Next
सैनिकहो तुमच्यासाठी!
प्राची गावस्कर
Friday, May 18 | 03:45 PM
15 1 0
Share this story

योगेश आणि सुमेधा चिथडे
‘भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिकहो! तुमच्यासाठी!’ हे ‘गदिमां’च्या गीतातील शब्द यथार्थ ठरविण्याचे काम पुण्यातील ‘सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन’ अर्थात ‘सिर्फ’ ही संस्था करते आहे. योगेश आणि सुमेधा चिथडे या दांपत्याने ही संस्था स्थापन केली असून, त्या माध्यमातून सैनिकांसाठी अनेक कामे केली जात आहेत. जवानांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचा प्रकल्प सियाचीनमध्ये उभारण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प त्यांनी सोडला आहे. निव्वळ शाब्दिक कृतज्ञतेऐवजी भरीव काम करणाऱ्या या दाम्पत्याबद्दल आणि त्यांच्या संस्थेच्या कार्याबद्दल जाणून घेऊ या ‘लेणे समाजाचे’ या सदरात...
...............
देशासाठी प्राणाची बाजी लावणारे आपले शूर सैनिक म्हणजे आपल्या प्रत्येकाच्याच अभिमानाचा विषय. अत्यंत अभिमानाने, आदराने आपण त्यांच्याविषयी बोलतो; पण, प्रत्यक्षात त्यांच्यासाठी काही करणाऱ्यांची संख्या अगदी कमी असते. देशासाठी जीव देण्याची तयारी असणारे जवान अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या देशाचे संरक्षण करत असतात. म्हणूनच आपण सर्व नागरिक सुरक्षितपणे जगू शकतो. आपल्याला सर्व सुखसोयी मिळत असतात. अगदी सहजपणे आपण श्वास घेत असतो. ऊन लागले की एसी, पंखा हजर असतो; पण सीमेवर कधी घनदाट जंगलात, तर कधी हजारो फूट उंचीच्या बर्फाच्या कड्यावर श्वास घेणेही कठीण असलेल्या ठिकाणी हे सैनिक उभे असतात. आपण सर्वसामान्य नागरिक एक मिनिटभरदेखील अशा ठिकाणी उभे राहू शकणार नाही, तिथे हे सैनिक जड शस्त्रास्त्रे पेलत शत्रूवर करडी नजर ठेवत, खडा पहारा करत असतात. अशा सैनिकांसाठी सामान्य नागरिकांकडून फार तर दिवाळीला फराळ, राख्या, पत्रे पाठवली जातात; पण अशा सहभागाचे प्रमाणही अगदी कमी असते. ‘आपण आणखी काय करणार,’ असा संकुचित विचार करत आपल्याच विश्वात मश्गुल राहणाऱ्या लोकांसमोर सुमेधा चिथडे यांनी आपल्या कार्यातून एक मोठा धडा घालून दिला आहे. 

सुमेधा आणि त्यांचे पती योगेश यांनी स्थापन केलेल्या ‘सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन’ अर्थात ‘सिर्फ’ या संस्थेने सियाचीनमध्ये जवानांना ऑक्सिजनचा पुरवठा करणा प्रकल्प उभारायचे ठरवले आहे. आतापर्यंत सर्वसामान्य नागरिकांनी सैनिकांसाठी कोणता प्रकल्प उभारल्याचे उदाहरण नाही. त्यामुळे त्यांच्या या कार्यामुळे एक वेगळी वाट लोकांसाठी खुली झाली आहे. जवान आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील बंध अधिक दृढ होण्यासाठी ही गोष्ट उपयुक्त ठरणार आहे. सैनिकांसाठी फक्त शाब्दिक कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी आपण सर्वसामान्य नागरिकही त्यांच्यासाठी काही तरी भरीव काम करू शकतो, ही भावना लोकांनाही समाधान देणारी ठरेल, यात शंका नाही.  

