Next
गंगाधर स्वरोत्सवात रंगले पुणेकर
प्रेस रिलीज
Wednesday, January 23, 2019 | 01:01 PM
15 0 0
Share this article:पुणे : अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रसार करणाऱ्या स्वरनिनाद संस्थेतर्फे १८ ते २० जानेवारी २०१९ या कालावधीत आयोजित गंगाधर स्वरोत्सवात पुणेकरांनी सांगीतिक मेजवानीचा आस्वाद लुटला. स्वरोत्सावातील एकापेक्षा एक सरस सादरीकरणांमध्ये पुणेकर रंगले.

पहिल्या दिवशी प्रसिद्ध गायिका सानिया पाटणकर यांनी नंद रागात ‘ढूंढ बन सैया’ ही विलंबित बंदिश आणि ‘मोहे करन दे बतिया’ दृत बंदिशीने गायनाला सुरुवात केली. त्यानंतर कर्नाटक बसंत रागातील ‘सरसा सुगंध फुल खिले’ या बंदिशीसह सादर केलेल्या ‘कैसी कटे बरसात रे’ कजरी रागाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. नीलेश रणदिवे (तबला), गंगाधर शिंदे (संवादिनी), ईश्वरी श्रीगार व सुगंधा उपासनी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

हे स्वरोत्सवाचे चौथे वर्ष आहे. सहकारनगर येथील मुक्तांगण बालरंजन केंद्रात हा स्वरोत्सव रंगला. सानिया पाटणकर यांच्या सुरेल गायनानंतर रईस खान यांच्या सितारवादनाने, तर दीपक भानुसे यांच्या बासरीवादनाने कार्यक्रमात रंगत आणली. या वेळी गायक अमोल निसळ, स्वरनिनाद संस्थेच्या वृषाली निसळ, ऍना कंस्ट्रक्शनचे अल्पना अन्नछत्रे, अर्चिस अन्नछत्रे व प्रीतम इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रीतम मंडलेचा आदी उपस्थित होते. मधुरा ओक यांनी सूत्रसंचालन केले.

ही संस्था भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन आणि प्रसारासाठी कार्यरत असून, पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ‘गंगाधर स्वरोत्सवा’चे आयोजन केले जात असल्याचे स्वरनिनाद संस्थेच्या वृषाली निसळ यांनी या प्रसंगी सांगितले.चेहर्‍यावरील भाव, आवाजातील गोडवा, मंत्रमुग्ध करणारी रागदारी अन् काळजाचा ठाव घेणार्‍या कौशिकी चक्रवर्ती यांच्या सुरेल गायकीने गंगाधर स्वरोत्सवाला स्वर-सौंदर्याचा साज चढवला. मोहक अदाकारी आणि तितक्याच लाजवाब सुरावटींनी कौशिकी यांनी श्रोत्यांना अक्षरशः खिळवून ठेवले. ‘गंगाधर स्वरोत्सवा’चा समारोप कौशिकी चक्रवर्ती आणि श्रीनिवास जोशी यांच्या सुरेल गायनाने झाला.

कार्यक्रमात सुरुवातीला श्रीनिवास जोशी यांनी शुद्ध कल्याण राग आळवला. त्यात ही बंदिश, तर ख्याल गायकीचा अविष्कार सादर केला. खमाज रागातील ‘छब दिखलाजा बाके सांवरिया’ या ठुमरीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शेवटी पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या ‘माझे माहेर पंढरी’ या अजरामर भजनाने श्रीनिवास जोशी यांनी आपल्या गायनाची सांगता केली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली. जोशी यांना तबल्यावर नीलेश रणदिवे, संवादिनीवर अविनाश दिघे, तर तानपुर्‍यावर ऋषीकेश सोमण, विनय चित्राव यांनी साथसंगत केली.समारोपाच्या उत्तरार्धात कौशिकी यांनी गायलेल्या अभोगी रागातील ‘कैसे कहू मन की विपदा’ बंदिशीने स्वरमयी रात्र बहरत गेली. तबल्यावर अजिंक्य जोशी, संवादिनीवर श्रीनिवास आचार्य, तानपुर्‍यावर संघमित्रा आणि प्रीती सोहनी यांनी साथसंगत केली. मधुरा ओक-गद्रे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search