Next
‘राजेंद्र कोरडे यांचा विजय निश्चित’
प्रेस रिलीज
Friday, June 22, 2018 | 05:04 PM
15 0 0
Share this storyमुंबई : पुरोगामी पदवीधर आघाडीचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र कोरडे यांचा विजय नक्की आहे असा विश्वास शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला.

मुंबई पदवीधर मतदारसंघातील पुरोगामी पदवीधर आघाडीचे उमेदवार राजेंद्र कोरडे यांच्या उमेदवारीबाबत आज शेकाप कार्यालयात पुरोगामी पदवीधर आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.

आज (ता. २२) मुंबई पदवीधर मतदार संघाची निवडणूक असून, निवडणुकीमध्ये सर्व पुरोगामी पक्षांना आणि पुरोगामी संघटनांनी राजेंद्र कोरडे यांना भरघोस पाठिंबा दिला आहे. गेले पंधरा-वीस दिवस मुंबईमध्ये आघाडीचे सर्व कार्यकर्ते अगदी जिद्दीने घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. शेकापचे महाराष्ट्रातील ७०० ते ८०० कार्यकर्ते विधानसभा गटनिहाय आणि वॉर्डप्रमाणे मुंबईमध्ये काम करत आहेत.

‘मुंबई पदवीधर मतदारसंघाची मक्तेदारी खरी डाव्या विचारांच्याच उमेदवाराची होती. मधु दंडवते यांच्यासारखे दिग्गज नेते या मतदारसंघात निवडून येत होते. जनता पक्षामध्ये सर्व पक्ष विलिन झाल्यानंतर समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी त्यावेळी त्यावेळच्या जनसंघाला ही जागा दिली आणि त्यानंतर काही काळानंतर ती जागा शिवसेनेकडे गेली; परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व पुरोगामी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया जी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. त्याची सुरुवात बाळाराम पाटलांच्या निवडणुकीने झाली. कोकण शिक्षक मतदार संघात सर्व पुरोगामी पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आणि विशेषत: टिडीएफसारख्या अनेक विविध शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला त्यामुळे बाळाराम पाटलांचा विजय झाला,’ असे पाटील यांनी सांगितले.

‘या मतदारसंघामध्ये सर्व टीडीएफसारखी पुरोगामी शिक्षक संघटना आहे. त्यांनीही या मतदारसंघामध्ये उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये राहणारा एक तरुण पुरोगामी पदवीधर आघाडीने हा उमेदवार दिला आहे. ज्याचे बालपण धारावीमध्ये गेले, धारावीचे पुनर्वसन करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे पुनर्वसनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्याचे नेतृत्व राजेंद्र कोरडे यांनी केले आहे. विद्यार्थी दशेपासून डाव्या विचारसरणीत काम करणारा तरुण कार्यकर्ता आज पदवीधरांच्यासमोर पदवीधर आघाडीने उमेदवार म्हणून दिला आहे,’ असे ते म्हणाले.

‘गेल्यावेळी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये शिवसेना आणि भाजप या एकत्रित लढले होते. या निवडणुकीमध्ये सेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढत आहेत आणि त्याच्या उलट संपूर्ण पुरोगामी आणि विविध विचारांचे पक्ष आज एक झाले आहेत. आप पक्षाची स्थापना झाल्यापासून आप पक्षाने कधी कोणाबरोबरही आघाडी केलेली नाही किंवा कुणालाही पाठिंबा दिलेला नाही; मात्र ही पहिली निवडणूक आहे ज्यामध्ये आप पक्षाने राजेंद्र कोरडे यांना पाठिंबा दिलेला आहे,’ असे पाटील यांनी नमूद केले.
 
‘बुक्टु’ या प्राध्यापकांच्या संघटनेनेही पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे जवळजवळ २२ ते २५ हजार पदवीधर मतांची नोंदणी कोरडे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि विविध संघटनांनी केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, आप पक्ष, टीडीएफ संघटनांचे मतदार आज वाढलेले आहेत. आजच्या या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये विविध पक्षाचे नेते उपस्थित आहेत,’ असेही पाटील म्हणाले.

