Next
‘चांगला आशय हा कुठल्याही कथेतील सर्वांत महत्त्वाचा घटक’
‘दी फ्यूचर ऑफ स्टोरी टेलिंग’ आंतरराष्ट्रीय परिषदेतील तज्ज्ञांचा सूर
प्रेस रिलीज
Thursday, April 04, 2019 | 02:46 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘आपल्या लहानपणी संध्याकाळ ही केवळ टीव्हीपुरती मर्यादित नव्हती, तर आपली आजी आपल्याला अशा गोष्टी सांगायच्या ज्या भावनिक व मोहक, तर असायच्याच तसेच त्यातून एक प्रकारची जादूई दुनियेची सफर व्हायची. ती उत्कृष्ट कथा सांगण्याची कला होती; मात्र सध्याची विभक्त कुटुंबपद्धती आणि डिजिटल उपकरणांचा वाढता वापर यांमुळे तंत्रज्ञान अग्रस्थानी आले आहे. असे असले, तरी चांगला आशय हा कुठल्याही गोष्टी किंवा कथेतील सर्वांत महत्त्वाचा व मूळ घटक आहे,’ असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

चर्‍होली येथील अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ फिल्म अ‍ॅंड मीडिया येथे ‘दी फ्यूचर ऑफ स्टोरी टेलिंग’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आहे होते. या वेळी नायजेरियामधील अ‍ॅलिस अल्फ्रेड इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक मोकेमे चिटवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘एनव्हीडिया’च्या माजी व्यवस्थापकीय संचालिका जया पानवलकर यांनी बीजभाषण केले. ‘जायंटव्ह्यू चायना’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक लिऊ यू, ‘अ‍ॅनिब्रेन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक जेश कृष्णमूर्ती, स्नोवेल क्रिएशनचे सह-संस्थापक समीर धामणगावकर, स्कूल ऑफ फिल्म अ‍ॅंड मीडियाच्या प्रमुख डॉ. मंजू रुघवानी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी भारत आणि इतर देशांतर्फे ४५हून अधिक शोध निबंध सादर करण्यात आले.‘एनव्हीडिया’च्या माजी व्यवस्थापकीय संचालिका पानवलकर म्हणाल्या, ‘आपण आपल्या आजीकडून गोष्टी ऐकत मोठे झालो; परंतु आता इंटरनेट आणि तंत्रज्ञान हे आपल्या आयुष्यात अग्रस्थानी आले आहे. असे असले, तरी आशय निर्माण करणारे आजही तितकेच महत्त्वाचे आहेत आणि म्हणूनच एक आकर्षक अनुभव तयार करण्यासाठी कथा लिहिणार्‍यांनी तंत्रज्ञान आणि डोमेन तज्ञांसह एकत्रित काम करणे आवश्यक आहे. शेवटी आशय तयार करणे हे लेखकांच्या हातात असते. त्यामुळे या पुढच्या काळात सर्जनशील प्रतिभेचे महत्त्व वाढतच जाणार आहे.’

‘अ‍ॅनिब्रेन’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेश कृष्णमूर्ती म्हणाले, ‘कथा सांगणे हे श्रोत्यांच्या अनुभवाबद्दल असते, हे आपल्या आजीला इतरांपेक्षा चांगलेच माहिती होते. स्टोरी टेलिंग ही कला कायम चिरंतन राहील. आपण तंत्रज्ञानाने वेढलेले असलो, तरीदेखील कथा सांगणे हे पूर्णतः कथा कशा प्रकारे सांगितली जाते व त्यातील भावना काय आहेत यावर आधारित असते. ज्यामुळे ऐकणार्‍यांना एक अविस्मरणीय अनुभव मिळतो. माध्यमापेक्षा कथा कथनामध्ये कथेचा आशय नेहमीच अग्रगण्य राहील.’

‘जायंटव्ह्यू चायना’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक लिऊ यू म्हणाले, ‘मोबाइलवरील इंटरनेट सेवा तुम्हाला कथा बघण्याचे अनेक पर्याय देत असली, तरी उत्तम आशय हा नेहमीच वापरला जाईल; परंतु त्यासाठी या क्षेत्रात उत्तम आशय असलेल्या कथा निर्माण करणार्‍यांची अधिक आवश्यकता आहे.’

स्नोवेल क्रिएशनचे सह-संस्थापक धामणगावकर म्हणाले, ‘कथा सांगणे हे पूर्णतः अनुभवावर अवलंबून असते. आपण भारतीयांनी अजून श्राव्य स्वरूपातील कथाकथनाचा पुरेसा अनुभव घेतलेला नाही. ऑडिओ हे एक सुंदर माध्यम आहे जे तुम्हाला भावनिकरित्या गुंतवून ठेवते आणि तुम्हाला तुमच्या कथेची कल्पना करण्यास प्रोत्साहन देते. ऐकणे हे माणसाच्या दैनंदिन जीवनातील संभाषणाचा महत्त्वाचा भाग आहे. ऑडिओ बुक, पॉडकास्ट, ऑडिओ मुव्ही, ऑडिओ सीरीज, ऑडिओ एडू आणि ऑडिओ प्रिंट हे ऑडिओ स्टोरी टेलिंगचे विविध प्रकार आहेत.’

व्यक्तींच्या अनुभवांसाठी स्टोरी टेलिंग नेहमीच महत्त्वाचे राहिले असून, कथा लोकांची विचारसरणी बदलते आणि समजून घेण्यास मदत करत असल्याचे स्कूल ऑफ फिल्म अँड मीडियाच्या प्रमुख डॉ. रुघवानी यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search