Next
‘स्वयंसेवी कामात संस्थांनी पारदर्शकता जपावी’
प्रेस रिलीज
Monday, July 23, 2018 | 02:38 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘स्वातंत्र्यानंतरचा काळ, मध्यंतरीचा काळ आणि आणि यापुढील काळ असे ग्रामविकासाचे तीन महत्त्वपूर्ण टप्पे आहेत. पूर्वी स्वखर्चाने संस्था चालवली जात असे. आता काळ बदलत असून, अनेकजण सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेताहेत. अशा वेळी स्वयंसेवी संस्थांनी कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे; तसेच सक्षम यंत्रणा उभी करणे आणि कारभारात पारदर्शकता जपणे गरजेचे आहे,’ असे मत ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उदय वारुंजीकर यांनी व्यक्त केले.

डीपर, सर फाउंडेशन व साद माणुसकीची फाउंडेशन यांच्या वतीने ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी संस्थांचे योगदान’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अॅड. वारुंजीकर बोलत होते. यामध्ये नर्मदालय संस्थेच्या भारती ठाकूर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजाभाऊ दांडेकर, स्नेहालय संस्थेचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी भाग घेतला. या वेळी आयोजक हरीश बुटले, दीपस्तंभचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन उपस्थित होते.

अॅड. वारुंजीकर म्हणाले, ‘बहुतांशी संस्था समाजाच्या विकासासाठी काम करत असतात; परंतु त्याची नोंद त्यांच्याकडे नसते. अशावेळी योग्य घटकांच्या आधारे संस्थांनी कामाचे डॉक्युमेंटेशन करणे, नवीन कायद्यांची माहिती करून घेणे आवश्यक आहे. याबाबत काही मदत कायद्याच्या अभ्यासकांची मदत घ्यावी. संस्थेचे काम चांगल्या पद्धतीने चालविता यावे, यासाठी कायद्याची माहिती करून घ्यावी.’

कुलकर्णी म्हणाले, ‘ग्रामीण विकासामध्ये स्वयंसेवी संस्थांचे मोलाचे योगदान आहे. सामाजिक संस्थांना एक दिशा देण्याची गरज असून, त्यासाठी शासन आणि सामाजिक संस्थांनी एकत्रित येऊन काम करणे आवश्यक आहे. सध्या वाढते शहरीकरण, आरोग्याचे प्रश्न, झोपडपट्टी, प्राथमिक गरजा यांच्या मुळापर्यंत जाऊन काम करणे आवश्यक आहे. ग्रामविकासासाठी लोकांना सोबत घेऊन जाणाऱ्या संस्था असाव्यात.’

डॉ. दांडेकर म्हणाले, ‘आम्ही सामाजिक कार्यातून लोकसाधना करतो. गेल्या ३६ वर्षांपारून माझे काम सुरू आहे. ग्रामविकास करायचा असेल, तर लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासारखे राहणे, त्यांच्यासाठी काम करताना स्वतः विसरून काम करणे गरजेचे असते. त्यांच्यासाठी काम करताना त्यांच्याकडूनच शिकावे आणि त्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करावे.’

ठाकूर म्हणाल्या, ‘जगण्यासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच बाह्यजगाची माहिती असणे आवश्यक आहे. दोन विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज एक हजार ७०० विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला आहे. एका गावापासून आज १५ गावांपर्यंत पोहचलेला हा शैक्षणिक प्रवास असाच सुरू राहणार आहे. मुलांना साक्षर करणे हा एकमेव हेतू न ठेवता माणसे घडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link