Next
हरित अरब अमिरातीसाठी भारतीय विद्यार्थ्याचे रोबोट
BOI
Friday, April 19, 2019 | 05:07 PM
15 0 0
Share this article:

साईनाथ मणिकंदनअबूधाबी : संयुक्त अरब अमिराती (यूएई) या खनिज तेलाने संपन्न, परंतु वाळवंटी असलेल्या प्रदेशात शेतीची हिरवाई आणि निळ्या समुद्रातील जलसंपदा टिकवण्यासाठी भारतीय विद्यार्थ्याचा हातभार लागणार आहे. अबूधाबीमधील जेम्स युनायटेड इंडियन स्कूलचा विद्यार्थी साईनाथ मणिकंदन याने दोन रोबोट निर्माण केले असून, त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्यास या देशामध्ये शेतीही फुलेल आणि समुद्रातील निसर्गसंपत्तीही अबाधित राहील. 

साईनाथने मरीन रोबोट (एमबॉट क्लीनर) क्लीनर आणि अॅग्रीकल्चर रोबोट (अॅग्रीबॉट) असे दोन रोबोट बनवले आहेत. मरीन रोबोट समुद्राच्या पाण्यावर तरंगणारा कचरा दूर करण्याचे काम करील, तर या प्रदेशातल्या अत्यंत कडक उन्हाळ्यात अॅग्रीबॉट हा रोबोट शेतीची कामे करेल. 

एमबॉट हा प्रोटोटाइप रोबोट असून, तो बोटीच्या आकाराचा आहे. तो रेडिओ कंट्रोलच्या साह्याने रिमोटनेदेखील नियंत्रित करता येतो. त्यातील मोटारीच्या साह्याने तो पाण्यातील कचरा गोळा करून कचऱ्याच्या बादलीत टाकू शकतो. या रोबोटचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले तर पाण्यातील कचरा सहजपणे बाजूला करून पाण्यातील निसर्गसंपदा वाचवू शकतो, अशी अपेक्षा साईनाथने व्यक्त केली आहे. 


त्याने बनवलेला अॅग्रीकल्चर रोबोट ड्रोनच्या मदतीने तो शेतात पेरणीची कामेही करू शकतो. हा सौर ऊर्जेवर चालवता येणे शक्य आहे. अत्यंत उच्च तापमान असलेल्या या देशामध्ये शेती करणे अत्यंत कठीण असते. ५० अंश सेल्सिअस तापमानात शेतात जाऊन काम करणे अशक्य असते. अशा ठिकाणी हा रोबोट शेतीची कामे करू शकतो. जमीन नांगरण्यापासून ते बी-बियाणे पेरण्यापासून सगळी कामे हा रोबोट करू शकतो. 

पर्यावरणाप्रती अत्यंत जागरूक असलेला साईनाथ विविध उपक्रमांमध्ये सहभागी असतो. 'ड्रॉप इट युथ',  टून्झा इको जनरेशन उपक्रमांचा तो ब्रँड अॅम्बेसेडर असून, एमिरेट्स एन्व्हायरोमेंटल ग्रुपचा सक्रीय सदस्य आहे. तो स्वतः पीईपीसी ही पर्यावरण संवर्धनाची मोहीम राबवतो. त्यामध्ये तो कागद, प्लास्टिक गोळा करून त्यांचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न करतो. गेल्या वर्षी त्याने २५०० किलो कागद आणि २५० किलो प्लास्टिक जमा केले होते. ‘एक टन कागद वाचवला तर १७ झाडे, सात हजार लिटर पाणी, ३८० लिटर तेल आणि ३.३ घनमीटर जमीन आणि तब्बल चार हजार किलोवॅट ऊर्जा वाचवले जाते,’ असे साईनाथचे म्हणणे आहे. पुनर्वापरामुळे पर्यावरण वाचवण्यासाठी मोठी मदत मिळू शकते, असे त्याचे सांगणे आहे. 

संयुक्त अरब अमिरातीत साईनाथने बनवलेल्या दोन्ही रोबोटचा मोठ्या प्रमाणात वापर केला, तर या वाळवंटात हिरवळ निर्माण होईल आणि ते मृगजळ नसेल, ती खरीखुरी कायम टिकणारी हिरवाई असेल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरातीचे बंध दृढ आहेतच; मात्र ते बंध वृद्धिंगत होण्यासाठी साईनाथचे हे योगदान महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.

(रोबॉटिक्सच्या प्रसारासाठी धडपडणाऱ्या पुण्यातील दाम्पत्याची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 126 Days ago
May be , it can be used In Rajasthan and Kutch .
0
0

Select Language
Share Link
 
Search