Next
डोंगरवाटा, काल आणि आज...
BOI
Friday, December 08, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

सह्याद्रीतील गिरिभ्रमण

‘गिरिविहार’ या गिर्यारोहण संस्थेचा हीरक महोत्सव आणि हिमालयातल्या भारताच्या पहिल्या नागरी मोहिमेचा पन्नासावा वर्धापनदिन नुकताच साजरा झाला. ती मोहीम प्रत्यक्ष अनुभवलेले लेखक वसंत वसंत लिमये यांनी त्या निमित्ताने जागवलेल्या आठवणी आणि ‘डोंगरवाटा, काल आणि आज...’ या विषयावर केलेलं हे विचारमंथन....
..............
पाच नोव्हेंबरची संध्याकाळ. कार्यक्रम पाच वाजताचा होता आणि मी चार वाजताच माटुंग्यातील पोतदार कॉलेजमध्ये पोहोचलो. अशा वेळी कार्यक्रमापेक्षा खूप काळानंतर होणाऱ्या गाठीभेटी मला जास्त महत्त्वाच्या वाटतात. निमित्त होतं ‘गिरिविहार’ या माझ्या गिर्यारोहण संस्थेचा हीरक महोत्सव आणि हिमालयातील ‘हनुमान’ या शिखरावरील भारतातील पहिल्या नागरी मोहिमेचा पन्नासावा वर्धापनदिन. अनेक दिवसानंतर राजू वाणी, सुनील मोहिले, अरुण सावंत अशी जुनी मंडळी आणि ‘मॅड मॅक्स गँग’चे सदस्य राहुल दंडवते, जुई लागू-खोपकर, अभिजित रणदिवे अशी अनेक जणं भेटली. माझ्या गिरिभ्रमणाची सुरुवात ‘रुईया’ कॉलेजमध्ये झाली, तर ‘आयआयटी’मध्ये खऱ्या अर्थानं गिर्यारोहण हा माझा छंद, ध्यास झाला. गिर्यारोहणातील ‘बेसिक’ आणि ‘अॅडव्हान्स’ कोर्सेस आणि दोन मोहिमा मी ‘आयआयटी’त असतानाच केल्या होत्या. ‘आयआयटी’तून बाहेर पडल्यावर मात्र मी कुठल्याच क्लबचा सदस्य नसल्यामुळे हिमालयातील मोहिमा आयोजित करताना खूप अडचणी येत असत. काहीसं अनाथ झाल्यासारखं वाटत होतं. त्यापूर्वी ‘गिरिविहार’शी डोंगरात अनेकदा संबंध आला होता. एक जुना-जाणता क्लब अशी त्याची ख्याती होती. मी खऱ्या अर्थानं १९८६ साली ‘कामेट’ मोहिमेच्या निमित्तानं ‘गिरिविहार’मध्ये दाखल झालो. तो काळच खूप वेगळा होता!

दिवंगत प्रा. ए. आर. चांदेकर
पश्चिम बंगालला हिमालय जवळ असल्याने आणि महाराष्ट्रात सह्याद्रीमुळे, देशातील या दोनच राज्यांत १९५३मधील एव्हरेस्ट विजयानंतर गिर्यारोहण रुजलं आणि वाढीस लागलं. गेल्या साठेक वर्षांत महाराष्ट्रात गिरिभ्रमण, प्रस्तरारोहण (Rock Climbing) आणि हिमालयातील गिर्यारोहण यांची लोकप्रियता आणि वाढ विविध अंगांनी झाली. आधी इंटर कॉलेजिएट हायकर्स क्लब आणि नंतर १९५६ सालच्या सुमारास ‘गिरिविहार’ची स्थापना झाली. सुरुवातीला सह्याद्रीतील भटकंती, गिर्यारोहणातील प्रशिक्षण आणि मग १९६६ सालातील हिमालयातील पहिली नागरी मोहीम ‘हनुमान’ या शिखरावर यशस्वीरीत्या पोहोचली. त्या उत्साहवर्धक वातावरणात ‘गिरिविहार’ ही एक प्रगल्भ संस्था म्हणून आकारास येऊ लागली. व्यक्ती किंवा वैयक्तिक यश यापलीकडे जाऊन पायाभूत काम करणं, हे या संस्थेचं ब्रीद होतं आणि त्यामुळेच ही संस्था दीर्घायुषी ठरली, असं मला वाटतं. ‘गिरिविहार’तर्फे कान्हेरी इथं प्रस्तरारोहण शिबिरं, सह्याद्रीतल्या चढाया, हिमालयातल्या मोहिमा यांचं सातत्यानं आयोजन होऊ लागलं.

