Next
भारतीय वाद्यसंगीत - भाग एक
BOI
Tuesday, July 16, 2019 | 06:45 AM
15 1 0
Share this article:


विसाव्या शतकापूर्वी आपल्या समाजात गायनाला श्रेष्ठ मानलं जात असे आणि वादनाला गौण लेखलं जात असे. वाद्यवादन हे केवळ साथसंगतीसाठीच उपयोगी मानलं जात असे. परंतु विसाव्या शतकात मात्र या वादनाच्या क्षेत्रात फार मोठे क्रांतिकारी बदल झालेले दिसून येतात... ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत भारतीय वाद्यसंगीताबद्दल...
.................................
‘गीतं वाद्यं च नृत्यं च त्रयं संगीतम् उच्यते’ या उक्तीप्रमाणे,  गायन, वादन आणि नृत्य या तीन कलांना मिळून संगीत म्हटलं जातं. भारतीय संगीतात गायन, वादन, नृत्य या तिन्ही कलाशाखांचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. वास्तविक पाहता, संगीताची अधिष्ठात्री देवता सरस्वती ही वीणाधारिणी. शिवशंकर हे डमरूधर, कृष्णकन्हैया मुरलीधर. या देवदेवतांनी या वाद्यांना आपल्या स्वरूपाचा अविभाज्य भाग बनवून एक प्रकारे सन्मानच प्राप्त करून दिला आहे. शिवशंकरांनी तर त्यांच्या तांडव नृत्यातून नृत्यकलेचाही परिचय करून दिला. भारतात आठशे-हजार वर्षांपूर्वीपासून वीणावादन प्रचलित होतं. पुढे धृपद गायकीवरही वीणावादनाचा प्रभाव दिसून येतो. 

उत्तर भारतीय हिंदुस्थानी संगीतातील गायन प्रकारांत कालमानानुसार बदल होत गेले. वाद्यवादनाचं स्वरूप गायनाच्या साथीपुरतं मर्यादित होतं. तर नृत्यकलेलाही निरनिराळ्या संदर्भात कमी-अधिक महत्त्वाचं स्थान दिलं गेलं. दाक्षिणात्य पद्धतीत फार पूर्वीपासून गायन, वादन, नृत्यादि कलांचं स्थान देवालयांमध्ये ईश्वरभक्तीचं साधन म्हणून परिचित होतं. करमणुकीचं, मनोरंजनाचं साधन म्हणून या कलांकडे पाहिलं जात नव्हतं.

विसाव्या शतकापूर्वी आपल्या समाजात, ‘उत्तम गाना और मध्यम बजाना’ अशी समजूत होती. म्हणजेच गायन श्रेष्ठ मानलं जायचं आणि वादनाला गौण लेखलं जात असे. म्हणून संगीताच्या क्षेत्रात गवयाला जेवढा मान मिळत असे, तेवढा वादकाला मिळत नसे. वाद्यवादन हे केवळ साथसंगतीसाठीच उपयोगी मानलं जात असे. परंतु विसाव्या शतकात मात्र या वादनाच्या क्षेत्रात फार मोठे क्रांतिकारी बदल झालेले दिसून येतात. वादन क्षेत्रातील या उल्लेखनीय बदलांचा आणि त्याला कारणीभूत ठरलेल्या काही कलाकारांच्या कार्याचा आढावा घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

विसाव्या शतकात जे बदललेलं चित्र दिसतं, त्यात हार्मोनिअम, गिटार, व्हायोलिन यांसारखी पाश्चात्य वाद्यं, भारतीय साज लेऊन, स्वतंत्र वादनाच्या मैफली गाजवू लागली. या पाश्चात्य वाद्यांचं भारतीयीकरण, हे वाद्यवादनाच्या विकासात उपकारकच ठरलं आहे. या वाद्यांनी भारतीय संगीताचा साज ल्याला, त्याला जवजवळ शतक लोटलं. ही वाद्यं मुळात पाश्चात्य होती, हेच मुळी विसरायला झालंय, इतकी ती इथल्या संगीताशी एकरूप झाली आहेत. रबाब या मूळ पर्शियन वाद्यात थोडाफार बदल होऊन निर्माण झालेलं सरोद हे वाद्यही, इथल्या वीणा, सतार या वाद्यांइतकंच लोकप्रिय झालंय. 

