Next
मुंबईकर अनुभवणार ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’
BOI
Tuesday, February 05, 2019 | 05:37 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
कोकणातील संस्कृती, लोककला श्रद्धेने जपल्या जातात. कोकणातल्या लहानथोरांवर त्याचे गारूड असतेच; पण चाकरमान्यांनाही त्याचे अप्रूप असते. अशाच विविध लोककलांचे विनोदी ढंगाने सादरीकरण करणारा कार्यक्रम म्हणजे ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’. ही टीम मुंबईकरांसाठी एक धमाल लोकनाट्य घेऊन जात असून, सात फेब्रुवारी २०१९ रोजी परळच्या दामोदर हॉलमध्ये हे लोकनाट्य सादर होणार आहे.कोकणात बहुतांश भागात बोलल्या जाणाऱ्या संगमेश्वरी बोलीतून हे लोकनाट्य प्रकट होते. काहीसे अशुद्ध वाटावेत असे बोल, मात्र लहेजा गोड असलेली लवचिक, तिरकस बोली म्हणजे संगमेश्वरी. लोकनाट्यातील सगळी पात्रे म्हणजे कोकणात विविध ठिकाणी भेटणारे एकेक इरसाल नमुनेच. त्यांच्या विनोदी संवादातून रसिकांसमोर जाखडी, नमन, भजन या लोककला सादर केल्या जातात. संगमेश्वरी बोलीभाषेचे अभ्यासक आनंद बोंद्रे आणि साहित्यिक गिरीश बोंद्रे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे. रत्नागिरीच्या समर्थ कृपा प्रॉडक्शनने त्याला लोकनाट्याचे स्वरूप दिले असून, यामधून कोकणातील संस्कृती, लोककला, सणसमारंभ दाखवले जातात. त्याचबरोबर कोकणी माणसाच्या मनातील सल आणि चाकरमान्यांकडून असलेल्या अपेक्षा नकळत प्रकट होतात. कोकणातील मानवी स्वभावावर, प्रवृत्तीवर हलकेच चिमटे काढले जातात. गेल्या दोन वर्षांत याचे १४० प्रयोग सादर झाले आहेत. मुलुंड येथे झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात सिने-नाट्यसृष्टीतील दिग्गज कलावंतांच्या कौतुकाची थाप या लोकनाट्याला मिळाली आहे. या लोकनाट्याचा पहिला व्यावसायिक प्रयोग सात फेब्रुवारीला परळला रात्री साडेआठ वाजता होणार आहे.लोकनाट्यातील तात्या गावकराची प्रमुख भूमिका सुनील बेंडखळे यांनी साकारली असून, राजेश ऊर्फ पिंट्या चव्हाण यांनी ‘मुंबैकर’ सादर केला आहे. प्रभाकर डाऊल, सचिन काळे, योगेश बांडागळे, रवींद्र गोनबरे, विश्वास सनगरे, अंकुश तांदळे, सिद्धेश सावंत-देसाई, बालकलाकार रुद्र बांडागळे, स्वप्नील सुर्वे, राहुल कापडी, राज शिंदे, केतन शिंदे, अभिजित सावंत यांचा सहजसुंदर अभिनय यात पाहायला मिळतो. लोकनाट्याला मंगेश मोरे (सिंथेसायझर) अभिषेक भालेकर (तबला), मंगेश चव्हाण (ढोलकी व पखवाज) यांची संगीतसाथ आहे. त्यातून लोकसंगीत उत्तमरीत्या रसिकांपर्यंत पोहोचते. अनिकेत गानू (प्रकाशयोजना) आणि सुरेंद्र गुढेकर (आराध्य साउंड) हे तांत्रिक बाजू सांभाळतात. आजवरच्या प्रवासामध्ये कोकणी माणसांनी या कलाकारांना डोक्यावर घेतले आहे. आता मुंबईकर चाकरमानीसुद्धा भरभरून कौतुक करतील असा विश्वास सर्व कलाकारांनी व्यक्त केला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link