Next
अझीम प्रेमजी, मनोजकुमार, पंकज अडवाणी
BOI
Tuesday, July 24, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

भारतातल्या अग्रगण्य आणि दानशूर उद्योगपतींपैकी एक असणारे अझीम प्रेमजी, भारतप्रेमी म्हणून गाजलेला मनोजकुमार आणि तब्बल १९ वेळा जगज्जेता ठरलेला ‘बिलियर्डस्’पटू पंकज अडवाणी यांचा २४ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.... 
अझीम प्रेमजी 

२४ जुलै १९४५ रोजी मुंबईत जन्मलेले अझीम प्रेमजी हे भारतातल्या अग्रगण्य उद्योगपतींपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या वडिलांनी १९४५ साली अंमळनेरमध्ये सुरू केलेली ‘वेस्टर्न इंडियन व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स लिमिटेड’ ही ‘सूर्यफूल तेल' आणि ‘787’ ब्रँडचा कपड्यांचा साबण बनवणारी कंपनी त्यांच्या निधनानंतर प्रेमजी यांनी १९६६ साली ताब्यात घेतली आणि १९७७ साली ‘वेस्टर्न इंडिया प्रॉडक्ट्स लिमिटेड – विप्रो’ (WIPRO) असं तिचं सुटसुटीत नाव केलं. प्रामुख्याने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या व्यवसायावर भर देत तिचं रूपांतर भारतातल्याला एका विशाल कंपनीत केलं. आज फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातल्या अब्जाधीशांच्या यादीत प्रेमजी हे १७.९ बिलियन डॉलर्स संपत्तीसह ५८व्या स्थानावर आणि भारतात दुसऱ्या स्थानावर आहेत. व्यवसायात प्रचंड कर्तृत्व दाखवणारे प्रेमजी वृत्तीने तितकेच दानशूरदेखील आहेत. आपल्या अझीम प्रेमजी फाउंडेशनतर्फे त्यांनी भारतात शिक्षणाच्या प्रसारासाठी अफाट देणग्या दिल्या आहेत. सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं आहे. 
........

मनोजकुमार 

‘मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती’ असं गात देशप्रेमाची साद घालणारा, ‘भारत का रहनेवाला हूँ, भारत के गीत गाता हूँ’ म्हणत भारतकुमार अशी ओळख निर्माण करणारा अभिनेता मनोजकुमार याचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी सध्याच्या पाकिस्तानातल्या अबोटाबाद इथं झाला. देशप्रेम हीच मध्यवर्ती संकल्पना ठेवून उपकार, क्रांती, पूरब और पश्चिम, रोटी,कपडा और मकान असे अनेक चित्रपट निर्माण करणाऱ्या मनोजकुमारचं भारतीयांच्या मनात एक वेगळे स्थान आहे. त्यांचं मूळ नाव हरिकिशनगिरी गोस्वामी. दहा वर्षांचे असताना फाळणीमुळे त्यांचे कुटुंब दिल्लीत आले. हिंदू कॉलेजमधून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आणि ते मुंबईत आले. त्यांचे मामा कुलदीप सेहगल हे निर्माते होते. त्या वेळी चित्रपटसृष्टी गाजवत असेलेले दिलीपकुमार यांच्या अभिनयानं ते प्रभावित झाले. दिलीपकुमार, अशोककुमार आणि कामिनी कौशल यांचा ‘शबनम’ हा चित्रपट त्यांनी लहान असताना पाहिला होता. त्यातल्या दिलीपकुमार यांच्या अभिनयाने प्रभावित झाल्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यासाठी त्यांनी त्या चित्रपटातील दिलीपकुमार यांच्या व्यक्तिरेखेचं मनोजकुमार हे नाव धारण केलं आणि हरिकिशन गोस्वामीचा मनोजकुमार झाला. १९५७ मध्ये आलेल्या ‘फॅशन’ या चित्रपटातील छोट्याशा भूमिकेतून त्यांनी आपली चमक दाखवली आणि चित्रपटसृष्टीचं लक्ष वेधून घेतलं. १९६०मध्ये मुख्य नायक म्हणून भूमिका असलेला ‘कांच की गुडिया’ हा त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला; मात्र त्यांना प्रसिद्धी मिळाली ती ‘हरियाली और रास्ता’ या चित्रपटाने. मग मात्र, मनोजकुमार यांनी मागे वळून पाहिले नाही. लेखन हाही त्यांचा आवडता छंद. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी ‘घोस्ट रायटर’ म्हणून काम केलं आहे. चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक , निर्माता म्हणून त्यांचं योगदान अमूल्य आहे. १९९२मध्ये त्यांना पद्मश्री सन्मान बहाल करण्यात आला. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन २०१६मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आलं. याशिवायही अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ‘यश हे कधी हात पसरणाऱ्यांकडे जात नाही, ते जातं मेहनत करणाऱ्यांकडे. मला मेहनत करायला आवडेल, असं म्हणत टक्केटोणपे खात अतिशय कष्टाने मनोजकुमार यांनी भारतकुमार ही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.  
..........

पंकज अडवाणी 

२४ जुलै १९८५ रोजी पुण्यात जन्मलेला पंकज अडवाणी हा इंग्लिश बिलियर्डस् आणि स्नूकर प्रकारांत तब्बल १९ वेळा जगज्जेता ठरलेला भारताचा तरुण खेळाडू. त्याने भारतीय चॅम्पियनशिप, आशियाई चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप अशा तीन स्पर्धा एकाच वर्षांत जिंकण्याची हॅट्ट्रिक २००५, २००८ आणि २०१२ अशी तीन वेळा केली आहे. लाँग स्नूकर आणि शॉर्ट स्नूकर अशा दोन्ही प्रकारांत जागतिक स्पर्धा जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 
....

यांचाही आज जन्मदिन :

फ्रेंच साहित्यिक अलेक्झांद्र ड्युमा (जन्म : २४ जुलै १८०२, मृत्यू : पाच डिसेंबर १८७०) 
अमेरिकन लेखिका झेल्ड फित्झेराल्ड (जन्म : २४ जुलै १९००, मृत्यू : १० मार्च १९४८)
कवी, नाटककार नारायण विनायक कुलकर्णी (गोविंदानुज) (जन्म : २४ जुलै १८९२, मृत्यू : १२ जानेवारी १९४८) 
(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
नाटककार, अनुवादक प्रा. मधुकर तोरडमल (जन्म : २४ जुलै १९३२ ,मृत्यू : दोन जुलै २०१७) (यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link