दिवंगत शरद ओवळेकर१९८५ साली ओवळेकर सर, माळी सर, चांदेकर सर, महेश देसाई आदींशी माझ्या ओळखी झाल्या. श्रीकांत ओक, संजय बोरोले, अनिल कुमार, चारुहास जोशी, दिलीप लागू यांच्याशी गट्टी जमली. आम्ही सगळेच जिगरबाज, उत्साही आणि अत्रंग असलो, तरी ‘गिरिविहार’मधे एक शिस्त, गांभीर्य आणि अनेक वर्षांची परंपरा होती. त्या काळातले ‘सीनियर्स’ मार्गदर्शन करत, आडमुठेपणा न करता प्रेमानं प्रोत्साहन देत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या उत्साहाला भरकटू न देता योग्य दिशा देत. एका अर्थानं ‘गुरू-शिष्य’ परंपरेचं हे आधुनिक रूप होतं. १९८० ते ९० हा ‘गिरिविहार’साठी सुवर्णकाळ होता. ‘सुवर्णकाळ’ हा शब्द मी पाच नोव्हेंबरच्या कार्यक्रमात ऐकला आणि माझी कॉलर सहजच टाइट झाली. या दशकात सह्याद्रीत ‘खडा पार्सी’, ‘ड्यूक्स नोज’, ‘कोकणकडा’ अशा महत्त्वाकांक्षी चढाया, ‘कामेट’, ‘कांचनजंगा’ अशा हिमालयातील मातब्बर मोहिमा, असं काय काय तरी घडलं. एव्हाना मुंबई-पुण्यात अनेक गिर्यारोहण संस्था अस्तित्वात आल्या होत्या. त्यांच्यात एक निकोप चुरशीचं वातावरण होतं. एकमेकांवर कुरघोडी करण्याऐवजी गिर्यारोहणाचे मानदंड उंचावण्याचा प्रयत्न होत असे.

‘खडा पार्सी’च्या चढाईची दखल ‘किर्लोस्कर’ने घेतली होती.चुरस म्हटल्यावर ८५ सालचा एक गमतीशीर अनुभव आठवतो. सौदी अरेबियात एक वर्ष पाट्या टाकून मी नुकताच भारतात परतलो होतो. जुलै महिन्यात ‘आयआयटी’च्या मित्रांबरोबर हरिश्चंद्रगडावर गेलो होतो. बेफाट पाऊस आणि गच्च ढगात हरवलेल्या हरिश्चंद्रेश्वर मंदिरामागच्या गुहेत ‘कोकणकड्या’च्या चढाईचा प्लॅन जन्माला आला. त्याच सुमारास कामेट मोहिमेसाठीच्या ‘गिरिविहार’च्या ‘वीकली मीटिंग्ज’ सुरू झाल्या होत्या. मी कामेट मोहिमेचा उपनेता होतो. महाराष्ट्रातल्या कुठल्याही गिर्यारोहकाला भुरळ घालणारी ‘कोकणकड्या’ची चढाई हा नाजूक विषय होता. आदल्याच वर्षी अरुण सावंतच्या चमूने ‘ड्यूक्स नोज’ची यशस्वी चढाई केली होती. चुरशीच्या वातावरणाची धास्ती असल्यानं, आम्ही ‘आयआयटी’तल्या मंडळींनी ‘कोकणकडा प्लॅन’ पूर्णपणे गुप्त राखायचं ठरवलं. मी ‘कोकणकडा’ मोहिमेचे नेतृत्व करणार होतो. या साऱ्या प्रकारात माझी तारेवरची कसरत सुरू झाली. ‘कोकणकडा’ मोहिमेतील पाच मुख्य आरोहक सोडता इतर सर्वांपासूनच ही मोहीम गुप्त राखण्यात आली होती. ‘आयआयटी’त चढाईचा सराव सुरू होता. पंचमढीला रॉक क्लायम्बिंग कॅम्प असल्याचं खोटं कारण सांगून आम्ही इक्विपमेंटची जमवाजमव केली होती. हे सारं गुप्ततेचं वातावरण असूनही, निघण्यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी मी ठाण्याला श्रीकांत ओकच्या घरी पोहोचलो. श्रीकांत ‘कामेट’चा लीडर होता. सुरक्षिततेच्या दृष्टीनं काळजी घेण्यासाठी, मी ‘कोकणकड्या’चा संपूर्ण प्लॅन श्रीकांतच्या कानावर घातला. अर्थातच गुप्ततेबद्दल मी श्रीकांतच्या शिव्या खाल्या. ‘कोकणकडा’ मोहिमेत काहीही ‘गडबड’ झाल्यास श्रीकांतसारख्या अनुभवी गिर्यारोहकास आमचे प्रयत्न ठाऊक असणं महत्त्वाचं होतं. श्रीकांतनं खिलाडूवृत्तीनं ही जबाबदारी स्वीकारली. ‘कोकणकड्या’वरच्या यशस्वी चढाईनंतर, मला भेटून सर्वप्रथम अभिनंदन करणारा माणूस म्हणजे अरुण सावंत. ‘निकोप चुरशी’ची ही उत्तम उदाहरणं होती. 

