Next
‘प्रत्यक्ष अनुभव व कामातून ज्ञानप्राप्ती ही रोजगारक्षमतेची किल्ली’
विवेक सावंत यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Monday, August 13 | 12:16 PM
15 0 0
Share this story

मनोविकास प्रकाशनच्या वतीने औद्योगिक मानसशास्त्राची उत्कंठा वाढविणाऱ्या ‘कॉर्पोरेट कल्लोळ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी विवेक सावंत, डॉ. राजेंद्र बर्वे, नीलांबरी जोशी, दीपक घैसास आणि अरविंद पाटकर उपस्थित होते.

पुणे : ‘आज आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान आणि ठोकताळे यांवर आधारित शिक्षण दिले जाते मात्र रोज येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपली शिक्षण पद्धती तितकीशी सक्षम नसून, ती बदलत महात्मा गांधी यांची ‘नयी तालीम’ अर्थात प्रत्यक्ष कामातून अनुभूती व त्या अनुभूतीमधून ज्ञानाची प्रचीती याचे अनुकरण केले गेले पाहिजे. केवळ पुस्तकांवर अवलंबून न रहाता प्रत्यक्ष अनुभवामधून शिकणे महत्त्वाचे असून, आजच्या काळात हीच रोजगारक्षमतेची गुरुकिल्ली आहे’, असे मत महाराष्ट्र नॉलेज कोर्पोरेशन लिमिटेड अर्थात एमकेसीएलचे संचालक विवेक सावंत यांनी व्यक्त केले.

पुण्यातील मनोविकास प्रकाशनच्या वतीने आयोजित ‘कामाच्या ठिकाणचे ताणतणाव’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सावंत बोलत होते. आय फ्लेक्स सोल्युशन लिमिटेडचे अध्यक्ष दीपक घैसास आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि लेखक डॉ. राजेंद्र बर्वे, मनोविकास प्रकाशनचे संस्थापक संचालक अरविंद पाटकर, आशीष पाटकर या वेळी उपस्थित होते. याबरोबरच मनोविकास प्रकाशन यांच्या वतीने निलांबरी जोशी लिखित ‘कॉर्पोरेट कल्लोळ‘ पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.

सावंत पुढे  म्हणाले, ‘महात्मा गांधी यांनी अहिंसेपेक्षा देशाला मोठी देणगी दिली आहे ती म्हणजे नयी तालीम. यामध्ये असलेला शिक्षण प्रक्रीयेमागील मूलभूत विचार आपण अवलंबिला पाहिजे. शाळेत क्लोज एंडेड प्रश्नांना सोडचिठ्ठी देत, त्याच प्रश्नाची  वेगवेगळी उत्तरे सर्वजण कसे देतील याचा विचार झाला पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांमधील भाषिकज्ञान, संभाषण कौशल्य, सांघिक कौशल्य, डिजिटल स्कील्स, सॉफ्ट स्कील्स वाढण्यास मदत होईल. यामुळे केवळ ‘स्मार्ट’ नाही तर ‘वायजर’ होण्याच्या दृष्टीने आपण पाऊले टाकू शकू.’ 

याबरोबरच सावंत यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी केलेल्या अनेक प्रयोगांबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘कॉर्पोरेट जगात एक व्यक्ती मालक आणि एक कर्मचारी हा भेदभाव मला न पटणारा आहे. कर्मचारी हा कधीही एक उपभोग्य वस्तू, मानवी भांडवल, मानवी संसाधन नसतो तर तो संस्थेचा एक भागधारक असतो.’

‘यशस्वी उद्योग हा यशस्वी समाजाची निर्मिती करतो. तर पुढे यशस्वी समाजातच अशा यशस्वी उद्योगांची निर्मिती करता येऊ शकते. ‘कॉर्पोरेट कल्लोळ’ या पुस्तकात नेमके हेच लक्षात घेत कर्मचारी, त्यांच्या अपेक्षा, त्यांना येणाऱ्या समस्या, कामाची ठिकाणे या सर्वांसंदर्भात होणारे संघर्ष यांचे वर्णन करण्यात आले आहे. मालक आणि कामगार यांमधील द्वंद्वाचे रुपांतर मैत्रीत कसे करता येईल याचा विचार देखील या पुस्तकात मांडला आहे’, असेही सावंत यांनी नमूद केले. 

डॉ. राजेंद्र बर्वे म्हणाले, ‘आज कॉर्पोरेट जगाला गौतम बुद्धांच्या ‘माइंडफुलनेस’ या तत्त्वाची गरज आहे. आपण आज फक्त माहितीने परिपूर्ण आहोत. यामध्ये त्या विषयाचे ज्ञानाचा समावेश नाही. ज्ञान ग्रहण करण्यास आपण कमी पडत आहोत. याबरोबरच केवळ स्वत:चा विचार न करता आपली टीम, संस्था यांचा देखील विचार होणे गरजेचे आहे.’

घैसास यांनी कर्मचारी हा आपल्या कंपनीचा एक अविभाज्य भाग असे मानत कशा पद्धतीने वागले पाहिजे याची काही उदाहरणे दिली. याबरोबर कंपनी आणि कर्मचारी यांना आलेल्या अडचणी कशा पद्धतीने सोडविल्या याचे काही अनुभवदेखील उपस्थितांना सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link