व संवाद केंद्र करत आहे.’

आसावरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांनी आभार मानले.

( पुरस्कार वितरण सोहळ्याचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link