सियाचीन हा सर्वांत उंच बर्फाळ प्रदेश असून, सामरिकदृष्ट्याही तो अत्यंत महत्त्वाचा प्रदेश आहे. त्यामुळे त्या भागात तैनात असलेल्या जवानांची खूप मोठी परीक्षा असते. चिथडे दाम्पत्याने ‘सिर्फ’च्या माध्यमातून सियाचीनमध्ये सैनिकांसाठी ऑक्सिजन पुरवठा प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी किमान एक कोटी दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी निधी जमवण्याची सुरुवात म्हणून सुमेधा चिथडे यांनी स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या विकल्या. त्यातून आलेले सुमारे सव्वा लाख रुपये त्यांनी या कामासाठी देणगी म्हणून दिले. ‘आधी केले मग सांगितले’ अशी त्यांची विचारसरणी असल्याने त्यांनी स्वतःपासून ही सुरुवात केली. त्यानंतर अनेकांनी त्यांना ‘आम्ही पण काही मदत देऊ शकतो का’ असे विचारले. त्यामुळे त्यांनी या कामासाठी आर्थिक मदत स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दूरदूरहून लोक त्यांना जमेल तेवढी आर्थिक मदत देत आहेत; पण अर्थातच प्रकल्पासाठी लागणारा आकडा मोठा आहे. जितक्या लवकर हा निधी जमेल, तितक्या लवकर हा प्रकल्प उभा राहील, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. खरे तर त्यांचे सैनिकांसाठीचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे; पण असा आगळावेगळा प्रकल्प उभारण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले आहे ते केवळ सैनिकांप्रति असलेल्या प्रेमापोटी आणि कृतज्ञतेपोटी. याचे बीज त्यांच्या मनात पेरले गेले ते कारगिल युद्धाच्या काळात.

पुण्यातील घारपुरे प्रशालेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सुमेधाताईंनी १९९९मध्ये भाऊबीजेला शाळेतील मुलींना खडकी येथील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्राला भेट देण्यासाठी नेले होते. त्या वेळी त्या सैनिकांनी त्यांना ओवाळणाऱ्या प्रत्येक मुलीला एक रुपया का होईना, पण ओवाळणी घातली. देशासाठी लढताना कायमचे अपंगत्व येऊनही अत्यंत उमदेपणाने आयुष्य जगणाऱ्या सैनिकांची ती सकारात्मक वृत्ती सुमेधाताईंना नवी दृष्टी देणारी ठरली. त्याच दरम्यान कारगिल युद्ध सुरू झाले. त्या वेळी आपले जवान किती बिकट परिस्थितीत आणि अत्यंत दुर्गम भागात कसे लढत आहेत याच्या बातम्या येत होत्या. कितीतरी जवान, अगदी कोवळे तरुण सीमेवर लढता लढता शहीद झाले. एकीकडे त्यांच्या शौर्याच्या कथा ऐकताना, भारतीय सैन्याच्या पराक्रमाविषयीच्या अभिमानाने ऊर फुलून येत होता. दुसरीकडे, सियाचीनसारख्या दुर्गम ठिकाणी उणे ५५ अंश तापमानात लढणाऱ्या सैनिकांना किती प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो हे पाहून त्या अंतर्बाह्य हादरून गेल्या होत्या. सियाचीनमध्ये दूरदूरपर्यंतच्या परिसरात बर्फच पसरलेला असतो. अशा स्थितीत शस्त्रे घेऊन पहारा देणाऱ्या सैनिकांच्या शरीरावर घातक परिणाम होतातच; पण त्यांचे मानसिक स्वास्थही धोक्यात येते. हे सगळे ते हसत हसत करतात, मोठ्या धीराने या परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावतात. त्यात किंचितही कसूर होत नाही. आणि हे कशासाठी, तर देशासाठी, म्हणजेच सुखनैवपणे आपले आयुष्य जगणाऱ्या आपल्या देशबांधवांसाठी. केव्हाही शत्रूची गोळी आपले प्राण घेईल, याची जाणीव असूनही सैन्यदलात जाणाऱ्यांची प्रेरणा एकच असते ती म्हणजे देशप्रेम. अर्थातच, देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने सीमेवर बंदूक घेऊन लढले पाहिजे असे नाही किंबहुना तसे शक्य नाही. मग आपण काय करू शकतो, हा एकच प्रश्न सुमेधाताईंना सतावत होता. 