बासरी, संतूर यांसारखी आधी फक्त लोकसंगीतात वापरली जाणारी वाद्यं, मैफलीतली स्वतंत्र वादनाची वाद्यं म्हणून मान्यता पावली आहेत. फक्त देवालयात आणि मंगल प्रसंगी वाजवली जाणारी सनई स्वतंत्र वादनाच्या मैफलीत विराजमान झाली आहे. तबला हे वाद्य केवळ गायन-वादनाच्या साथीचं वाद्य म्हणून आता राहिलं नाही. स्वतंत्र तबलावादनाची लोकप्रियता कळसाला पोहोचली आहे. ही सगळी वाद्यं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा अविभाज्य भाग बनून राहिली आहेत आणि गायनाच्या मैफलींइतकंच, आता वादनाच्या कार्यक्रमांनाही संगीत महोत्सवांमध्ये स्थान मिळताना दिसतंय.

दाक्षिणात्य म्हणजेच कर्नाटक संगीत पद्धतीत वीणावादन फार पूर्वीपासून प्रचलित होतं. त्याच्याबरोबरीनं आता व्हायोलिन आणि मेंडोलिन या वाद्यांनीही मैफलीत स्थान मिळवलं आहे. कर्नाटक संगीतात साथीसाठी प्रचलित असलेली पखवाज, मृदंगम्, घटम् ही वाद्यंही लोकप्रिय झाली आहेत. अर्थातच या सर्व क्रांतिकारी विकासामागे उच्च कोटीच्या अनेक समर्थ वादक कलाकारांचे प्रयत्न आणि त्यांची साधना आहे. आपल्या वाद्याला हा मान प्राप्त करून देण्यासाठी, त्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. आपापल्या वाद्यांच्या मर्यादा जाणून घेतल्यावर, त्यांच्यातल्या त्रुटींवर बुद्धिकौशल्यानं मात करत, त्यांनी आपल्या वाद्यांमध्येही क्रांतिकारी बदल घडवून आणले. म्हणूनच त्यांच्या तपश्चर्येमुळे, या वाद्यांना आणि वाद्यसंगीताला ही प्रतिष्ठा प्राप्त झालेली दिसून येते. आपलं वाद्य जगभरच्या रसिकांमध्ये लोकप्रिय करण्याच्या त्यांच्या या कार्यामुळे, त्या त्या कलाकाराचं नाव, त्याच्या वाद्याच्या नावाशी कायमचं जोडलं गेलं आहे. इतकं, की हे वाद्य म्हणजेच हा कलाकार असं समीकरण रसिकांच्या मनावर बिंबलं गेलं आहे. 

याचा प्राथमिक स्वरूपात विचार करता, वाद्य आणि कलाकार यांच्या या जोड्या जगप्रसिद्ध आहेत.

सनई : उस्ताद बिस्मिल्ला खाँ
सतार : पं. रविशंकर,  उस्ताद विलायत खाँ
बासरी : पं. पन्नालाल घोष, पं. हरिप्रसाद चौरसिया
सरोद : उस्ताद अली अकबर खाँ, उस्ताद अमजद अली खाँ
सारंगी : पं. रामनारायण
व्हायोलिन : पं. व्ही. जी. जोग, पं. डी. के. दातार, एन् राजम्
संतूर : पं. शिवकुमार शर्मा, पं. उल्हास बापट
हार्मोनिअम : पं. गोविंदराव टेंबे
तबला : उस्ताद अल्लारखाँ, उस्ताद झाकीर हुसेन
गिटार : पं. ब्रिजभूषण काब्रा
मोहनवीणा : पं. विश्वमोहन भट
व्हायोलिन : (कर्नाटक पद्धती) पं. एल. सुब्रह्मण्यम्
मेंडोलिन : (कर्नाटक पद्धती) पं. यू. श्रीनिवासन्

या सर्व श्रेष्ठ कलाकारांपैकी काहींनी संशोधक वृत्तीने, आपल्या वाद्याच्या रचनेत आमूलाग्र बदल केले. आपल्या वादनाचा दर्जा उंचावून, वाद्यसंगीत लोकप्रिय केले. अशा काही कलाकारांचा परिचय पुढील भागांमध्ये करून घेऊ या.

(भारतीय संगीतातील वाद्यवादनातील महत्त्वाचे बदल नजरेस आणून देणं या उद्देशाने भारतीय वाद्यसंगीत आणि वाद्य कलाकार यांची माहिती देण्याचा प्रयत्न आहे. सर्व वादक कलाकारांचा परिचय किंवा वाद्यसंगीताचा इतिहास सांगणं हा उद्देश नाही. त्यामुळे काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय वादक कलाकारांबद्दल उचित आदर बाळगून, काही निवडक कलाकारांच्या संशोधनात्मक कार्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न यातून करते आहे.)

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shirish Pohnerkar. Pohnerkar About 61 Days ago
At the time of singing/hearingSinging we left from our mind all poor+bad THINNKING WE ALL MOTIVATE FROM THE WORDS OF SINGING SIR
0
0

Select Language
Share Link
 
Search