Next
पं. विजय कोपरकर, विवेक सोनार यांना पं. संगमेश्वर गुरव पुरस्कार जाहीर
प्रेस रिलीज
Tuesday, April 24, 2018 | 04:33 PM
15 0 0
Share this story

पं. विजय कोपरकर
पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. विजय कोपरकर यांना या वर्षीचा ‘पं. संगमेश्वर गुरव स्मृती पुरस्कार’, तर प्रसिद्ध बासरीवादक विवेक सोनार यांना ‘पं. संगमेश्वर गुरव युवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. कलानुभव चॅरिटेबल ट्रस्टचे पं. कैवल्यकुमार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे.

विवेक सोनार
पुण्यातील कलानुभव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दर वर्षी अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हे दोन्ही पुरस्कार प्रदान केले जातात. पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून, मानपत्र, स्मृतीचिन्ह, रोख रक्कम, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुढील महिन्यात पुण्यामध्ये होणाऱ्या महोत्सवादरम्यान हे पुरस्कार ट्रस्टच्या वतीने प्रदान करण्यात येतील. असे ट्रस्टने कळवले आहे.

मुळचे पुण्याचे असलेले पं. विजय कोपरकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक असून, पं. वसंतराव देशपांडे आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे गिरवले आहेत, तर विवेक सोनार हे पद्मविभूषण पं. हरीप्रसाद चौरासिया यांचे शिष्य असून, एक आश्वासक युवा बासरीवादक म्हणून त्यांची ओळख आहे.       

कलाक्षेत्रातील तरुण वर्गाला सुयोग्य मार्गदर्शन मिळावे; तसेच त्यांना आपली कला सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी या ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या क्षेत्रात गेली आठ वर्षे हा ट्रस्ट कार्यरत असून, त्यामार्फत संगीतप्रेमींसाठी अनेकविध कार्यक्रम, स्पर्धा, कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात येते. याशिवाय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची जपणूक व्हावी; ते पुढील पिढीपर्यंत पोहोचावे या उद्देशाने ट्रस्टच्या वतीने पुणे शहरात कलानुभव गुरुकुलाची स्थापना करण्यात आली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link