Next
ठाण्यात पार पडली ‘घे भरारी’ पत्रकारिता कार्यशाळा
BOI
Tuesday, September 10, 2019 | 12:09 PM
15 0 0
Share this article:



ठाणे :
पत्रकारिता शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पत्रकारितेच्या विविध क्षेत्रांची ओळख व्हावी, त्यांना करिअरची नवीन संधी मिळावी या हेतूने ठाण्यात ‘घे भरारी’ पत्रकारिता कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ महाविद्यालय, नाशिकचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या वतीने आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यशाळेची सुरुवात एबीपी माझा न्यूज चॅनेलचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते झाली. पत्रकारितेचे महत्त्व सांगून, लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारितेची भूमिका काय, टीआरपी म्हणजे काय आदी विषयांवर त्यांनी माहिती दिली. त्यांच्यासोबत व्यासपीठावर आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाचे सचिव प्रा. प्रदीप ढवळ, रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाउनच्या अध्यक्षा ज्योती चव्हाण, प्राचार्य हर्षदा लिखिते, कोर्सचे समन्वयक शशिकांत कोठेकर आदी उपस्थित होते.



दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार आणि झी २४ तास व आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीचे माजी संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचे व्याखान झाले. ‘राष्ट्रीय विकास व पत्रकाराची भूमिका’ यावर त्यांनी विचार मांडले. ‘साक्षरेतेचे प्रमाण वाढत चालले असून, आता प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडियापेक्षा सोशल मीडिया अधिक प्रभावीपणे काम करू शकेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाच्या हितासाठी व लोकशाही टिकवण्यासाठी निःपक्ष पत्रकारितेची गरज त्यांनी व्यक्त केली.

आकाशवाणीचे माजी संचालक डॉ. महेश केळुसकर यांनी त्यांच्या भाषणात आकाशवाणीचे कामकाज व भाषेचे महत्त्व यावर महिती दिली. मराठी भाषेचे व्याकरण, आवाज, उच्चाराचे महत्त्व केळुसकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतरच्या सत्रात जनसंपर्क क्षेत्रातील तज्ज्ञ एम. पी. जोशी यांनी जनसंपर्क विभागाचे कार्य सांगून, या क्षेत्रातही रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. जनसंपर्क व सोशल मीडियाचे महत्त्व यावर त्यांचे भाषण झाले. 



एबीपी माझाचे वृत्तनिवेदक मिलिंद भागवत यानी इलेक्ट्रॉनिक मीडिया, न्यूज चॅनेलचे काम कसे चालते याची माहिती दिली. या मीडियात होत असलेले बदल व नवीन आव्हाने यावर त्यांनी भाष्य केले. कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याशी थेट वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना खासदारांशी थेट संवाद साधता आला. पत्रकारिता निःपक्ष असावी, असे सांगून खासदारांची कामे, सरकारी कामाची पद्धत अशा विविध विषयांवर मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. 

रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. मोहन चंदावरकर यानी मनोगतात रोटरीचे कार्य व केलेल्या कामाची माहिती दिली. प्राचार्य हर्षदा लिखिते व रोटरी अपटाउनच्या अध्यक्षा ज्योती चव्हाण यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रशिक्षाणार्थींना या वेळी प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search