Next
‘अप्रेंटिसशिप योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘यशस्वी’सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा’
BOI
Saturday, October 05, 2019 | 06:10 PM
15 0 0
Share this article:पुणे :
‘अप्रेंटिसशिप योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘यशस्वी’सारख्या संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे,’ असे मत अप्रेंटिसशिप योजनेचे वरिष्ठ सल्लागार सुराजित रॉय यांनी व्यक्त केले. केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय आणि ‘यशस्वी’ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अप्रेंटिसशिप योजनेच्या जनजागृती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर अर्थात ‘एमसीसीआयए’च्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात औद्योगिक कंपन्यांचे मनुष्यबळ व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘अप्रेंटिसशिप योजना राबविताना होणारा खर्च व अप्रेंटिसला देण्यात येणारे विद्यावेतन हे कंपनीच्या सीएसआर निधीमध्ये दाखविता येणार आहे,’ अशी माहिती रॉय यांनी दिली. 

(डावीकडून) प्रनिल जैस्वाल, सुहास कुलकर्णी, समीर कुकडे, अभिषेक कुलकर्णी, विश्वेश कुलकर्णी, सुराजित रॉय, डॉ. एस. व्ही. भावे आणि आदित्य जोशी.

रॉय पुढे म्हणाले, ‘एकीकडे देशात मोठ्या प्रमाणात युवकांची संख्या असताना दुसरीकडे अनेक कंपन्यांना आवश्यक असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज या दोन्हींचा समन्वय या अप्रेंटिसशिप योजनेमुळे साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.’ 

‘या योजनेची औद्योगिक कंपन्यांनी अंमलबजावणी करणे बंधनकारक असून, ही योजना टीपीए अर्थात थर्ड पार्टी अॅग्रिगेटर म्हणजेच ‘यशस्वी’सारख्या संस्थेमार्फतही करता येऊ शकणार आहे. तसेच याआधी ही योजना मुख्यतः उत्पादन क्षेत्रालाच लागू होती. आता मात्र सेवा क्षेत्र, रिटेल, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच एखादा ट्रेड याअंतर्गत उपलब्ध नसल्यास स्वतंत्रपणे उद्योगक्षेत्र आपल्या गरजेनुसार अभ्यासक्रम तयार करून विशिष्ट ट्रेडला मंजुरी घेऊ शकते, अशी तरतूद करण्यात आली आहे. अप्रेंटिसला दरमहा किती किमान विद्यावेतन द्यावे याबाबतही स्पष्ट निकष आहेत,’ असेही रॉय यांनी सांगितले. 

टाटा मोटर्सचे मनुष्यबळ उपमहाव्यवस्थापक सुहास कुलकर्णी यांनी अप्रेंटिसशिप योजेनचे फायदे सांगतानाच आपण स्वतःही फिटर पदापासून अप्रेंटिस म्हणून टाटा कंपनीत (पूर्वीची टेल्को) कामाला सुरुवात केल्याचे सांगितले. अप्रेंटिसशिप योजनेतून निष्ठावान, कुशल व निष्णात मनुष्यबळ तयार होते, असेही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. 

प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापक समीर कुकडे यांनी अप्रेंटिसशिप योजना म्हणजे गुरुकुल शिक्षणपद्धतीचेच नवे रूप असल्याचे मत मांडले. भारत फोर्ज कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. एस. व्ही भावे व लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य जोशी यांनी या योजनेतील कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. 

‘यशस्वी’ संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ‘यशस्वी’ संस्थेचे प्रकल्पप्रमुख सुनील नेवे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभारप्रदर्शन संस्थेचे संचालक अभिषेक कुलकर्णी यांनी केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
SUNIL RANE About 13 Days ago
My daughter is now 12 th commerce, any trade Apprenticeships for her , when application forms available . Please guide me .... Thanks .
0
0

Select Language
Share Link
 
Search