Next
‘‘सिनेमा डायरी’ हा महत्त्वाचा संदर्भग्रंथ’
BOI
Monday, May 28, 2018 | 02:47 PM
15 0 0
Share this story

पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर

पुणे  :
‘चित्रपट ही एक गंभीर कला असून, चित्रपटांवर संशोधक वृत्तीने लिहिणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर पद्माकर पाठकजी यांचे ‘सिनेमा डायरी’ हे पुस्तक एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून काम करील,’ असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) व आशय फिल्म क्लब यांच्यातर्फे २७ मे २०१८ रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पद्माकर पाठकजी लिखित ‘सिनेमा डायरी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्या वेळी आगाशे बोलत होते.

प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक अभिराम भडकमकर, ‘एनएफएआय’चे संचालक प्रकाश मगदूम, ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर, चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर, पुस्तकाचे लेखक पद्माकर पाठकजी, ‘आशय फिल्म क्लब’चे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव आदी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रतीक प्रकाशनाचे प्रवीण जोशीही या वेळी उपस्थित होते.

‘सिनेमा डायरी या पुस्तकात केवळ कलाकारांची माहिती किंवा चित्रपटसृष्टीतील घटनांच्या तारखा नसून, तेव्हाच्या कालखंडावर प्रकाश टाकणारी, आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक घटनांची माहिती या डायरीतून मिळते. त्या काळात काय घडले, यावर या डायरीमुळे पुन्हा एकदा प्रकाश पडणार आहे. हे पुस्तक म्हणजे  संशोधनाच्या दृष्टीने एक वेगळे पाऊल आहे,’ अशी आशा अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केली. 

सुलभा तेरणीकर म्हणाल्या, ‘ही केवळ सिनेमा डायरी नसून, कलाकारांच्या जन्म आणि मृत्यूमध्ये असलेल्या त्यांच्या आयुष्याचा वेध आहे. तो वाचकांनी अनुभवणे गरजेचे आहे. चित्रपटसृष्टीतील घटनांच्या दृष्टीने तारीख, वर्षे यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे पुस्तक केवळ अभ्यासकांसाठी नसून, वाचकांसाठीही आहे. चित्रपट कलावंतांच्या जन्म-मृत्यूच्या तारखेसोबतच तो कलाकार कोठे जन्मला, याचेही तपशील पाठकजी यांनी या पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत द्यावेत.’
‘सध्या कोणत्याही माहितीची गरज पडली, की आपण विकिपीडिया किंवा गुगलवर शोधतो; मात्र या माध्यमांवर उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये त्रुटी असतात. त्यामुळे पुस्तकांचा वापर वाढायला हवा. त्या दृष्टीने हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे,’ असे प्रकाश मगदूम म्हणाले.

‘जगभरातील एखादा अभ्यासक ज्या वेळी भारतीय चित्रपटसृष्टीचा अभ्यास करायला येईल, तेव्हा त्याच्यासमोर चित्रपटसृष्टीतील गॉसिप्स आणि चटपटीत मुलाखती याच गोष्टी येतील, अशी खंत अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली होती. ती खरीच आहे. सिनेमाविषयक गंभीर लिखाणाची आपल्याकडे कमतरताच आहे,’ असे मत दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केले. 

पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी राज्याच्या विविध भागांतून चित्रपट अभ्यासक, आस्वादक उपस्थित होते. लेखक पद्माकर पाठकजी यांनी या वेळी पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास उलगडला. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. कार्यक्रमानंतर ‘सिनेमा सिनेमा’ हा अनुबोधपट दाखवण्यात आला.

