Next
‘सिंधू’ नृत्यमहोत्सव येत्या दोन ते चार मार्च दरम्यान
प्रेस रिलीज
Friday, February 23 | 06:02 PM
15 0 0
Share this story

पुणे : नृत्य दिग्दर्शक म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेले नर्तक वैभव आरेकर आणि सुशांत जाधव यांच्या संकल्पनेतून ‘सांख्य डान्स कंपनी’ व पुण्यातील ‘मुद्रा सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिंधू नृत्य महोत्सव’ या दोन दिवसीय नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

वैभव आरेकर
‘पुढील आठवड्यात शुक्रवार, दोन मार्च व शनिवार, तीन मार्च रोजी अनुक्रमे बालगंधर्व रंगमंदिर व टिळक स्मारक मंदिर येथे हा महोत्सव होणार आहे. रविवारी, चार मार्च रोजी प्रवीण कुमार, वैभव आरेकर आणि सुशांत जाधव हे मोफत कार्यशाळा घेणार आहेत’, अशी माहिती ‘सांख्य डान्स कंपनी’चे संस्थापक वैभव आरेकर यांनी दिली. या वेळी ‘सांख्य’ डान्स कंपनीचे सुशांत जाधव व ‘मुद्रा सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’च्या संस्थापिका पूनम गोखले उपस्थित होत्या.

आरेकर पुढे म्हणाले, ‘या महोत्सवात देश विदेशातील प्रसिद्ध कलाकारांच्या कलाविष्काराबरोबरच ‘श्रीमंत योगी’ या आमच्या खास नाट्य- नृत्याविष्कारासह प्रवीण कुमार यांचा ‘मार्गम्’ हा पारंपरिक भरतनाट्यम् नृत्याचा आविष्कार आणि शर्वरी जमेनीस व ऋजुता सोमण यांचे पारंपरिक कथक नृत्य पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. माझ्या आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ, तिला अभिवादन करण्यासाठी सहा वर्षांपूर्वी मुंबईत या महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. गेली तीन वर्षे चोखंदळ रसिकांच्या पुण्यात आमच्या या महोत्सवाला जो प्रतिसाद मिळाला तो वाखाणण्याजोगा आहे. देशभरातील प्रमुख नृत्यमहोत्सवांमध्ये ‘सिंधू’ची गणना होते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या आधी या महोत्सवात पद्मविभूषण डॉ. कनक रेळे, पद्मविभूषण सी. व्ही. चंद्रशेखर, पद्मश्री मालविका सरुक्की, प्रियदर्शनी गोविंद, उमा डोगरा, रतीकांत महोपात्रा, सुजाता महोपात्रा यांसारख्या मोठ्या कलाकारांनी आपली कला सादर केली आहे.’

‘शास्त्रीय नृत्यामध्ये असलेले वैविध्य आणि नाविन्य रसिकांसमोर यावे आणि त्याचा प्रसार, प्रचार व्हावा या उद्देशाने ‘सांख्य’ या नृत्य संस्थेची स्थापना झाली आहे. पारंपारिक शास्त्रीय नृत्यापासून समकालीन नृत्यप्रकारापर्यंत विविध गोष्टींवर विद्यार्थ्यांनी भर द्यावा यासाठी संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. यातूनच सतत सर्जनशील प्रयत्न करत असताना ‘सिंधू’ या नृत्य महोत्सवाची संकल्पना पुढे आली आणि अल्पावधीत हा महोत्सव रसिकांच्या पसंतीस उतरला’, असेही आरेकर यांनी या वेळी सांगितले.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी सात वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे वैभव आरेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘श्रीमंत योगी’ या खास नाट्याविष्काराचे सादरीकरण होणार आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित भरतनाट्यम् नृत्याविष्कार असून यात नृत्याच्या माध्यमातून शिवाजी महाराज आणि त्या काळच्या समाजाचे सांस्कृतिक, सामाजिक आणि आंतरिक चित्र उभे करण्याचा प्रयत्न वैभव आरेकर यांनी केला आहे. शिवरायांच्या जन्माअगोदरची महाराष्ट्रातील परिस्थिती, मुघल सत्ता व त्यादरम्यान प्रजेवर होत असलेले अत्याचार, शिवरायांचा जन्म, त्यांनी घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ, शिवरायांचा राज्याभिषेक, त्यांचे सत्तारूढ होणे, आंतरिक आध्यात्मिक संघर्ष आणि 'कर्मयोगी छत्रपती’ होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.    

त्यानंतर शनिवारी, तीन मार्च रोजी सायंकाळी सात  वाजता टिळक स्मारक मंदिर येथे प्रवीण कुमार यांच्या ‘मार्गम्’ या पारंपरिक भरतनाट्यम् नृत्याविष्काराचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर प्रसिद्ध कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस, ऋजुता सोमण, प्राजक्ता राज, मनीषा अभय या कथक गुरु रोहिणी भाटे यांच्या काही निवडक रचनांवर पारंपरिक कथक नृत्याचे सादरीकरण करणार आहेत.

तर, रविवारी ४ मार्च रोजी भरतनाट्यम नृत्याच्या विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना उपयुक्त ठरेल अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता होणाऱ्या या कार्यशाळेत प्रवीण कुमार आणि वैभव आरेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. याबरोबरच सुशांत जाधव यांची ‘लाईट डिझायनिंग’ या विषयावरील कार्यशाळा देखील होणार आहे. कोथरूड येथील शांतीबन सोसायटीमधील क्लब हाउसमध्ये या कार्यशाळा  होणार असून त्या सर्वांसाठी खुल्या आणि विनामूल्य आहेत.   

महोत्सवाच्या सत्रांना प्रवेशशुल्क असून त्याच्या प्रवेशिका महोत्सवाच्या तीन दिवस आधी कार्यक्रमस्थळी उपलब्ध होऊ शकतील. तिकिटांसाठी ८९८३३७२२४५ / ९८२२८३१२२८ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link