Next
‘मराठी टिकविणे ही आपणा सर्वांची जबाबदारी’
BOI
Monday, March 05, 2018 | 06:00 PM
15 0 0
Share this article:


महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे आणि इस्लामपूर शाखेतर्फे आयोजित, यंदाचे युवा साहित्य-नाट्य संमेलन इस्लामपूरला ११ मार्चला होणार आहे. कादंबरीकार, कवी, संगीतकार, गायक आणि पेशाने दंतशल्यचिकित्सक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. आशुतोष जावडेकर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या मराठी भाषा दिन उपक्रमात आवर्जून सहभागी होऊन त्यांनी मराठी भाषेचे संवर्धन, नवीन पिढीची मराठी अशा मुद्द्यांवर आपले मनोगत व्यक्त केले. विंदा करंदीकर यांच्या ‘तुकोबांच्या भेटी शेक्सपिअर आला’ या कवितेचे अभिवाचन त्यांनी केले. तसेच ‘निर्धार’ या स्वतः संगीत दिलेल्या गाण्याच्या काही ओळीही त्यांनी सादर केल्या.
.............
- सोशल मीडियावर होणारी मराठी भाषेची तोडमोड, तरुण पिढीमध्ये व्याकरण, शुद्धलेखनाबद्दल असलेली अनास्था, याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
काळाच्या रेट्याबरोबर जी भाषा बदलेल ती टिकेल, असा भाषाशास्त्राचा नियम आहे. त्यामुळे आज मराठीत जे काही बदल होत आहेत, त्याबद्दल फार वाईट वाटून न घेता ती कशी समृद्ध होईल, टिकेल याकडे लक्ष दिले पाहिजे. भाषेला नियम, शिस्त हवीच; पण त्याचा दुराग्रह नसावा. नवीन पिढी त्यांच्या जगण्याच्या पद्धतीनुसार अभिव्यक्त होणार हे मान्य केले पाहिजे. त्यांचे जगणेच वेगळे आहे. त्यामुळे भाषेवरही त्याचा प्रभाव दिसणारच. आपल्या आधीच्या पिढ्यांनीही भाषेत बदल केलेच. पुरातन काळातील मराठी आज आपण वापरत नाही. त्यात काळाच्या ओघात बदल झाले, तरीही मराठी टिकून आहे. नवीन पिढी मराठीचे रूपडे पालटत नेईल. त्यात काही चुकीचे नाही. त्यामुळे भाषेच्या तोडमोडीबद्दल बोलत राहण्यापेक्षा तिचे संवर्धन सगळ्यांनी मिळून केले पाहिजे. ती केवळ सरकार, लेखक, साहित्यिक यांचीच नव्हे, तर आपणा सर्वांची जबाबदारी आहे.

- युवा साहित्य-नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मराठीच्या संवर्धनासाठी आपली भूमिका काय?
भाषा टिकवण्यासाठी, सगळ्यात आधी म्हणजे सर्वांनी मराठी भाषा बोलण्याचा वृथा न्यूनगंड न बाळगता मराठीतच बोलले पाहिजे. जिथे अगदी कळणार नाही, तिथे हिंदी बोलता येते. तमिळ भाषकांमध्ये स्वतःच्या अस्मितेचे प्रेम आहे. ते काही वेळा आत्यंतिक वाटते; पण त्यातूनही काही शिकले पाहिजे. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मराठी बोलले पाहिजे. साहित्य हा भाषेचा मूलस्रोत असतो. भाषेची समृद्धी त्यातील साहित्यावर ठरते. त्यामुळे वाचन संस्कृती वाढवली पाहिजे. मराठीतील समृद्ध साहित्य ठेवा सर्वांपर्यत पोहोचवला पाहिजे. नव्या पिढीपर्यंत मराठीचे संचित दृकश्राव्य माध्यमातूनदेखील पोहोचवले पाहिजे. विविध मार्गांनी साहित्याचा प्रसार केला पाहिजे. सरकारी पातळीवर, धोरणात्मक पातळीवरही काही प्रयत्न केले पाहिजेत. त्यात मराठीला अभिजात दर्जा देण्याचा प्रयत्न असो, शाळांमध्ये मराठीचा अंतर्भाव कितवीपासून, किती प्रमाणात अशा मुद्द्यांवर काम झाले पाहिजे. यात व्यवहार्य सीमारेषा आखली गेली पाहिजे. एकही इंग्रजी शब्द वापरणार नाही, असे न म्हणता व्यवहार्य मराठीचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे. ज्यांनी जन्मानंतर पहिला शब्द आई किंवा बाबा हे उच्चारले आहेत, अशा आपण सर्वांनी मराठी टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
 
(शब्दांकन : प्राची गावस्कर)
(‘बुकगंगा डॉट कॉम’वरून डॉ. आशुतोष जावडेकर यांची पुस्तकं घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/4tZCKQ येथे क्लिक करा.)
......................
तुकोबांच्या भेटी शेक्सपिअर आला

तुकोबांच्या भेटी । शेक्सपिअर आला।।
तो झाला सोहळा। दुकानात.
जाहली दोघांची । उराउरी भेट
उरातलें थेट । उरामध्ये
तुका म्हणे “विल्या। तुझे कर्म थोर;
अवघाचि संसार । उभा केला।।”
शेक्सपीअर म्हणे । एक ते राहिले;।
तुका जे पाहिले विटेवरी.”
तुका म्हणे, “बाबा ते त्वां बरे केले,
त्याने तडे गेले। संसाराला;
विठठ्ल अट्टल, । त्याची रीत न्यारी
माझी पाटी कोरी । लिहोनिया.”
शेक्सपीअर म्हणे । तुझ्या शब्दामुळे
मातीत खेळले । शब्दातीत
तुका म्हणे गड्या । वृथा शब्दपीट
प्रत्येकाची वाट । वेगळाली
वेगळिये वाटे । वेगळिये काटे;
काट्यासंगे भेटे । पुन्हा तोच.
ऐक ऐक वाजे । घंटा ही मंदिरी।
कजागीण घरी । वाट पाहे.”
दोघे निघोनिया गेले दोन दिशां
कवतिक आकाशा आवरेना ।
- विंदा करंदीकर


(‘विंदां’बद्दलचे लेख वाचण्यासाठी https://goo.gl/MrcX3n येथे, तर ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून ‘विंदां’ची पुस्तकं मागविण्यासाठी https://goo.gl/ytZe6f येथे क्लिक करा. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search