अनिल कुमार आणि संजय बोरोले यांनी ११ जून १९८६ रोजी ‘कामेट’ शिखरावर यशस्वीरीत्या चढाई केली. चढाईचा शेवटचा टप्पा त्यांना ढगाळ वातावरणात पार करावा लागला. साहजिकच प्रत्यक्ष शिखरावरून फोटो काढता आले नाहीत. परतल्यावर मोठ्या उत्साहानं आम्ही स्लाइड शो तयार केला आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीस त्याचा पहिला शो ‘हिमालयन क्लब’नं कुलाब्याच्या इलेक्ट्रिक हाउसमधे आयोजित केला होता. हिमालयन क्लबचे मान्यवर सदस्य, जगदीश नानावटी यांना आम्ही गमतीनं ‘काशीचे ब्राह्मण’ म्हणत असू. शिखरावरची चढाई सिद्ध करणं ही अवघड जबाबदारी आमच्यावर होती. शोच्या दोन दिवस अलीकडे आम्ही सारे रात्री श्रीकांतच्या घरी जमलो होतो. ढग येण्यापूर्वी शिखराकडे जाणाऱ्या धारेवरून काढलेल्या काही पारदर्शिका आमच्याकडे होत्या. त्या पाहत असताना, एका पारदर्शिकेत ‘कामेट’ शिखराची सावली खालच्या पूर्व कामेट हिमनदीवर पडलेली स्पष्टपणे दिसत होती. माझा ‘इंजिनीअरिंग’ मेंदू कामाला लागला. पंचांगानुसार सूर्योदय-सूर्यास्ताच्या वेळा, कामेट शिखर व पूर्व कामेट हिमनदीची उंची आणि SinƟ, CosƟ असे सर्व आधार घेत, आम्ही शेवटचा फोटो काढल्याची वेळ आणि उंची शास्त्रोक्तरीत्या सिद्ध करू शकलो. दुसऱ्याच दिवशी आम्ही त्या स्लाइड्स आणि आमची गणितं घेऊन ‘हिमालयन क्लब’चे हरीश कापडिया यांच्या घरी पोहोचलो. हरीशची खात्री झाल्यावर, ‘शुद्धिपत्र’ मिळाल्यागत आमच्या मनावरचं मोठ्ठं ओझं उतरलं! त्या काळात गिर्यारोहण क्षेत्रात सजग वातावरण आणि परस्परांसंदर्भातला आदर हे खूप महत्त्वाचं होतं. आमचा शिखर प्रयत्न सिद्ध करण्यासाठी आम्ही घेतलेले कष्ट खूप समाधान आणि आनंद देऊन गेले. 

