Next
‘बा-बापूं’चे सहजीवन प्रेरणादायी
सुनीती सु. र. यांचे प्रतिपादन; ‘बापूंच्या कारावासाची कहाणी’चे प्रकाशन
BOI
Thursday, April 11, 2019 | 05:48 PM
15 0 0
Share this article:

'बापूंच्या कारावासाची कहाणी' पुस्तक प्रकाशनावेळी (डावीकडून) अरुण खोरे, सुनीती सु. र. धीरूभाई मेहता, डॉ. शोभनाताई रानडे, डॉ. करुणाकर त्रिवेदी, गायत्रीदास दीदी.

पुणे : ‘महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समानतेचा आदर्श घालून दिला. त्याच वाटेवर महात्मा गांधी (बापू) आणि कस्तुरबा गांधी (बा) यांचे सहजीवन प्रेरणादायी आहे. अखेरच्या काही दिवसांत बा आणि बापू यांच्यातील भावनिक नाते, कारावासातील दिवस, कस्तुरबांचे, महादेवभाई देसाई यांचे निधन, बापूंच्या मनातील अस्वस्थता यासह अनेक गोष्टींचा दैनंदिनी स्वरूपातील आढावा आपल्याला बापू नव्याने उलगडणारा आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु. र. यांनी केले.

कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, इंदोर, महाराष्ट्र शाखा, सासवड आणि नगर रस्त्यावरील गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी आगाखान पॅलेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पूज्य ‘बा’ अर्थात कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘बापूंच्या कारावासाची कहाणी’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. हिंदी लेखिका स्वर्गीय डॉ. सुशीला नैय्यर लिखित मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. शोभना रानडे यांनी केला आहे. आगाखान पॅलेस येथील कस्तुरबा स्मृती सभागृहात झालेल्या या सोहळ्यावेळी ट्रस्टचे माजी अध्यक्ष धीरूभाई मेहता, अध्यक्ष डॉ. करुणाकर त्रिवेदी, उपाध्यक्षा गायत्रीदास दीदी, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे उपस्थित होते.

'बापूंच्या कारावासाची कहाणी' पुस्तक प्रकाशनावेळी डॉ. शोभनाताई रानडे मनोगत व्यक्त करताना. या वेळी धीरूभाई मेहता.

सुनीती सु. र. म्हणाल्या, ‘डॉ. सुशीला बापूंच्यासोबत होत्या. त्यामुळे बापूंचे दैनंदिन जीवन त्यांनी शब्दबद्ध केले होते. डॉ. शोभनाताईंनी समर्पक असे त्याचे मराठीत रूपांतर केले आहे. आगाखान पॅलेसमधील त्या भारलेल्या दिवसांची आठवण या पुस्तकामुळे होत आहे. त्याचबरोबर आजच्या गंभीर कालखंडात हे पुस्तक दिशा दाखवणारे ठरेल. लोकशाही वाचविण्यासाठी या पुस्तकातील मूल्ये उपयुक्त ठरतील.’

अरुण खोरे म्हणाले, ‘गांधी दाम्पत्याच्या शेवटच्या काळातील सहजीवन उलगडणारे हे पुस्तक आहे. आगाखान पॅलेसमधील दिवस हे भारताच्या इतिहासाला वळण देणारे होते. कस्तुरबांविषयीच्या लेखनाला लेखकांनी उशिरा सुरुवात केली. परंतु, अलीकडे चांगली पुस्तके येत आहेत, ही आनंदाची बाब आहे.’

अध्यक्षीय भाषणात डॉ. करुणाकर त्रिवेदी म्हणाले, ‘गांधीजींनी आपले महत्त्वाचे दिवस पुण्यात आणि महाराष्ट्रात घालवले. त्यांचे कार्य नव्या पिढीला समजण्यासाठी अशी पुस्तके व्हायला हवीत. लवकरच या पुस्तकाला डिजिटल स्वरूपात आणले जाणार आहे. गांधी विचार पोहोचवण्यासाठी ट्रस्ट नियमितपणे कार्यरत आहे.’

धीरूभाई मेहता, गायत्रीदास दीदी, डॉ. शोभनाताई रानडे यांनीही मनोगते व्यक्त केली. पुस्तकनिर्मितीतील सहकार्याबद्दल हनुमंता जगनगडा, चतुराताई यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन शेवंता चव्हाण यांनी केले. आशा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. गणेश धोत्रे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search