
जे. पेरे रेनॉड या जगप्रसिद्ध आणि शब्दशः आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कलावंताबरोबर दिल्लीतील आधुनिक कला संग्रहालयात पाच दिवस सहायक म्हणून काम करण्याची संधी मिळणे, ही माझ्या आयुष्याच्या प्रवासात खूप प्रभावी गोष्ट होती. म्हणूनच त्या दिवसांचा माझ्या ‘स्मरणचित्रां’मध्ये समावेश आहे. ‘कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाही’ हे तत्त्व लक्षात घेऊन या कलावंताने एका बुलडोझरने स्वतःचे घर म्हणजे त्याची कलाकृती जमीनदोस्त केली होती..... ‘स्मरणचित्रे’ सदरात आज जे. पेरे रेनॉड या कलावंताच्या कलाकृतींबद्दल..............

जगात असंख्य कलावंत असतात. नाना ठिकाणी विखुरलेले असतात. त्यांचा आपापल्या देश-प्रदेशांशी अनुबंध जुळलेला असतो, हे खरे. तरीही इतर देशांमध्ये आपली कला प्रदर्शित करण्याचा सन्मान बहुतेक कलावंत स्वीकारतात. तसेच जेन पेरे रेनॉड याचे झाले होते. भारत-फ्रान्स या दोन्ही देशांच्या सरकारांच्या सहयोगाने सहा फ्रेंच कलावंतांचे प्रदर्शन नवी दिल्लीतील राष्ट्रीय आधुनिक कलासंग्रहालयात (नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट -
एनजीएमए) होत होते आणि जेनबरोबरच्या इतर चित्रकारांनी तयार स्वरूपात कलाकृती पाठवल्या होत्या. १९९४-९५ला इंटरनेट वगैरे साधनांचा फारसा वापर होत नव्हता. त्या वेळी इतर देशांतील कलावंतांच्या कलाकृतींचे फोटो छापील रूपात पाहणे, हाच पर्याय असे. या कृतीने अवकाशामध्ये एखाद्या कलाकृतीची भव्यता लक्षात येत नसे. तसेच तेव्हा भारतात तरी इंस्टॉलेशन आर्ट हा कलाप्रकार नवा होता. जेनच्या बरोबर जे कलावंत होते, तेही मातब्बर होते.
आपल्याकडे कलाप्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कलाशाळेतील विद्यार्थी जसे विविध कलादालनांमध्ये आपली चित्रे प्रदर्शित होतील का, याची चाचपणी करतात, तसाच मीदेखील त्याच कारणाने दिल्लीला गेलो होतो. ‘एनजीएमए’मध्ये संग्रहित कलाकृतींचे प्रदर्शन असते, ते पाहावे म्हणून सहज तेथे गेलो, तर प्रदर्शित म्हणावे असे काही नव्हतेच. वास्तुरचनेत काही बदलाचे काम होते आहे, असे वाटून उत्सुकतेपोटी मी चौकशी केली, तर भारत-फ्रान्स यांच्या सहकार्यातून फ्रेंच कलावंतांचे प्रदर्शन होणार आहे याची ही तयारी होती, असे सांगण्यात आले. ती माहिती सांगणाऱ्या व्यक्तीला मी माझ्या चित्रांचे फोटो दाखवले. त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये नेले. ‘तू आर्टिस्ट आहेस, तर बरं झालं. आम्हाला एका फ्रेंच चित्रकारासाठी सहायक कलावंत शोधायचा होता. तू त्याला मदत करशील का? फ्रेंच वकिलात तुला योग्य मोबदला देईल,’ असे त्यांनी मला विचारले.

मी तत्काळ होकार दिला. त्या दिवसापासूनच जेनबरोबर काम सुरू झाले. जेनने ‘एनजीएमए’च्या प्रवेशद्वाराजवळील दंडगोलाकार भिंतीची निवड त्याच्या कलाकृतींसाठी केली होती. ही उंचच्या उंच भिंत तीसेक फूट उंचीची असावी. या भिंतीवर तो आणि त्याची मैत्रीण ‘स्टिकर्स’ चिकटवत होते. अर्धी भिंत झाली होती आणि अर्धी भिंत बाकी होती. जेनने संकल्पना समजावून सांगितली. या प्रदर्शनात त्याने जी मांडणी केली होती, ती जगातील एकूण रासायनिक आणि विस्फोटक पदार्थांच्या संदर्भात होती. स्टिकर्स होते ते ज्वालाग्राही पदार्थांच्या टँकर्सना लावतात, तसे चौरसाकार होते. चौरसाकारात भौमितिक आकारात पांढऱ्या पार्श्वभूमीवर लाल, हिरव्या, पिवळ्या रंगाचा भाग व ‘ज्वालाग्राही’ असे लिहून त्याचे रासायनिक नाव, ज्वालेची आकृती काढलेली, असे सारे. स्टिकर्स साधारणतः सहा इंचाचे आणि भिंतीची उंची तीसेक फूट. त्यामुळे एकूण चित्र भिंतीच्या वरचा बाजूला ठिपके चिकटवल्याप्रमाणे दिसत होते. थोडक्यात, बिंदुवादी चित्रांप्रमाणे लहान लहान ठिपक्यांमुळे एक प्रकारचा दृष्टिभ्रम स्टिकर्समुळे होत होता.

