Next
‘प्रेरणा मिळेल असा मातृतीर्थचा विकास करणार’
राजमाता जिजाऊ यांना जन्मस्थळी अभिवादन
प्रेस रिलीज
Friday, February 15, 2019 | 01:07 PM
15 0 0
Share this article:



बुलडाणा : ‘माँ जिजाऊंनी स्‍वराज्‍यांची बिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या मनात बालपणापासूनच रुजविली. त्‍यांच्‍या या कार्यकर्तृत्वामुळेच हिंदवी स्‍वराज्‍याचे स्‍वप्‍न प्रत्‍यक्षात आले. हा गौरवशाली इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचवून त्‍यांना प्रेरणा मिळेल, असा मातृतीर्थचा विकास करण्‍यास राज्‍य शासन कटिबद्ध आहे,’ असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंदखेड राजा येथे केले.

पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालयाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मातृतिर्थ माँ जिजाऊ साहेब सिंदखेड राजा विकास आराखड्यातंर्गत विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमांचे आयोजन राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात करण्यात आले होते. हा कार्यक्रम १४ फेब्रुवारी २०१९ रोजी करण्यात आला. त्यावेळी राजमाता जिजाऊ विद्यालयाच्या प्रांगणावर मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते.



या वेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती, जिल्हा परिषद अध्यक्षा उमा तायडे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री डॉ संजय कुटे, डॉ. संजय रायमूलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, ॲड. आकाश फुंडकर, नगराध्यक्ष नाझेर काझी, जिल्हा परिषद सभापती श्वेता महाले, माजी आमदार धृपदराव सावळे, तोताराम कायंदे, विभागीय आयुक्त पीयूष सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे आदी मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस म्‍हणाले, ‘मातृतीर्थचा विकास करण्‍यासाठी राज्‍य शासन कटिबद्ध आहे. आराखड्यांतर्गत येणाऱ्या सर्व विकास कामांसाठी पहिल्या टप्प्यातील संपूर्ण निधी देण्‍यासोबतच पूर्ववैभव टिकवून ठेवण्‍यासाठी सहकार्य करण्‍यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जनतेसमोर यावे, यासाठी ६०० कोटी रुपयांचा रायगड विकास आराखडा मंजूर करण्‍यात आला आहे. यातून गडकिल्‍यांचा कायापालट करण्‍यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या गड किल्‍ल्‍यांसोबतच माँ जिजाऊ मातेच्‍या प्रेरणा स्‍थळांचा विकास होणे गरजेचे आहे. त्‍यासाठी टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने निधी उपलब्‍ध करून देण्‍यात येईल.’

‘राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना मदत व्‍हावी, यासाठी शेतकरी सन्मान योजनेतून दर वर्षी सहा हजार रुपयांची थेट मदत केंद्र शासन करणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषी पंप, विहिरी उपलब्ध करून सिंचनाचा अनुषेश दूर करण्यात येत आहे. या माध्यमातून शेतीचा गुणात्मक विकास होणे गरजेचे आहे. शासनाच्या कृषी माल खरेदी धोरणातंर्गत ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसोबतच ऑफलाइन शेतमालाची विक्री केलेल्या सर्व शेतकऱ्यांना हमी भावानुसार रक्कम देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. यामुळे थकीत रक्कम असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या विक्री केलेल्या शेतमालाचा मोबदला मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांत साडेआठ हजार कोटींचा शेतमाल खरेदी करण्यात आला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे सर्वेक्षण तातडीने करण्यात आले आहे. यातून सुमारे चार हजार ७०० कोटी रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना तातडीने मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे; तसेच पिक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना लवकरच देण्यात येणार आहे,’ असे फडणवीस यांनी सांगितले.



‘बुलडाणा जिल्ह्यात दोन लाख ४४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला आहे. शेत जमीनधारक एकत्रित शेतकरी कुटुंबालाही कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. कर्जमाफी मिळण्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या काही ठिकाणी अडचणी येत आहे. त्याही लवकरच निकाली काढून शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला जोपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळत नाही, तोपर्यंत ही योजना सुरूच ठेवण्यात येणार आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यात दुष्काळाच्या झळा पोहोचत आहे. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यातील धोत्रा नंदई डावा कालव्यातील येणाऱ्या अडचणी निकाली काढून खडकपूर्णा प्रकल्पातील पुनर्वसनाची कामेही योग्य पद्धतीने करण्यात येतील. मंठासह ९२ गावांच्या पाणीपुरवठा करण्याबाबतच्या प्रश्नासंदर्भात लवकरच मंत्रालयात पाणीपुरवठा मंत्री यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

पर्यटन मंत्री रावल म्हणाले, ‘मातृतीर्थच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्याबाहेरही राज्याची अस्मिता छत्रपती शिवाजी यांच्या जीवन चरित्रावर उभी करण्यात आली आहे. पानीपत आणि सुरजकुंड येथील कार्यक्रमांमधून राज्याची प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे.’



आमदार डॉ. खेडेकर यांनी विकास आराखड्यातील दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू करण्याची मागणी प्रास्ताविकातून केली. खासदार प्रतापराव जाधव यांनी विविध विकास कामांना मोठा निधी मिळाला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, पंचक्रोशीतील नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमापूर्वी फडणवीस यांनी माँ जिजाऊ साहेब राजवाडा वास्तू नुतनीकरणाचे भूमिपूजन करून कोनशिलेचे अनावरण केले; तसेच मुख्यमंत्री यांनी राजे लखुजीराव जाधव राजवाड्यातील माँ जिजाऊंच्या शिल्पाकृतीला पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search