Next
पाच वर्षीय मुलावर बोन मॅरो प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
प्रेस रिलीज
Wednesday, April 03, 2019 | 04:55 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयातील डॉक्टरांनी पाच वर्षीय अयानच्या ग्रिसेली सिन्ड्रोमवर यशस्वी बोन मॅरो प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून त्याला नवसंजीवनी दिली.

नांदेडचा रहिवासी असलेल्या अयानला लहानपणापासूनच ग्रिसेली सिन्ड्रोम आहे. ग्रिसेली सिन्ड्रोमुळे त्याच्यात हेमोफॅगोसायटिक लिम्फोहिस्टिओसायडॉसिस विकसित झाला. लिम्फोहिस्टिओसायडॉसिस हा अतिरिक्त प्रतिकारक्षमता सक्रियतेचा आजार आहे. अयान दोन वर्षांचा होता तेव्हा त्याला वाडिया हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा आणले होते. त्याच्या अतिसक्रिय प्रतिकारक क्षमतेचा यकृत आणि बोन मॅरोवर परिणाम होत होता. ओव्हरअॅक्टिव्ह प्रतिकारक्षमतेवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्याच्यावर स्टेरॉइड्स आणि केमोथेरपीने उपचार करण्यात आले. त्याने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आणि वाडिया रुग्णालयात त्यावेळी बोन मॅरो प्रत्यारोपण सुविधा नसल्याने त्याला दुसऱ्या वैद्यकीय केंद्रावर जाऊन बोन मॅरो प्रत्यारोपण करण्याचा सल्ला देण्यात आला.

अयानच्या पालकांनी बोन मॅरो प्रत्यारोपण न करण्याचा निश्चय केला आणि ते वाडिया रुग्णालयात पाठपुराव्यासाठी येत राहिले. जेव्हा तो चार वर्षांचा होता तेव्हा हेमोफॅगोसायटिक लिम्फोहिस्टिओसायडॉसिसमुळे पुन्हा एकदा त्याच्या यकृतावर, बोन मॅरोवर आणि मेंदूवर परिणाम होऊ लागला होता. वाडिया हॉस्पिटलमधील इम्युनोलॉजी डॉक्टरांनी त्याला स्टेरॉइड्स दिले आणि केमोथेरपी दिली आणि त्याला वाडिया हॉस्पिटलमध्ये नव्याने सुरू झालेल्या बोन मॅरो प्रत्यारोपण सुविधा केंद्रात जाण्याचा सल्ला दिला. अयानला दोन भावंड आहेत. दुर्दैवाने दोन्ही भावंडाच्या ऊतींचा प्रकार हा अयानपेक्षा वेगळा होता. म्हणून बोन मॅरो प्रत्यारोपण टीमने दात्याचा शोध घेतला आणि दात्रीच्या (स्टेम सेल ट्रान्स्प्लान्ट रजिस्ट्री) माध्यमातून त्यांना अयानशी पूर्णपणे जुळणारा, पण नात्यातील नसलेला दाता मिळाला.

या संदर्भात बोलताना डॉक्टर म्हणाले, ‘अयानवरील प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती, कारण स्टेरॉइड्स आणि केमोथेरपी देऊनही अयानला सक्रीय आजार होता, ज्यात त्याचे यकृत आणि बोन मॅरो समाविष्ट होते. आम्ही अॅलेम्तुझुमॅब हे औषध आयात करून त्याच्या अतिसक्रिय प्रतिकारक क्षमतेवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपचार सुरू केले. अयानने अॅलेम्तुझुमॅब औषधाला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे बोन मॅरो प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला यश मिळेल, याची आशा वाढली. अयानवर प्रत्यारोपण करून तीन आठवडे उलटले आहेत. बोन मॅरो ग्राफ्ट व्यवस्थित काम करत आहे आणि यकृत, बोन मॅरो आणि मेंदूसारखे अवयव सामान्यपणे कार्य करत आहेत. या आठवड्याच्या शेवटी त्याला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. इंग्लंड किंवा अमेरिकेत ज्या प्रकारे बोन मॅरो शस्त्रक्रिया करण्यात येते त्याच प्रकारे ही शस्त्रक्रिया येथे करणे समाधानकारक आहे.’

वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या, ‘बीजे वाडिया बालरुग्णालयासाठी ही नव्या युगाची सुरुवात आहे. रुग्णाची आर्थिक परिस्थिती कशीही असली, तरी आम्ही बोन मॅरो प्रत्यारोपणासारखी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया येथे उपलब्ध करून देता येण्याबाबत आनंदी आहोत. महाराष्ट्रातील ५०० रुग्णांना बोन मॅरो प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे. ही सुविधा उपलब्ध करून देणारी अत्यंत कमी केंद्रे आहेत आणि आम्ही वाजवी खर्चात अशा रुग्णांवर उपचार करून देऊ शकतो, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search