‘कांचनजंगा – कॅम्प २’च्या मार्गावर१९८६ सालच्या ‘कामेट’वरच्या यशस्वी चढाईनंतर आमच्या स्वप्नांना पंख फुटले. मोहिमेच्या अखेरीस बेस कॅम्पला परतल्यावर, ‘पुढे काय?’ अशा चर्चेला सुरुवात झाली. आमची वयं, जबाबदाऱ्या यांचा विचार करता, पुढील एक-दोन वर्षांतच मोठी मोहीम हाती घेतली पाहिजे, हे नक्की झालं. हिमालयात आठ हजार मीटर उंचीवरील फक्त १४ शिखरं आहेत. गिर्यारोहकांसाठी अशी मोहीम म्हणजे जणू ऑलिम्पिक्सच! पुढील काही दिवसांतच ‘कांचनजंगा’ शिखराची निवड करण्यात आली. या मोहिमेत तांत्रिक आव्हानं अनेक होती. त्याही पलीकडे जाऊन आम्हाला भेडसावणारं संकट म्हणजे पंचवीस लाखांचं बजेट. तोंडावर नाही, पण आमच्या मागे अनेक जण आम्हाला हसले होते. ‘गिरिविहार’साठीदेखील हा आकडा धडकी भरवणारा होता. इतर चार गिर्यारोहण संस्था या महत्त्वाकांक्षी उपक्रमात सहभागी झाल्या. ओवळेकर सर, महेश देसाई यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. हरीश कापडिया यांनी शुभेच्छांसोबत आमचा संपूर्ण शिखरप्रयत्नाचा रूट दाखवणारा ‘कांचनजंगा’चा एक मोठा फोटो भेट दिला. २४ जणांची टीम, ९५ दिवसांची मोहीम आणि साधनसामुग्रीचं १० टन वजन असा अफाट पसारा असणार होता. ८८ सालच्या मोहिमेसाठी ८६ सालच्या ऑगस्ट महिन्यातच तयाऱ्यांना सुरुवात झाली. महाराष्ट्रातून एवढ्या उंचीवर जाणारी ही पहिलीच नागरी मोहीम होती. समाजाच्या सर्व थरांतून मदतीचे हात पुढे आले. ठाणे महानगरपालिका, टाटा, ओएनजीसी, एल अँड टी अशा संस्थांनी मोलाचा हातभार लावला. पैसे उभारणीसाठी अनेक अभिनव कल्पना राबवल्या गेल्या. साध्या पावतीपुस्तकापासून, ‘I support kangchenjunga’ असे लिहिलेले टी-शर्टस् अशा अनेक कल्पना प्रत्यक्षात आल्या. पानवाल्याकडून मिळालेल्या पाच-दहा रुपयांनीही आपला खारीचा वाटा उचलला. अनेकदा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये अनोळखी माणूस आमचा टी-शर्ट घालून फिरताना दिसला, की त्यानं मोहिमेसाठी पन्नास रुपये दिल्याचं लक्षात येऊन गंमत वाटत असे. गिर्यारोहण या क्रीडाप्रकारास प्रेक्षक नसल्याकारणानं मोहिमेसाठी पैसे उभे करणं नेहमीच अवघड असतं. आमच्या अनेकविध प्रयत्नांमुळे त्या काळात ही मोहीम अनेक दृष्टीनं लोकाभिमुख झाली. खराब हवामानामुळे आमचे दोन शिखरप्रयत्न, शिखरापासून अवघ्या पाचशे फुटांवर असताना सोडून द्यावे लागले. दुर्दैवानं ‘हायपोथर्मिया’मुळे आमचा ‘पार्टनर’ संजय बोरोले हा उपनेता दगावला. अतिउंचीवर अनेक दिवस राहण्याचा अनुभव, कृत्रिम प्राणवायूशिवाय शिखरप्रयत्न, प्रचंड आवाका असलेल्या मोहिमेचं आयोजन असे अनेक मोलाचे धडे यातून केवळ आम्हालाच नाही, तर महाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांना शिकता आले. मोहीम अयशस्वी ठरली. परंतु भविष्यातल्या, १९९८ सालातल्या एव्हरेस्टवरच्या पहिल्या यशस्वी मराठी मोहिमेची पायाभरणी झाली होती!

