Next
‘पीपीएफ’ खात्याबाबत आणखी काही...
BOI
Saturday, August 18, 2018 | 03:45 PM
15 1 0
Share this article:

‘सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी’ म्हणजेच ‘पब्लिक प्रॉव्हिडंड फंड’ (पीपीएफ) हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. ही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असल्याचे दिसून येते. याच्या आणखी काही लाभांबाबत जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
..........
‘सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी’ म्हणजेच ‘पब्लिक प्रॉव्हिडंड फंड’ (पीपीएफ) यातील गुंतवणूक प्राप्तिकराच्या ‘कलम ८० सी’नुसार करसवलतीस पात्र असते. शिवाय यावर मिळणारे व्याजही करमुक्त असते. सध्या यावर मिळणारे व्याज हे वेळोवेळी बाजारात होणाऱ्या व्याजातील चढ-उतारानुसार कमी अधिक होत असते. खात्याची प्रारंभिक मुदत १५ वर्षांची असते; मात्र ही मुदत कशी ठरविली जाते, मुदतीच्या कालावधीत गरज पडल्यास रक्कम काढता येते का व कशी काढता येते, ही मुदत संपल्यावर खातेधारकास काय पर्याय उपलब्ध असतात, याबाबत फारशी माहिती नसते. आज आपण याबाबत सविस्तर माहिती घेऊ.

‘पीपीएफ’ खात्याची मुदत १५ वर्षांची असते. समजा, आपण पाच ऑगस्ट २०१८ रोजी ‘पीपीएफ’चे खाते उघडले आहे. याचा अर्थ आपण आर्थिक वर्ष २०१८-१९मध्ये हे खाते उघडले आहे. एक एप्रिल २०१९पासून पुढे १५ वर्षांनी म्हणजे ३१ मार्च २०३४ रोजी या खात्याची १५ वर्षांची मुदत संपुष्टात येईल.
दरम्यानच्या काळात आपल्याला गरज पडली, तर या खात्यातील शिल्लक रकमेनुसार आपल्याला कर्ज घेता येते. पाच ऑगस्ट २०१८ रोजी उघडलेल्या खात्यावर ३१ मार्च २०२०पासून ३१ मार्च २०२४पर्यंतच आधीच्या दोन आर्थिक वर्षाअखेरीस शिल्लक असलेल्या रकमेच्या २५ टक्के इतके कर्ज मिळू शकते. अशा कर्जाची पुढे तीन वर्षांत परतफेड करावयाची असते. या कर्जास ‘पीपीएफ’वर मिळणाऱ्या व्याजापेक्षा दोन टक्के अधिक इतके व्याज द्यावे लागते. सध्या हा व्याजदर ७.६ टक्के इतका असल्याने सध्या कर्जाचा व्याजदर ९.६ टक्के इतका असेल. 

हा पाच वर्षांचा कालावधी संपल्यावर कर्ज न घेता शिल्लक रकमेतून पुढीलप्रमाणे रक्कम काढता येते व या रकमेची परतफेड करावी लागत नाही. खाते उघडलेल्या आर्थिक वर्षापासून पुढील सहा आर्थिक वर्षे संपल्यावर म्हणजे वरील उदाहरणानुसार, आर्थिक वर्ष २०१८-१९पासून पुढे सहा वर्षे म्हणजे २३-२४ या आर्थिक वर्षानंतर म्हणजे एक एप्रिल २०२४पासून पुढे खाते उघडलेल्या आर्थिक वर्षापासून पुढच्या चौथ्या आर्थिक वर्षाअखेरीस व सहाव्या आर्थिक वर्षाअखेरीस असलेल्या शिल्लक रकमेच्या ५० टक्के यापैकी कमीत कमी इतकी रक्कम काढता येते. उदाहरणार्थ, आपल्या खात्यात ३१ मार्च २०२२ रोजी दोन लाख रुपये इतकी शिल्लक आहे व ३१ मार्च २०२४ रोजी तीन लाख इतकी रक्कम शिल्लक असेल, तर एक एप्रिल २०२४ नंतर आपण एक लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम काढू शकतो. याच नियमाने पुढेही रक्कम काढू शकतो. म्हणजे ३१ मार्च २०१३ रोजी दोन लाख ५० हजार रुपये इतकी शिल्लक असेल व ३१ मार्च २०२५ रोजी आधीच्या वर्षी एक लाख ५० हजार रुपये काढल्याने दोन लाख इतकी शिल्लक असेल, तर एक एप्रिल २०२५ नंतर एक लाख रुपये इतकी रक्कम काढता येईल.
एक एप्रिल २०३४नंतर या खात्यातील व्याजासहितची संपूर्ण रक्कम काढता येते. अशी संपूर्ण रक्कम एकरकमी अथवा हप्त्याहप्त्याने ३१ मार्च २०३५पर्यंतच काढता येईल. (पुढील एक वर्षाच्या आत) मात्र आपण ३१ मार्च २०३५च्या आधी रक्कम काढली नाही व बँकेस काहीही कळविले नाही, तर या खात्याची रक्कम आपोआप पाच वर्षांसाठी वाढविली जाते. शिल्लक रकमेवर प्रचलित दराने व्याज दिले जाते; मात्र या खात्यात यापुढे रक्कम भरता येत नाही. तसेच जोपर्यंत हे खाते बंद होत नाही, तोपर्यंत नवीन पीपीएफ खाते उघडता येत नाही. आपण बँकेस खात्याची मुदत वाढविण्यासाठीची लेखी विनंती केली, तर या खात्याची मुदत पुढे पाच वर्षे वाढविली जाते. तथापि अशी लेखी विनंती खात्याची मुदत संपल्यापासून एक वर्षाच्या आत करणे आवश्यक असते. या खात्यात पुढील पाच वर्षे नियमानुसार रक्कमही गुंतविता येते. याशिवाय अशी मुदत वाढविताना गरज असेल, तर १५ वर्षे मुदतीनंतर शिल्लक असलेल्या रकमेपैकी जास्तीत जास्त ६० टक्के इतकी रक्कम सुरुवातीच्या वर्षातच काढता येते.

अशी मुदत स्वत:हून वाढविल्यास केली जाणारी गुंतवणूक ‘८० सी’ अंतर्गत वजावटीस पात्र असते. येथून पुढे कितीही वेळा ही मुदत पाच वर्षांसाठी वाढविता येते.
थोडक्यात, पीपीएफ खात्याचा उपयोग आपल्याला गरजेनुसार करून घेता येतो; गरज आहे ती याबाबतची सखोल माहिती असण्याची.

(‘पीपीएफ’बद्दलचा याआधीचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 

- सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search