Next
‘कॅफे’च्या माहौलला ‘क्रिकेट’चा तडका; पुण्यातील तरुणाने सुरू केला ‘क्रिककॅफे’
प्रणित जाधव
Wednesday, June 19, 2019 | 04:04 PM
15 0 0
Share this article:पुणे :
सध्या सुरू असलेली क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा आणि त्यात भारताने पाकिस्तानवर मिळवलेला विजय यामुळे देशभरात मान्सूनसह क्रिकेटचेही वारे जोरात वाहत आहेत. क्रिकेट हा जणू धर्मच असलेल्या भारतात या खेळाचे चाहतेही तितकेच ‘क्रेझी’ आहेत आणि या सर्वांपेक्षा वेगळा नसेल तो पुणेकर कसला! तुषार जाधव या पुणेकर युवकाने निव्वळ क्रिकेटवर असलेल्या प्रेमाखातर क्रिकेटची थीम असलेला ‘क्रिककॅफे’ नऱ्हे येथे उभारला आहे. 

क्रिकेटच्या संग्रहालयात बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असल्याचा अनुभव या ‘क्रिककॅफे’मध्ये येतो. पुण्यातील नऱ्हे येथील परांजपे अभिरुची परिसर सोसायटीजवळ हा कॅफे आहे. ‘क्रिककॅफे’ची संकल्पना प्रत्यक्षात आणणारा तुषार जाधव याची भेट घेऊन ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने त्याच्याकडून या संकल्पनेबद्दल जाणून घेतले. 


‘मी क्रिकेटचा निस्सीम चाहता असून, लहानपणापासूनच या खेळाचा मला लळा लागला आहे. मी खवय्याही आहे. त्यामुळे स्वतः वेगवेगळे पदार्थ बनविणे, वेगवेगळे पदार्थ चाखणे आणि इतरांनाही खायला घालणे या गोष्टी मला आवडतात. माझ्या आवडीच्या या दोन्ही गोष्टींचा मिलाफ साधून काही वेगळे करता येईल का, असा आमचा विचार सुरू होता. त्यातूनच ‘क्रिककॅफे’ची संकल्पना आम्हाला सुचली आणि या संकल्पनेवर काम करायला आम्ही सुरुवात केली. आज हा कॅफे दिसतोय, त्यामागे किमान एक वर्षभराचे प्लॅनिंग आहे,’ असे तुषारने सांगितले.

तो म्हणाला, ‘मी स्वतः व्यवस्थापनातील ‘ऑपरेशन्स’ या विषयातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यामुळे एखादा व्यवसाय सुरू करण्याचे माझे निश्चित होते. माझी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी इंटिरिअर डिझायनर आणि क्रिकेटची आवड असलेले मंगेश हांडे यांनीसुद्धा बरीच मेहनत घेतली. त्यामुळेच या कॅफेत दिसणाऱ्या बारीकसारीक गोष्टी छान साकारलेल्या दिसत आहेत.’

या कॅफेमध्ये क्रिकेटचे खरेखुरे चेंडू कोरून त्यामध्ये दिवे लावण्यात आले आहेत. खऱ्या बॅट्स सगळीकडे टांगलेल्या आहेत. भिंतीवर क्रिकेटची खेळपट्टी साकारलेली आहे. तिथेही बॉल्सचा वापर करण्यात आला आहे. 


‘लवकरच कॅफेमध्ये क्रिकेटवर आधारित स्पेशल कस्टमाइज्ड डिशेसही सुरू करणार असून, कॅफेच्या बाहेरच्या बाजूला खेळाडूंची शिल्पेही ठेवण्यात येणार आहेत,’ असे तुषारने सांगितले. ‘आमचा कॅफे पाहून आम्हाला अनेक ठिकाणांहून प्रस्ताव येत आहेत. त्यामुळे ‘क्रिककॅफे’च्या शाखा वेगवेगळ्या ठिकाणी सुरू करण्याचाही विचार आहे,’ असेही त्याने नमूद केले. 

‘क्रिककॅफे’ची वैशिष्ट्ये :
- क्रिकेटच्या मैदानावरील फिल्डिंग पोझिशन्सबद्दल माहिती देणारे चित्र किचनच्या दरवाज्यावर आहे.
- क्रिकेटची बॅट, चेंडू आणि अन्य साहित्याची मांडणी
- विश्वचषक, चॅम्पियन्स करंडक, टी-२० विश्वचषकाची प्रतिकृती
- वॉल ऑफ फेम - भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघातील आतापर्यंतच्या महत्त्वपूर्ण खेळाडूंची छायाचित्रे या भिंतीवर लावलेली आहेत.


- बाहेरून पॅव्हेलियनसारखी रचना.

- पुण्यात झालेल्या सामन्यांतील क्रिकेटपटूंच्या सह्या असलेल्या बॅट

- स्टेडियमचा अनुभव घेता यावा म्हणून आतील एका खोलीत बर्मिंगहँम स्टेडियमचा वॉलपेपर भिंतीवर चिकटवण्यात आला आहे. 


- विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची छायाचित्रे  

- २०११च्या विश्वचषकविजेत्या भारतीय संघाचा स्कोअरबोर्ड एका भिंतीवर लावलेला आहे.

- प्रत्येक टेबलवर क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण घटनांची आणि भारतीय खेळाडूंची माहिती.


- भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीत झालेले बदल दर्शविणारी छायाचित्रे एका भिंतीवर आकर्षक पद्धतीने लावलेली आहेत.

(या ‘क्रिककॅफे’ची ‘व्हर्च्युअल टूर’ करण्यासाठी सोबतचा व्हिडिओ जरूर पाहा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search