प्रा. एम. व्ही. माळी‘गिरिविहार’च्या तरुण सदस्यांनी कार्यक्रमाचं छान आयोजन केलं होतं. सुरुवातीला ‘हनुमान’ या १९६६ सालच्या यशस्वी शिखरप्रयत्नातील हयात गिर्यारोहक प्रकाश शृंगारपुरे या ऐंशी वर्षांच्या ‘तरुणाचा’ यथोचित सत्कार करण्यात आला. ९२ वर्षांचे माळी सर कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. परंतु जुईनं चित्रित केलेल्या छोट्या मुलाखतीद्वारे सरांनी ‘गिरिविहार’ला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या थरथरत्या आवाजातील स्नेहार्द साऱ्यांच्याच मनाला भिडला. नव्वदच्या दशकातील आम्ही पाच जण परिसंवादासाठी स्टेजवर होतो. ‘तुमच्या काळी कसं होतं?’ सूत्रसंचालन करणाऱ्या परागचा प्रश्न. जुन्या आठवणींना उजाळा मिळत असताना माझ्या डोक्यात ‘तेव्हा आणि आज’ असा विषय प्रकर्षाने घोळत होता.

परिसंवादात लेखक वसंत वसंत लिमये.सुमारे तीन दशकांपूर्वीच्या काळाकडे पाहताना मी स्तिमित होतो. आज डोंगरवाटांवर जाणारी पावलं कित्येक पटींनी वाढली आहेत. सह्याद्रीतल्या अनेक किल्ल्यांवर आजकाल चक्क गर्दी असते. सह्याद्रीतले अनेक सुळके, कडे सर करण्यात आले आहेत. यातील अनेक चढाया पुनःपुन्हा केल्या जातात. ‘मी तीनशे किल्ले केले’, ‘मी पन्नास सुळके चढलो’ असे सांगणारे अनेक भेटतात. पुण्याच्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेने सहा-आठ हजार मीटरवरची शिखरं पादाक्रांत केली आहेत आणि सर्व १४ शिखरं सर करण्याचा त्यांचा मानस आहे. वैयक्तिकदृष्ट्या आठ हजार मीटरवरची शिखरं, तसंच सात खंडांतली सर्वोच्च शिखरं केलेले आज अनेक आहेत. त्यात स्त्रियांचाही समावेश आहे. आज अनेक संस्था व्यावसायिक पद्धतीनं गिरिभ्रमण, चढाया आयोजित करतात. गेल्या काही वर्षांत ‘गिरिमित्र’सारखा कौतुक सोहळा प्रचंड लोकप्रिय झाला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या डोंगरवेड्यांना एकत्र येण्याचं उत्तम व्यासपीठ लाभलं आहे. स्पोर्टस् क्लायंबिंग खूप लोकप्रिय झालं आहे. जागतिक स्तरावरच्या रॉक क्लायंबिंग स्पर्धा आपल्याकडे आयोजित केल्या जातात. दुर्गसंवर्धनाचं काम करणारे अनेक हौशी गट कार्यरत आहेत. दुर्गभ्रमण आणि निसर्गभ्रमंतीवर विपुल लेखन होताना आढळतं. वॉटरफॉल रॅपलिंग, स्लॅकलाइन, निसर्गात घेऊन जाणारी अनेक प्रकारची शिबिरं लोकप्रिय झाली आहेत. पूर्वी यशस्वी चढाईची छोटीशी बातमी छापून आणायला वणवण करावी लागे. आजकाल सर्व प्रसारमाध्यमांत गिरिभ्रमणाला मानाचं स्थान प्राप्त झालं आहे. गिर्यारोहण, गिरिभ्रमण या क्षेत्रात आकडेवारीनुसार झालेली प्रचंड वाढ थक्क करणारी आहे.