त्याच्या इतरही कलाकृतींवर आमची चर्चा होऊ लागली. तो फ्रेंच होता व त्याचे इंग्रजी यथातथाच होते... माझ्या इंग्रजीचा तर तेव्हा आनंदच होता. ह्या समान पार्श्वभूमीवर आकृत्या, चित्रे, दृश्ये आणि खाणाखुणा यांमधून आमचे उत्तम संभाषण होत होते. त्याने एक कॅटलॉग दाखवला. अत्यंत प्रभावी असे ते सगळे प्रयोग होते. त्यात असे होते, की त्याने पॅरिसमध्ये पारंपरिक घरांच्या वस्तीच्या मधोमध एक लहानशा प्लॉटमध्ये एक दुमजली घर बांधले. त्याला आजूबाजूने पांढऱ्याशुभ्र सिरॅमिक टाइल्स बाहेरून व आतून लावल्या. मध्ये मध्ये मोठ्या लालभडक कुंड्या, सोनेरी कुंड्या, सिमेंटची थापी व त्याला लागलेले सिमेंट असे काही काही घरात मांडले होते. पांढऱ्याशुभ्र पार्श्वभूमीवर हे भडक रंग फार आकर्षक दिसत होते. त्याचे हे घर म्हणजे एक कलाकृती होती. त्याबद्दल कॅटलॉगमध्ये सगळे स्पष्टपणे मांडले होते. ‘कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नाही’ हे तत्त्व लक्षात घेऊन त्याने एका बुलडोझरने ते घर म्हणजे त्याची कलाकृती जमीनदोस्त केली. हा प्रयोग त्याने १९९३ साली केला होता व युरोपच्या कलाजगतात यावर बराच ऊहापोह झाला होता. पांढऱ्या सिरॅमिक टाइल्स वापरून त्याने पुढे अनेक कलाकृती केल्या. त्यामध्ये काही स्मृतिस्तंभासारखे खांब, तर काही वेगळ्या कलाकृती दिसतात.

त्याचे ‘एनजीएमए’चे प्रदर्शन मांडून व उद्घाटन समारंभ वगैरे पार पडल्यावर तो ताजमहाल पाहायला आग्र्याला जाणार होता. त्याने आग्र्याला त्याच्यासोबत येण्याचे आमंत्रण दिले. ठरल्या वेळेला सकाळी सहा वाजता मी इंडिया हॅबिटॅट सेंटर गाठले. वाटेतला भारत पाहण्यात त्याला रस होता. तो एका अर्थाने ‘कलरिस्ट’ (रंगतज्ज्ञ) होता. प्रवासात लहान लहान खेडी, घरे लागत होती. ती पाहून त्याचे फोटो घेणे वगेरे चालू होते. कलेविषयी चर्चा चालू होती. ‘भारतातील कोणकोणते समकालीन चित्रकार ठाऊक आहेत,’ या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्याने नाव सांगितले अनीश कपूर. फक्त एकच चित्रकार त्याला ठाऊक होता... अनीश कपूर. बाकी समकालीन भारतीय कलाविश्व त्याला अनभिज्ञ होते. रंगांचा तो चाहता होता व त्याबाबत सजग होता. खेड्यातील घरांचा, निळीचा रंग, टिपिकल हिरवा डिस्टेंपर पेंट त्याच्या मनात भरला होता. बहुधा युरोपमध्ये असे रंग घराच्या बाहेरील बाजूस देत नसावेत. मुद्दामच एका गावात थांबून त्यानो सोबत नेण्यासाठी दोन-दोन किलो हिरव्या व निळ्या डिस्टेंपर पावडरींची खरेदी केली. अनेक संदर्भांवर चर्चा रंगत चालली होती. त्याला रवींद्रनाथ टागोरांची मूळ चित्रे पहायची होती. पॅरिसमध्ये रवींद्रनाथांच्या प्रदर्शनाला झालेली गर्दी वगेरे त्याला ज्ञात होते व त्यांच्या चित्रांतील ‘ओरिजिनॅलिटी’ हे त्याच्या आकर्षणाचे केंद्र होते. तो त्यासाठी बहुधा कलकत्त्याला जाणार होता.