पुस्तकाबद्दल...
या पुस्तकात भारतीय सिनेमाशी निगडित सुमारे दोन हजार कलावंतांच्या माहितीचा समावेश आहे. केवळ हिंदी, मराठीच नव्हे, तर अन्य प्रादेशिक भाषांतील सिनेमांच्या माहितीचाही यात समावेश आहे. अभिनेते-अभिनेत्रींपासून दिग्दर्शक, संकलक, निर्माते, गायक, संगीत दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कॅमेरामन अशा विविध कलावंतांच्या जन्म-मृत्यू, विवाहाच्या तारखा, विक्रम केलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शित होण्याच्या आणि चित्रपटसृष्टीशी निगडित अन्य महत्त्वाच्या तारखा, कलावंतांच्या आयुष्यात घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना, योगायोग अशा अनेक गोष्टींच्या नोंदी या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतील. उदाहरणार्थ, दुर्गा खोटेंचा जन्म १३ जानेवारी १९०५ रोजी झाला. त्या वर्षी संक्रांत १३ जानेवारी रोजी आली होती. (एरव्ही ती १४ किंवा १५ जानेवारीला येते.) अशोक कुमार यांचा जन्म १३ ऑक्टोबर रोजी झाला होता, तर त्यांचे बंधू किशोर कुमार यांचा मृत्यू १३ ऑक्टोबरलाच झाला होता. मधुबालाचा जन्म आणि मृत्यूदिन एकाच म्हणजे फेब्रुवारी महिन्यात आहे. ‘पा’ चित्रपटात काम केलेली आणि ‘रसना गर्ल’ म्हणून परिचित असलेली बालकलाकार तरुणी सचदेव हिच्या आय़ुष्यात १४ तारखेचा विचित्र योगायोग आहे. १४ मे १९९८ रोजी जन्मलेली ही कलाकार १४व्या वाढदिवशी (१४ मे २०१२) विमान अपघातात मृत्युमुखी पडली. जॉनी वॉकरच्या साखरपुड्याचीही तारीख या पुस्तकात आहे. ४४० पानांच्या या पुस्तकात एक जानेवारीपासून ३१ डिसेंबरपर्यंतच्या प्रत्येक तारखेची पाने असून, त्या दिवशीच्या घटनांची नोंद त्यात आहे. या पुस्तकासाठीची माहिती संकलित करण्यासाठी सुमारे साडेतीन-चार वर्षांचा कालावधी लागल्याचे लेखक पद्माकर पाठकजी यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले. या पुस्तकाच्या रूपाने पाठकजी यांनी भारतीय सिनेमाशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा असा दस्तऐवज तयार केला आहे. अभ्यासक, माध्यमे, चित्रपटप्रेमी आदींसाठी संदर्भग्रंथ म्हणून तो उपयुक्त ठरेल. प्रतीक प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून, त्याची किंमत ४०० रुपये आहे. 

लेखकाबद्दल...
या पुस्तकाचे लेखक पद्माकर पाठकजी यांनी महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक, चित्रपटविषयक पुरवण्या यांमध्ये गेली ३५ वर्षे विविध विषयांवर लेखन केले आहे. आकाशवाणीवरील हिंदी चित्रपटविषयक कार्यक्रमांसाठीही त्यांनी लेखन केले असून, अनेक चित्रपट कलावंतांच्या जाहीर मुलाखतीही घेतल्या आहेत. बिनाका गीतमाला एक आठवण, कथा पुरस्काराची, साहित्यातील विचारधन, मुले घडवण्यासाठी, सूत्रसंचालन आणि निवेदन, फिल्मफेअर पुरस्कारांचा इतिहास या पुस्तकांसोबतच लोकप्रिय पार्श्वगायक महंमद रफी यांच्यावर आधारित पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले आहे. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर गेले वर्षभर ते ‘सुनहरे गीत’ या सदरातून जुन्या हिंदी चित्रपटगीतांवर रसास्वादपर लेखन करत आहेत.

(सिनेमा डायरी हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉम या पोर्टलवरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
श्रीपाद पाठकजी About 295 Days ago
अतिशय सुंदर काय॔क्रम झाला त्याचा व्हिडिओ पण मी पाहिला पुस्तक खुपच छान आहे सर्व काळातील सिनेमांबद्दल सविस्तर माहितीचे उत्कृष्ट /यथार्थ वर्णन केले आहे खुप आवडले
2
0

Select Language
Share Link