‘गिरिविहार’चे आजी-माजी सदस्य

अनेकदा मागची पिढी पुढल्या पिढीला निकृष्ट समजते. ‘आमच्या काळी काय बहार होती!’ असा रडका सूर लावते. मला मात्र आज डोंगरी वाटांकडे आकृष्ट होणाऱ्या तरुण पावलांचं विशेष कौतुक वाटतं. आज आपलं भौगोलिक आणि सामाजिक पर्यावरण खूप बदललं आहे. या बदललेल्या पर्यावरणाकडे डोळसपणे पाहताना, काही न रुचणाऱ्या गोष्टी समोर येतात. गेल्या काही दशकात विकासाचा भस्मासुर आणि लँड माफिया यांनी निसर्गाचे निर्घृणपणे लचके तोडले आहेत. पूर्वी सिंहगडावरून रात्रीच्या वेळी खाली पाहिलं असता, खोल दरीत दूरवर कुठेतरी किरकोळ उजेडाचे पुंजके दिसत. आज गडाच्या पायथ्यापर्यंत विद्रूप पांढऱ्या दिव्यांचा लखलखाट दिसतो. नद्या, खाड्या गायब होताना दिसतात. दुर्गसंवर्धनासाठी क्वचित सरकारी अनुदानं येतात. त्यातला थोडाच अंश अनेकदा गडांसाठी खर्च होतो. रायगडाच्या स्थापत्यकाराचं नाव जगदीश्वराच्या पायरीवर नम्रपणे कोरलेलं दिसतं; पण आज ‘स्वप्ना+निखिल’ असे थोर शिलालेख माजुर्डेपणानं नजरेवर आघात करतात. नद्या-नाले प्लास्टिकच्या झिरमिळ्यांनी सजलेले दिसतात. सार्वजनिक आणि पवित्र ठिकाणं म्हणजे कचरा, दारूच्या बाटल्या आणि काचा यांच्या उकिरड्यांनी नटलेले आहेत. शत्रूच्या उरात धडकी भरविणाऱ्या तोफा उलट्या गाडून, बोटी बांधण्यासाठी वापरल्या जातात. त्या योग्य ठिकाणी नेण्याचा प्रयत्न उत्साही इतिहासप्रेमींनी केल्यास त्याला स्थानिक विरोध होतो. वसईच्या किल्ल्यात आणि इतर ऐतिहासिक स्थळांवर ‘प्री-वेडिंग शूट’चे तमाशे सर्रास होतात. हा झाला भौगोलिक भ्रष्टाचार!

‘प्रबळ’ची कलावंतीणआज डोंगरात, निसर्गात जाणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्यम आणि निम्न-मध्यमवर्गीयांची क्रयशक्ती वाढली आहे. ट्रेकला जाण्याऐवजी ‘आउटिंग’ला जाणारे अधिक; पण त्यांची समजूत असते की आम्ही ट्रेकला गेलो होतो! इंटरनेट, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपमुळे माहितीचा विस्फोट झाला आहे. काही वर्षांपूर्वी अतिशय सुंदर, निसर्गातील चमत्कार भासणाऱ्या ‘संधन घळी’चा शोध लागला. परंतु लवकरच तिथे कचरा, विकृत व्यावसायिकीकरण आणि काही स्थानिकांची अरेरावी सुरू झाली. मध्यंतरी प्रबळगडाशेजारच्या कलावंतिणीच्या सुळक्यावरच्या अवघड पायऱ्यांच्या वाटेवर, सुमारे तीनशे जणांनी ट्रॅफिक जॅम करून दाखवला! (त्यातील काही जणांच्या पायात स्लिपर्स होत्या!) लोकप्रिय स्थळं, किल्ले इथल्या वाटा, निसर्ग यावर अनन्वित अत्याचार होताना दिसतात. ‘सेल्फी’ नावाच्या बोकाळलेल्या रोगानं काही जणांचे बळीदेखील घेतले आहेत.