एखाद्या मातब्बर चित्रकाराबरोबर ताजमहाल पाहायचा हा अनुभव वेगळा होता. त्याला ताजमहालाचा पांढरेपणा अनुभवायचा होता. मला वाटते, की त्याच्या अनेक शिल्प-वास्तू कलाकृतींमध्ये पांढऱ्या सिरॅमिक टाइल्स तो वापरतो. त्यामुळे ताजमहालाचा पांढरेपणा त्याला जवळचा वाटत असावा. त्याने ताजमहालाच्या पुढील बाजूवरील काळी वेलबुट्टीची नक्षी व सुलेखन, अक्षरलेखन पाहून मातीसच्या ड्रॉइंगची आठवण होत असल्याचे सांगितले. समकालीन कलावंत ताजमहाल या ऐतिहासिक वस्तूकडे कशा नजरेतून पाहतो, हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती आणि ती याद्वारे समजली. मातीसच्या कामातील सपाट रंग व प्रतलातील वेलबुट्टीचा वापर व ताजमहाल ही वास्तू यांमध्ये त्याला दृश्यानुभव म्हणून साधर्म्य वाटले होते. परतीच्या वाटेवर हिऱ्यांच्या एका दुकानात नेण्यात आले. तेथे त्याला मौल्यवान रत्ने व हिरे दाखवण्याची खास व्यवस्था झाली होती. मलाही असा अनुभव नवा होता.

परतताना त्याने मला एक प्रश्न विचारला – ‘तुला कलावंत म्हणून भारताबाहेर पहिल्यांदा कोणत्या देशात जायला आवडेल?’ मी ‘चीन’ असे उत्तर दिले. बहुधा त्याला ‘फ्रान्स’ असे उत्तर अपेक्षित असावे. असो. पुढेही आमचा पत्रव्यवहारातून संपर्क राहिला. जेनने त्याचे तीन-चार कॅटलॉग मला पॅरिसहून कुरियरने पाठवले. त्याने तिकडे परतल्यावर युरोपमधील शिल्पकृतीच्या एका प्रदर्शनात पांढऱ्या टाइल्स लावलेला एक मोठा कट्टा बनवला. त्यावर एक अगदी पडीक वाटावे असे लहानसे कौलाचे घर तयार केले. त्याच्या दाराला हिरवा रंग होता आणि लहानशी खिडकी होती. छापरावर गवत वाढलेले दिसत होते. या कलाकृतीला त्याने ‘सामाजिक वास्तव’ असे शीर्षक दिले. मला त्याने भारतात पाहिलेल्या घराचे प्रतिबिंब त्याच्या या कलाकृतीत दिसत राहिले आहे.

आता तो साधारणतः ६९ वर्षांचा आहे.
जेनची वेबसाइट मी फॉलो करत असतो. वेगवेगळ्या परिसराप्रमाणे कलाकृती मांडणीचे स्वरूप तो बदलतो. त्याची सोनेरी, लाल, रंगबेरंगी, प्रचंड आकारातील कुंडीची शिल्पे जगभरातील बहुतेक सर्व महत्त्वाच्या कलादालनांत, संग्रहालयात व शहरात प्रदर्शित झालेली दिसतात. ताजमहाल पाहताना मातीससारखा कलावंत खूप गांभीर्याने, प्रकर्षाने आठवणारा हा कलावंत माझ्या चिरकाल स्मरणात राहिला आहे.
नुकतेच एक पुस्तक ग्रंथालयात सहज समोर आले – ‘विसाव्या शतकातील महत्त्वाचे कलावंत.’ कालक्रमाप्रमाणे मांडणी होती. शेवटी शेवटी १९९५च्या सुमाराच्या महत्त्वाच्या कलावंतांमध्ये जे. पेरे रेनॉड (Jean Pierre Raynaud) हे नाव होते आणि त्याच्याबद्दलच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. आजही त्याच्या कलाकृती मांडल्याप्रमाणे भारतातील ‘सामाजिक-वास्तव’ जसेच्या तसे आहे हे आपल्या सर्वांनाच जाणवत राहते.
- डॉ. नितीन हडप