Next
‘नैतिकता हेच टाटांच्या यशाचे गमक’
प्रदीप भार्गव यांचे प्रतिपादन
BOI
Tuesday, December 18, 2018 | 04:22 PM
15 0 0
Share this story

जे. आर. डी. टाटापुणे : ‘विनम्रता, साधेपणा, सामाजिक बांधिलकी आणि नैतिकता या जोरावरच जे. आर. डी. टाटा यांनी विश्वव्यापी उद्योगसमूह वृद्धिंगत केला’, असे मत मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी व्यक्त केले. टाटा यांच्या स्मृतिदिनानिमित्त घोले रोड येथील महात्मा फुले वस्तुसंग्रहालयात ‘टाटा अॅडमायरर' ग्रुप’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, किर्लोस्कर इंजिन ऑइलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र देशपांडे, माजी पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांच्यासह ‘टेल्को’मधील निवृत्त कर्मचारी उपस्थित होते.

भार्गव पुढे म्हणाले, ‘मी माझी अभियंत्याची पदवी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधून घेतली आहे. ही संस्था स्थापन करण्यामागे टाटांचा मोठा वाटा होता. जे. आर. डी. टाटा स्वतः या संस्थेच्या कारभारात लक्ष घालत असत. माझ्या विद्यार्थीदशेत त्यांना काही वेळा जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला टाटा यांची नम्रता आणि साधेपणाचे दर्शन घडले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे हेच पैलू टाटा उद्योग समूहाच्या नैतिक तत्वांमध्ये दिसून येतात.’

हरित ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन; तसेच महाराष्ट्रातील लोडशेडिंग बंद करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये किर्लोस्कर व टाटा समूह यांनी फायद्या-तोट्याचा विचार न करता सहकार्य केल्याचे भार्गव यांनी आवर्जून नमूद केले. 

जे. आर. डी. टाटा यांच्या स्मृतिदिनानिमित्त टाटा अॅडमायरर  ग्रुपच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी (डावीकडून) अशोक धिवरे, अमर साबळे, प्रदीप भार्गव,गिरीश बापट व राजेंद्र देशपांडे.

टेल्कोतल्या अनुभवाविषयी बोलताना पालकमंत्री बापट म्हणाले, ‘टेल्कोमध्ये मला खूप शिकायला मिळालं. मंत्र्यांनी आपल्या कामकाजात कसं पुढं जावं आणि आपली वागणूक किती नम्रतेची असावी, याच शिक्षण मला टेल्कोमध्ये मिळाले. टेल्को माझ्या जीवनातून वजा केल्यास मी शून्य आहे. टेल्कोमध्ये मी कार्डेक्समध्ये काम करायचो. तेथे प्रत्येक वस्तूला कोड नंबर होता. त्यामुळे कार्डाप्रमाणे कोड नंबर पाठ होते. त्या पाठांतराची सवय लागली. जशी कार्ड वाचून आम्ही वस्तू ओळखू लागलो; तशी समाजात फिरताना माणस ओळखू लागलो. ‘टेल्को’मधल्या उपहारगृहात अधिकाऱ्यांपासून कामगारापर्यंत सर्वांना एकाच ठिकाणी नाष्टा करावा लागत असे. ते ही नाष्टा घेण्यापासून, ताट ठेवण्यापर्यंत सर्व कामे स्वतःला करावी लागत. हीच सवय आम्हाला लागली. आज मंत्री म्हणून मी समाजात वावरत असताना एखाद्या कार्यक्रमात गेलो, कोणी चटणी भाकरी खात असेल, तर ती चटणी भाकरी हातात घेऊन मी खातो. टेल्को मध्ये काम केल्याने सामान्य माणसांमध्ये काम करताना माझी निर्णय घेण्याची क्षमता वाढली. काम करताना त्या शिफ्टमधील काम त्याच वेळी पूर्ण करावे लागत होते. यामुळे आज मंत्री म्हणून काम करताना कामे प्रलंबित न ठेवता, ज्या त्या दिवशी त्या कामाचा निपटारा करण्याची म्हणजेच झिरो पेंडंसीची सवय लागली.’ 

‘सत्तेत आल्यानंतर राज्यात आम्ही अनेक महत्त्वाच्या विषयावर काम करत आहोत. शेती आणि औद्योगिकीकरण हे त्यातील दोन महत्वाचे विषय आहेत. आज देशात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांच्या प्रयत्नातून राज्य औद्योगिकीकरणामध्ये प्रगती करत आहे. या प्रयत्नांना प्रदीप भार्गव व राजेंद्र देशपांडे यांच्यासारख्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे’, अशी अपेक्षा बापट यांनी व्यक्त केली.


कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामधील संबंध या विषयावर बोलताना राजेंद्र देशपांडे यांनी ‘कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यातील समन्वय साधणे आवश्यक असते’, असे मत व्यक्त केले. 

पाहुण्यांचे स्वागत बाबा राणे यांनी केले. सूत्रसंचालन सुनील शिरोडकर यांनी, तर आभारप्रदर्शन आणि समारोप श्रीकांत देव यांनी केला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link