गिर्यारोहण आणि गिरिभ्रमण यात सुरक्षिततेची काळजी घेण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज प्रस्तरारोहण, फर्स्ट एड यासाठी प्रशिक्षणाच्या अनेक सोयी उपलब्ध आहेत. परंतु याच गोष्टीचं पुरेसं भान राखलं जात नाही. डोंगरात, विशेषतः पावसाळ्यात घडणाऱ्या अपघातांची संख्या भीतिदायकरीत्या वाढली आहे. आजकाल काही संस्था ‘रेस्क्यू’ या क्षेत्रात कौतुकास्पद काम करत आहेत. हिमालयातल्या गिर्यारोहणात आठ हजार मीटर उंचीवरची शिखरं, विशेषतः एव्हरेस्ट खूप लोकप्रिय आहे. एकीकडे स्पॉन्सरशिप मिळवणं थोडं सोपं झालं आहे. परंतु गिर्यारोहणातल्या आनंदापेक्षा त्यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीचा जास्त हव्यास दिसतो. कमी उंचीवरच्या शिखरांवर कसदार चढाया अभावानंच घडतात. काही वेळा शिखरप्रयत्न यशस्वी झाल्याची बढाई मारण्याचा खोटेपणा करण्याचे अनिष्ट प्रयत्नही झाले आहेत. ‘मी आणि माझं’ हेच महत्त्वाचं. एखाद्या टीमनं एकत्र येऊन मोहीम करणं जणू इतिहासजमा झालं आहे. वैयक्तिक विजयाला अधिक महत्त्व मिळून संघभावना लोप पावत असल्याचं दिसतं. सामाजिक पर्यावरणात हे अतिशय वेगानं घडलेले बदल चिंताजनक आहेत. 

डोंगरवाटांची दुर्दशाएकंदरीत या क्षेत्रात अनेक स्तुत्य प्रयत्न छोट्या-छोट्या कप्प्यात किंवा ग्रुपमध्ये घडत असताना दिसतात. क्लब्स, संस्था लयाला जात असून, या क्षेत्रात भक्कम नेटवर्किंग घडण्याची नितांत गरज आहे. असं घडल्यास विविध प्रकारची माहिती सर्वदूर पोहोचेल आणि अनिष्ट प्रथांना आळा बसू शकेल. तंत्रज्ञानात क्रांतिकारी प्रगती झाली आहे, ज्याचा या नेटवर्किंगसाठी निश्चितच उपयोग करून घेता येईल. बऱ्याचदा पर्यावरणातल्या बदलांना आपणच कारणीभूत असतो. हे नमूद करत असताना या ‘आपण’मध्ये ‘मी’ही आलोच. कदाचित हे बदल अचानक घडत गेले. जुन्या परंपरा आणि स्वतःपलीकडे जाऊन संस्थात्मक काम करणारी माणसं कमी झाली आणि असंख्य नवी पावलं या डोंगरवाटांवर पडू लागली. ‘गिरिविहार’सारख्या काही जुन्या-जाणत्या मातृसंस्था आजही टिकून आहेत. आजच्या परिस्थितीत त्यांची जबाबदारी खूप वाढली आहे. केवळ टीका करण्यापासून दूर राहून, ‘नेटवर्किंग’साठी अशा संस्थांनी नव्या जोमानं प्रयत्न करण्याची गरज आहे.

डोंगरवेडे नेहमीच ‘बिकट’ वाटा वहिवाटीच्या करत आले आहेत. डोंगर तिथेच राहणार आहेत, त्यांचं सौंदर्य अनुभवणं, दुसऱ्यांना वाटणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे; पण म्हणूनच स्वैराचार न करता, डोंगर, निसर्ग हा आपल्याला मिळालेला ठेवा आपण जपून ठेवून, पुढच्या पिढ्यांना वारसा म्हणून देण्यासाठी कटिबद्ध झालं पाहिजे. आमेन.

ई-मेल : vasantlimaye@gmail.com

(वसंत वसंत लिमये यांची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/tdeg44 येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Prakash Walvekar About
खुप छान माहितिपुर्ण लिखाण धन्यवाद
0
0
Atul S Kolhapure About
Dolyat anjan ghalnara Lekh..kharch giryarohan ani picnic yatil pharak tarunaichya lakshat anun dene garjeche ahe
0
0
संजीव देवल About
सुरेख लिखाण
0
0
Ravi Abhyankar About
Excellent!
0
0
Arun Sawant About
खूप छान लिखाण .... आवडलं ......!
1
0
Deepika karande About
Aapala lekhan asach wachayla milat raho.
0
0
Yashodhan bal About
Girivihar.s activities were inspiration for me in pune...thanks balya
0
0
Mukund Deodhar About
It takes all of us in to the memory lane. Those were wonderful days. " मंतरलेले दिवस ". भाऊच्या , मनापासून धन्यवाद.
1
0

Select Language
Share Link
 
Search