Next
महाराष्ट्रातील दोघांना राष्ट्रीय बाल पुरस्कार
देशभरातील २६ बालकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
BOI
Wednesday, January 23, 2019 | 04:56 PM
15 0 0
Share this article:

गडचिरोलीची दहा वर्षांची एंजल देवकुळे हिला क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बाल शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली :  गडचिरोलीची दहा वर्षांची एंजल देवकुळे आणि मुंबईचा तृप्तराज पंड्या या दोघांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशक्ती पुरस्काराने  गौरविण्यात आले. एंजल देवकुळे हिला क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी, तर  तृप्तराज पंड्या याला कला व सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांतर्गत सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील एकूण २६ बालकांनाही हा पुरस्कार देण्यात आला. प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या पथसंचलनात हे सर्व पुरस्कारार्थी सहभागी होणार आहेत. 

तबला वादनात लौकिक मिळवणाऱ्या मुंबईतील १२ वर्षांच्या तृप्तराज पंड्या यालाही राष्ट्रपतींच्या हस्ते बाल शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

असामान्य धाडस दाखवणाऱ्या मुलांना देण्यात येणारा शौर्य पुरस्कारही आता ‘बाल शक्ती पुरस्कार’ म्हणूनच देण्यात येणार आहे. या वर्षी मध्य प्रदेशमधील कार्तिक गोयल आणि आद्रिका गोयल या पुरस्काराचे मानकरी ठरले. कार्तिक आणि आद्रिका यांनी मोरेना येथे दंगलखोरांनी अडवलेल्या रेल्वेतील प्रवाशांना अन्न, पाणी, औषधे पुरविली होती. 
पर्यावरण जपण्यासाठी ५०० झाडे लावणारी मीरतची सहा वर्षांची इहा दीक्षित, विज्ञानातील संशोधनासाठी बेंगळुरूची बारावीची विद्यार्थिनी अरुणिमा सेन, अंदमान-निकोबारचा क्रीडापटू एसो अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २६ मुलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तब्बल ९०० अर्जांमधून या पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली. 

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपतिभवनामधील दरबार हॉलमध्ये २२ जानेवारीला आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी आणि सचिव राकेश श्रीवास्तव या वेळी उपस्थित होते. पदक, एक लाख रुपये, दहा हजार रुपयांचे बुक व्हाउचर आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

या वर्षीपासूनच केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ दोन श्रेणींमध्ये वितरित करण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत सर्जनशीलता, शौर्य, सामाजिक सेवा, कला व संस्कृती या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २६ बालकांना ‘बाल शक्ती पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील एंजल देवकुळे आणि तृप्तराज पंड्या यांचा समावेश आहे. 

गडचिरोली येथील दहा वर्षांच्या एंजल देवकुळेला ‘स्क्वे मार्शल आर्ट’ क्रीडा प्रकारातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध जागतिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी एंजल ही ‘स्क्वे मार्शल आर्ट’ क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी करणारी देशातील सर्वांत लहान मुलगी ठरली आहे. एंजल ही आशियातील सर्वांत लहान सुवर्णपदक विजेती  असून, सात विक्रम तिच्या नावावर आहेत. मलेशिया येथे होणार असलेल्या स्क्वे चॅम्पियनशिपसाठीही एंजलची निवड झाली आहे.

मुंबईतील मुलुंडमधील तृप्तराज पंड्या या १२ वर्षांच्या मुलाने तबलावादनात लौकिक मिळवला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने तृप्तराजच्या तबलावादनाची नोंद घेऊन जगातील सर्वांत कमी वयाचा तबला तज्ज्ञ म्हणून त्याला गौरविले आहे. तृप्तराजने वयाच्या दुसऱ्या वर्षीच तबलावादनाचा जाहीर कार्यक्रम सादर केला असून, आकाशवाणी व दूरचित्रवाहिन्यांवरही त्याचे कार्यक्रम झाले आहेत.  

या वेळी दोन व्यक्ती आणि तीन संस्थांना बालकल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

(एंजल देवकुळेच्या विक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search