‘मी काय करू शकते, माझ्या या सैनिकांसाठी? देशासाठी केवळ आणि केवळ मायभूमीच्या प्रेमाखातर प्राणाची बाजी लावणाऱ्या जवानांसाठी आपण काय करतो? फक्त शाब्दिक हळहळ व्यक्त करतो, यापलीकडे काय,’ या विचारांनी त्या तळमळत होत्या. यातूनच त्यांना मार्ग दिसला तो म्हणजे आपण स्वतः सैनिकांसाठी जे करता येईल ते करायचे. मग त्यांनी सैनिकांना पत्रे पाठवणे, राख्या पाठवणे, फराळ पाठवणे याबरोबरच शहीद जवानांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना भेटणे, जवानांच्या विधवा पत्नींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे अशी कामे पदरमोड करून स्वतःला जमतील त्या प्रकाराने करणे सुरू केले. त्याच वेळी आणखी एक उपक्रम त्यांनी सुरू केला तो म्हणजे सैन्यदलात जाण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे. याकरिता सैन्यदलातील वेगवेगळ्या संधी, त्यासाठीची तयारी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती देणारा एक कार्यक्रमच त्यांनी तयार केला. शाळा, कॉलेजांमध्ये जाऊन त्या हा कार्यक्रम करू लागल्या. आजही त्या हा कार्यक्रम करतात. सैन्यदलात जाणाऱ्या तरुणांचा सत्कार, सैन्यात पराक्रम गाजवलेल्या सैनिकांच्या सामान्य नागरिकांना भेटी घडवणे, त्यांचा सत्कार असे विविध उपक्रम त्यांच्या ‘सिर्फ’ संस्थेतर्फे राबवले जातात. याचेच पुढचे पाऊल म्हणजे, सियाचीन येथे उभारण्यात येणारा ऑक्सिजन प्रकल्प. सियाचीनला स्वतः भेट दिली असल्याने तिथल्या कठीण परिस्थितीबद्दल त्यांना कल्पना आली. त्यातूनच त्यांनी हा प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला. साधारणतः १९९९पासून त्यांचे सैनिकांसाठीचे हे कार्य सुरू आहे. त्या कार्याला दोनेक वर्षांपूर्वी त्यांनी संस्थारूप दिले. चिथडे दाम्पत्याचा मुलगा लष्करात मेजर म्हणून कार्यरत आहे. 

सुमेधाताई  म्हणतात, ‘मी करत असलेले काम हे सैनिकांच्या त्यागापुढे अगदी क्षुल्लक आहे. जात, पात, धर्म, लिंग, भाषा अशा सगळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन देश या केवळ एकाच भावनेने जिवाला जीव देणाऱ्या सैनिकांच्या प्रति आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. त्यांचा त्याग, शौर्य, निष्ठा यांचा सन्मान राखला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ज्वाज्जल्य देशभक्तीचे बाळकडू मला घरातून मिळाले म्हणून मी दागदागिने, कपडालत्ता अशा बाह्य सुखाच्या गोष्टींपलीकडे जाऊन विचार करू शकले. माझा एकुलता एक मुलगा देशसेवेसाठी अर्पण करू शकले. आता आपण आपल्या मुलांना काय देतोय याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. पुतळे, स्मारके, जातिभेद यापलीकडे जाऊन नवीन पिढीसमोर सैनिकांची उदाहरणे ठेवली, तर ही पिढी घडेल. त्यांना सैनिकांच्या, देशप्रेमाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, तरच हा देश प्रबळ महासत्ता बनेल.’ 

संपर्क :
योगेश आणि सुमेधा चिथडे, ‘सिर्फ’ संस्था, पुणे
मोबाइल : ९७६४२ ९४२९१ , ९७६४२ ९४२९२
ई-मेल : cyogeshg.rediffmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 (सुमेधा चिथडे यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link