‘आत्ताची लढाई उमेदवाराची नाही, तर तत्त्वाची’
‘आत्ताची लढाई उमेदवाराची नाही, तर ही तत्त्वाची लढाई आहे. या देशात चांगला विचार रुजवायचा असेल, तर कुठेतरी आळा बसला पाहिजे यादृष्टीने आम्हाला ही निवडणूक अतिशय महत्त्वाची वाटते. म्हणून कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच अशा निर्धाराने आम्ही एकत्र आलो आहोत आणि आम्ही विजयी होऊ,’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले यांनी या वेळी व्यक्त केला.

ते म्हणाले, ‘ही मुंबई पदवीधरांची निवडणूक आहे. त्यासाठी सगळे पक्ष एकत्र आले असून, हे वैचारिक व्यासपीठ महत्त्वाचे आहे. आज देशातील वातावरण आहे त्यामध्ये एकप्रकारचा उन्माद सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. सर्वसामान्य नागरिक  सुरक्षेसाठी भयग्रस्त झालेला आहे. एका कुठल्यातरी विचारसरणीला हाताशी धरून आपली सत्ता अतिशय बेलगामपणे वापरायची यापलीकडे सत्ताधाऱ्यांना सुचत नाही आणि अशावेळेला ठामपणे उभे राहायचे आहे म्हणून आमचे सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि संघटना एकत्र आल्या आहेत. यामध्ये विचारसरणी हा भाग आहेच. डावीकडे झुकलेली विचारसरणी असणे म्हणजे या देशात गुन्हा आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर त्याला ठामपणे उत्तर देण्याची गरज आहे.’

‘मुंबईमध्ये जे घडते त्याचे परिणाम राज्यभरात दिसतात. ही एक निवडणूक महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणासाठी कलाटणी देणारी ठरेल इतकी महत्त्वाची आहे. या निवडणुकीची यंत्रणा वेगळ्याप्रकारची असते. सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा हा भाग वेगळा असतो. नोंदणी होते त्याप्रमाणे मतदार होतात. त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचे काम करत असून, त्यासाठी जी-जी व्यवस्था करायला हवी ती आम्ही एकत्रितपणे करत आहे,’ असे आमदार टकले यांनी सांगितले.

‘सेनेची मक्तेदारी मोडण्यासाठीच आम्ही एकत्र’
‘मुंबई पदवीधर मतदारसंघातील ही निवडणूक फक्त शिवसेनेची मक्तेदारी आहे की काय ती मक्तेदारी मोडण्यासाठी आणि त्यांना मुंबईमधून पूर्णपणे घालवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,’ असे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी सांगितले.

‘ही विचारांची लढाई आहे. पदवीधरांना पकोडे तळायला सांगणार असाल आणि त्यांच्या पदवीचा आणि भविष्याचा अपमान सत्ताधाऱ्यांकडून होत असेल, तर त्या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवणे हे आमचे काम आहे. पदवीधरांशी आम्ही बोललो त्या पदवीधरांनी आज सत्ताधारी तरुण मुलांना ज्यांनी पदवी घेतली त्यांना ज्या पद्धतीने वागवले जाते आहे. ज्या उन्मादाने आणि माजाने त्यांना नमवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची अवेहलना करत आहेत. त्याच्याविरोधात आवाज उठवावा असे प्रत्येक तरुणाला वाटत आहे. तरुणांच्या भ्रमाचा भोपळा या सत्ताधाऱ्यांनी फोडला आहे. त्यामुळे या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात या विचारांच्याविरोधात, या तत्वाच्याविरोधात ही लढणारी निवडणूक आहे,’ असे वाघमारे यांनी नमूद केले. राजेंद्र कोरडे हा एक चांगला आणि अभ्यासू उमेदवार मुंबई पदवीधर मतदारसंघात देण्यात आला आहे. त्यामुळे राजेंद्र कोरडे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास वाघमारे यांनी व्यक्त केला.पत्रकार परिषदेला शेकापचे सरचिटणीस आमदार पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार टकले, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रवक्ते संजय तटकरे, माजी आमदार अशोक धात्रक, सिद्धीविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे, पुरोगामी पदवीधर आघाडीचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अॅड. राजेंद्र कोरडे आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link